पुल देशपांडे 😁 Pu La Deshpande
2.38K subscribers
122 photos
4 videos
37 files
24 links
पु. ल. देशपांडे यांची पुस्तके, विचार, विनोद आणि बरंच काही...
Download Telegram
Forwarded from Marathisahitya.in
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🚩 छत्रपती संभाजी महाराज प्रश्नमंजुषा 🚩
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
आज १४ मे धर्मवीर छ. संभाजीराजे जयंती. यानिमित्ताने प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सर्वांनी अवश्य सहभाग घ्यावा.
👇👇

https://www.marathisahitya.in/2022/03/l-sambhaji-maharaj-quiz.html?m=1

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
तुमच्या मित्रांना हे क्विझ नक्की शेअर करा.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
खाण्यातली खानदानी मजा.

पु.ल.देशपांडे


पु.लं.चं…प्रोटोकॉल

खाण्याचंसुद्धा शास्त्र आहे.
रागांना वर्ज्यबिर्ज्य स्वर असतात, तसे खाण्यालासुद्धा असतात.
उदाहरणार्थ, श्रीखंड घ्या. बाकी, जोपर्यंत मला प्रत्यक्ष काही द्यावं लागत नाही तोपर्यंत ‘घ्या’ म्हणायला माझं काय जातं म्हणा!
तर श्रीखंड पावाला लावून खा, म्हटलं तर तो खाणार नाही.
वास्तविक पाव हा देखील पुरीसारखा गव्हाचाच केलेला असतो; पण श्रीखंडाच्या संदर्भात तो वर्ज्य स्वर आहे.
पाव आणि अंड्याचं आमलेट ही जोडी शास्त्रोक्त आहे. पुरी आणि आमलेट हे एकत्र सुखानं नांदणार नाहीत.
जिलबी आणि मठ्ठा यांचा संसार जसा सुखाचा होतो तसा जिलबी आणि… छे! जिलबीला अन्य कुणाशी नांदायला पाठवण्याची कल्पनाच रुचत नाही.
खाण्याचे हे कायदे सांभाळून खाण्याला खानदानी मजा आहे. सुरांचे वर्ज्यावर्ज्य नियम पाळून गाण्याला जसं खानदानी गाणं म्हणतात. तसंच पदार्थाची कुठली गोत्रं जुळतात त्याचा विचार करून ते पानात वाढण्याला खानदानी खाणं म्हणतात.
रागांप्रमाणेच खाण्याच्या वेळा सांभाळल्या पाहिजेत.
सकाळी यमन बेचव वाटतो. सकाळी थालीपीठही बेचव वाटतं.
मारवा राग जसा संधिकालातला, तसंच थालीपीठदेखील साधारणतः भीमपलास आणि पूरिया धनाश्री या रागांच्या वेळांच्या मधे बसतं.
सारंगाच्या दुपारच्या वेळेला थालीपीठ खाऊन पहा. आणि संध्याकाळी साडेपाच-सहाच्या सुमाराला नको म्हणून पहा.
बाहेर पाऊस पडत असताना ज्याला गरम भजी म्हणून खावीशी वाटली नाहीत, तो मनुष्य चळलाच म्हणून समजावं.
सकाळी तीन भजी खाल्ली तरी अधिक. पण बाहेर पाऊस पडतो आहे, हवेत गारवा आहे, रमी किंवा ब्रिजमध्ये आपण जिंकतो आहो, अशा वेळी शेकडो भजी खाल्ली तरी ती अधिक नाहीत. 
अधिकचं हे असं आहे.
लोक भलत्या वेळी, भलत्या ठिकाणी आणि भलतं खातात.
हॉटेलात जाऊन भेळ खाणाऱ्याचं पोट नव्हे, मुख्यत: डोकं बिघडलेलं असतं.
शहाळ्याचं पाणी हापिसात बसून पिणाऱ्याची प्रमोशनं थांबवली पाहिजेत.
मसाल्याच्या दुधावर पान खाल्लं पाहिजे.
आणि चहावर धुम्रपान केलं पाहिजे.
खाण्यापिण्याचंही काही शास्त्र आहे. ह्या भारतात एके काळी हे शास्त्रवेत्ते होते.
उपासाचं खाणंदेखील शोधून काढणारी ती विद्वान माणसं माझ्या माहितीत आहेत. उपास लागणाऱ्या माणसाइतकीच उपासाचे पदार्थ जास्त झाल्यामुळं जरा जड वाटतंय म्हणणारी माणसं आहेत.
लग्नाला पंक्ती, गावजेवणं, समाराधना वगैरेचा तो जमाना होता. ‘हरहर महादेव’ ही आरोळी रणक्षेत्राप्रमाणं वरणक्षेत्रादेखील उठत असे.
माणसं बसल्या बैठकीला शंभर जिलब्या तोंडी लावणं म्हणून उठवत, त्यानंतर आग्रह सुरू होई.
साऱ्या सणांतून खाणे काढून टाका नि काय उरते पाहा.
 सारी भारतीय संस्कृती खाण्याभोवती गुंतली आहे; नव्हे, टिकली आहे.

होळीतून पोळी काढली की उरतो फक्त शंखध्वनी तो देखील पोळी मिळणार नसेल तर क्षीणच व्हायचा.
दिवाळीतून फराळ वगळा, नुसती ओवाळणीची वसुली उरते.
संक्रातीच्या भोगीला जोवर तीळ लावलेली बाजरीची भाकरी, वांग्याचं भरीत आणि तिळगूळ आहे तोवर ‘गोड गोड बोला’ म्हणतील लोक.
कोजागिरी पौर्णिमेतनं आटीव केशरी दुध वगळा, उरेल फक्त जागरण आणि कुठल्या तरी सस्त्यात मिळालेल्या उमेदवार गवयाचं गाणं.
गणेशचतुर्थीला मोदक नसले तर आरत्या कुठल्या भरवशावर म्हणायच्या?
रामनवमीच्या सुंठवडा, कृष्णाष्टमीच्या दहीलाह्या, दत्तापुढले पेढे, मारुतरायापुढलं साधं खोबरं अन, खडीसाखर…
साऱ्या देवांची मदार या खाण्यावर आहे. हेच गाळलं की हल्लीच्या लग्नासारखं व्हायचं. पाहुण्यांचे हात ओले करण्याऎवजी आहेराच्या रूपानं स्वतःचे हात धुवून घेण्याचा कार्यक्रम.
पंगती उठवण्याऎवजी कर्कश कर्ण्यातून रेकॉर्डस ऎकवून येणाऱ्याचं डोकं उठवायचं.

(पु. ल. देशपांडे)   शुभ खाद्यान्न!
*आज १ जून, म्हणजे खऱ्या अर्थाने सरकारी वाढदिवस.*
पु.ल.नेहमी म्हणायचे,
जवळजवळ निम्मा महाराष्ट्र 1 जून ला जन्माला आला आहे आणि तो ही गुरुजींच्या पुण्याईमुळे...

सर्व कष्ट आणि कटकटीमधून वेळ मिळाल्यावर मुलाला गावातील मराठी शाळेत हात धरून पायी चालत घेऊन जाउन शाळेत गुरूजी समोर उभे केल्यानंतर शाळाप्रवेश होई

मुलाला शाळेत दाखल करण्यासाठी वय वर्ष 6 पूर्ण असावे लागते त्यामुळे पालकांनी सांगायचे अंदाजे व गुरुजींनी ठोकताळे ठरवून जन्म तारीख अशी टाकायची की त्याला जून मध्ये 6 वर्ष पूर्ण होतील.

आज रोजी गुरूजींच्या लेखणीमुळे बर्याच जणांचे कागदोपत्री वाढदिवस. आहेत
गुरूजनांच्या कृपेने शाळेत दाखल करतात तोच दिवस जन्म दिनांक टाकून ग्रामीण भागातील सर्वसामान्यांचा शिक्षणाचा महायज्ञ सुरू.

१९७५ च्या आधी निरक्षरता जास्त होती. त्यावेळी बहुतांश पालकांना आपल्या पाल्याची जन्मतारीख माहीत नसायची. मात्र साल माहित असायचे. गुरुजींनी शाळा प्रवेशाच्या वेळी संबंधित पालकांना पाल्याची जन्मतारीख विचारल्यावर मात्र हे पालक गोंधळायचे.

निदान वर्ष माहित आहे का असे विचारल्यावर पालक वर्ष सांगत असत. मग त्याच वेळी गुरुजी आपल्या सोयी नुसार १ जून ही जन्म तारीख निश्चित करायचे.
अशा पद्धतीने अनेकांच्या जन्मतारखांचा जन्म झालेला आहे.

अशा पद्धतीने आज ज्या कोणाचा वाढदिवस आहे, त्यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा!!

गुरुजी व निसर्ग या दोघांचा ताळमेळ राखत आज रोजी आपण या भूतलावर स्वताची ओळख घेऊन आलात..... व आपल्या कार्यातून.... ओळख प्राप्त करून दिली त्याबद्दल.... मनापासून.... वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....
तुम जिओ सालो साल...... साल के दिन हो पचास हजार......
*पुन:च्छा सर्वांना आजच्या खऱ्या व सरकारी वाढदिवसाच्या मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा व पुढील निरोगी आयुष्यासाठी सदिच्छा*
💐🌹🎂🙏
या सगळ्या folk forms मधून, त्यांच्यातल्या सामर्थ्यातून, त्यांच्या वैशिष्ट्यांमधून आधुनिक रंगभूमीला पुष्कळ देणगी मिळेल. कारण त्यांचे विषय जरी रामायण-महाभारत आदी ग्रंथांतले असले, तरी तो form च इतका तेजस्वी आहे की, वाटेल तो आधुनिक विषय त्याच्यात येणं फारसं कठीण आहे, असं मला वाटत नाही. अर्थात form कुठला स्वीकारावा, हे पुष्कळ वेळा तो विषयच लेखकाला आतून सांगत असतो. मला असं वाटतं की, तुमच्या मनात जर उर्मी आली, तर या देशात पन्नास-साठ असे चांगले forms आहेत की, जे आपल्याकडे आणता येतील. त्या दृष्टीने प्रयत्न व्हायला पाहिजेत. या प्रयत्नांतून जी रंगभूमी निर्माण होईल, तिला खऱ्या अर्थानी 'भारतीय रंगभूमी' म्हणता येईल!
- “भारतीय अशी रंगभूमी आहे काय?” (१९७३) (पाचामुखी (२०१२)) #पुल #पाचामुखी
निवड करणं अवघड झाल्यानं पूर्ण परिच्छेद देतोय.
 
मॅजेस्टिक बुक स्टॉलतर्फे प्रकाशित झालेल्या ‘पु. ल. : एक साठवण’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ १८ नोव्हेंबर १९७९ रोजी मुंबईच्या रवींद्र नाट्यमंदिरात झाला होता. त्या समारंभात ‘पुलं’नी केलेल्या भाषणातील काही अंश...

...........

माझ्या साहित्याबद्दल सांगताना कविवर्य बोरकर, मं. वि. राजाध्यक्ष आणि श्री. पु. भागवत या तिघांनी सांगितलं, की मला कवितेचं प्रेम आहे. माझं म्हणणंच असं आहे, की कवितेवर ज्यांचं प्रेम नाही, तो कसलाच कलावंत होऊ शकणार नाही.. विनोदी तर नाहीच नाही.

जो चांगला वाचक आहे, तो मनातून कवितेचा वाचक असतो. एखादी गोष्ट काव्यमय आहे असं आपण म्हणतो, त्या वेळी त्याचं यमक-प्रास-वृत्त काहीही आपण पाहत नसतो. एखाद्याचं वागणं काव्यमय आहे, असं आपण म्हणतो - एखाद्याचं दिसणं किंवा एखादीचं दिसणं काव्यमय आहे असं आपण म्हणतो... वयाबरोबर आता ‘एखादी’चं वगैरे म्हटल्यावर लोक काय म्हणतील अशी मला भीती वाटायला लागली आहे!

काव्याशिवाय आपण राहू शकत नाही याचं कारणच असं आहे, की अन्न आपल्याला जगवतं आणि काव्य आपल्याला जगायला कारण देतं. कशासाठी जगायचं? जगायचं याच्यासाठीच, की जिथे माणसामाणसांतला प्रास जुळला आहे, माणसामाणसांतलं वृत्त जुळलं आहे.. ह्याच्यासाठीच तर जगायचं! म्हणूनच ‘आधी वंदू कवीश्वर। जे शब्दसृष्टीचे ईश्वर’ असं म्हटलं आहे. आता ते आपल्यालाच म्हटलेलं आहे असं काही लोक समजतात, तो भाग निराळा! हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु कवीला उगीच वंदन केलेलं नाही. गणपतीला ‘कविः कविनाम्’ म्हटलेलं आहे. ‘कवी’ ही माणसाला मिळालेली सर्वश्रेष्ठ पदवी आहे. काव्याचं आणि विनोदाचं जमत नसतं असं नाही. विनोदी लेखकाला बेसूर जास्त जाणवतो. त्यामुळे तो सुरांच्या मागे जास्त जातो. त्याला जीवनाचा बेतालपणा जास्त जाणवतो. म्हणून जीवन तालात येण्यासाठी त्यातला बेतालपणा काय आहे, हे तो लोकांना दाखवतो. राजकारणातली माणसं नीट वागत असती, तर आम्ही कशाला लिहिलं असतं? आता तर त्यांनी आमच्याशी चांगलीच स्पर्धा सुरू केली आहे यात शंकाच नाही. रोज त्यांचे विनोदी कार्यक्रम पाहिल्यावर आता आमचं कसं होणार, अशी भीतीही आमच्या मनात उत्पन्न झाली आहे; पण तो भाग निराळा! आजच्या ह्या चांगल्या प्रसंगी उगाच भलती नावं तोंडून निघून जायची.  
सुरांची सृष्टी निर्माण करणारा 'आमचा गोविंदा'
सुप्रसिद्ध हार्मोनियम वादक गोविंदराव पटवर्धन ह्यांना साठावं वर्ष लागल्याबद्दल रवींद्र नाट्य मंदिरात त्यांचा सत्कार करण्यात आला. त्या समारंभात पु.लं.नी केलेले अध्यक्षीय भाषण. गोविंदराव पटवर्धन, : जन्म : २१ सप्टेंबर १९२५ , म्हणजे हे भाषण १९८५ मधील.
मला सांगायला आनंद वाटतो की, गोविंदाला आमच्या संगीत क्षेत्रातले सगळेच लोक 'आमचा' गोविंदा असंच म्हणतात. जीवनामध्ये अनेक भूषणं मिळतात, अनेक पदव्या मिळतात, पण 'आमचा’ असा एकेरी उल्लेख मिळवायला फार मोठं तप करायला लागतं.
- सुरांची सृष्टी निर्माण करणारा 'आमचा गोविंदा' (१९८५) (पाचामुखी (२०१२)) #पुल #पाचामुखी
पुढील भाषण आहे १९८९च्या ‘जागतिक मराठी परिषदेच्या’ कार्यक्रमात केलेलं. “आयुष्यातला परमोच्च आनंदाचा आणि कृतज्ञेचा क्षण” काय एकेक षटकार मारलेत पुलंनी! वानगीदाखल हेच पहाना!
“आकाशात देवी आहे का?” असं जर मला कोणी विचारलं, तर मी सांगेन की, मला माहीत नाही. मला एकच माहिती आहे - ह्या आकाशात सुर्य आहे, चंद्र आहे आणि लताचा स्वर आहे. दिवस-रात्र अशी वेळ नाही, असा क्षण नाही; की लताचा स्वर ह्या जगात कुठूनतरी कुठेतरी जात-येत नसतो.
फक्त चार एक पानी. आणि आठ-नऊ मिनिटांच. इथं पाहायला मिळेल: https://youtu.be/BKTwQbGPKaQ
- “आयुष्यातला परमोच्च आनंदाचा आणि कृतज्ञेचा क्षण” (१९८९) (पाचामुखी (२०१२)) #पुल #पाचामुखी
"तु मायन्यात "चरणस्पर्श" केल्यामुळे मी चाट झालो. वयाने लहान असल्यामुळे तुला मी चरणस्पर्श म्हणू शकत नाही. तुझ्या लक्षावधी गीतांतल्या एकही गीतातल्या चरणाला स्पर्श करावा असा गळा देवाने मला न देता नुसताच घसा दिला आहे! पूर्वीचे राजे मुलुख पादाक्रांत करायचे तु सारे जग "पादाक्रांत" केले आहेस. हे तुझे सार्वभौमत्व चिरकाल टिको, ह्याच शुभेच्छा !"

(भाई- लता दीदींना लिहिलेल्या एका पत्रातून)
*शिंपी आणि सुट*
*अपूर्वाई*
*पु.ल देशपांडे*

आजवर कुठल्याही शींप्याने माझे कपडे बिघडवल्याचे माझ्या स्मरणात नाही. कारण कपडे बिघडतात म्हणजे नक्की काय होते हे मला कपडे घालायला लागल्याला इतकी वर्षे लोटुनदेखील अजूनही उमगले नाही. परंतु इंग्लंडमध्ये कपड्यांच्या बाबतीत दक्षता घेतली पाहिजे हे असंख्य लोकांनी बजावल्यामुळे जाणकार मित्रांच्या सल्ल्याने चिनी चांभाराच्या नजीकचाच, फक्त विलायतेला जाणाऱ्या लोकांचे कपडे शिवणारा शिंपी शोधावा लागला. ह्या सदगृहस्थाची माझ्या बाबतीतली भावना काही निराळीच दिसली. प्रथम मी विलायतेला जाणाऱ्या मंडळीपैकी आहे ह्या घटनेवर त्याचा विश्वासच बसेना. दुसरी गोष्ट विलायतेला त्याने शिवलेले सुट हिंडत असल्याच्या जोरावर तो कापड फाडल्यासारखे इंग्रजी फाडत होता. मी त्याच्याशी हिंदी बोलत असूनही त्याने इंग्रजी आवरले नाही. अर्थात माझे हिंदी त्याच्या इंग्रजीइतकेच बिन अस्तराचे होते हा भाग निराळा ! तीसरी गोष्ट म्हणजे त्याने प्रथम मापाला हात घालण्याऎवजी लंडनला आपले सूट अनेकांनी काय काय अभिप्राय व्यक्त केले आणि पिकॅडिली. सर्कसवाले शिंपीदेखील आपण शिवलेला सूट घातलेल्या हिंदी तरुणांना वाटेत अडवून शिंप्याचे नाव कसे विचारतात इत्यादी गोष्टी काही कारण नसताना सांगितल्या. (अनुभंवाती हे खोटे ठरले.) मी त्याचा सूट घालून पिकॅडीच्या शिंप्याचा दुकानांपुढून अनेक वेळा गेलो! मला फक्त त्याने शिवलेला काळा जोधपुरी कोट घालून जाताना एका गोऱ्या कामगाराने काळा पाद्री समजून हॅट काढून नमस्कार केला! मापे घेताना तर ह्या विलायती सुटाच्या तज्ज्ञाने माझे खांदे कसे वाकडे आहेत, (असतील, पण हे सांगण्याची गरज काय होती?) माझे पोट व छाती एकाच मापाची कशी आहे, माझ्या मानेला ‘शेप’ कसा नाही व चालताना माझ्या त्या शेप नसलेल्या मानेला पोक कसे येते, वगैरे फालतू परिक्षणे केली. अनेक वेळा मला ‘ट्रायल’ला बोलावले. इंग्रजीत गुन्हेगाराच्या चौकशीला ‘ट्रायल’ हाच शब्द का वापरतात हे मला इतक्या वर्षानंतर ह्या शिंपीदादाच्या दुकानात कळले. प्रत्येक ‘ट्रायल’ म्हणजे ट्रायलच होती. दर वेळी तो माझ्या अंगावर काही ठिगळे चढवी आणि ‘नो नो, युवर ट्मी ! ओ ---- युवर लेफ्ट शोल्डर शॉर्टर दॅन राइट...’ असे पुटपुटून माझ्या अंगावर आपल्या हातातल्या खडुने रेघोट्य़ा ओढी !

शेवटी एकदाचा सूट झाला. तो मी अंगावर चढवून अपराध्यासारखा त्याच्यापुढे उभा राहिलो आणि.... ‘तुमचे सगळे डिफेक्टस मी खुबीने झाकले आहेत; आता खूशाल हा सूट घालून लंडनमध्ये फिरा तुम्हाला मरण नाही’--- असा निकाल देऊन जवळजवळ अर्धसहस्त्र रुपयांनी माझा जुना खिसा रिकामा केल्यावर त्याच्या आत्याची शांती झाली आणि एकदाचा मी ‘सुट’लो.

*(अपूर्वाई)*
मराठी रंगभूमीची तर परंपराच आहे. आमचे जे सगळे श्रेष्ठ नट आहेत, त्यांचा उल्लेख आम्ही एकेरी नावानेच करत आलेलो आहोत. छोटा गंधर्वांना 'ते' छोटा गंधर्व असं कोणी म्हणत नाही. 'अरे, तो 'आपला' छोटा गंधर्व गायला' असाच उल्लेख होतो. त्याच्यामागे हा जो 'आपला' असतो, तो ह्या एकेरीवरती चांगल्या तऱ्हेने यायला प्रवृत्त करता असतो. तसंच गोविंदाचं आहे. - सुरांची सृष्टी निर्माण करणारा 'आमचा गोविंदा' (१९८५) (पाचामुखी (२०१२)) #पुल #पाचामुखी
माझ्या लहानपणी ज्यांनी मला साहित्य, संगीत, नाटक पाहून उत्तेजन दिलं, तू चांगला लेखक होशील, नाटकांत चांगलं काम करू शकशील, असा नुसता आशीर्वादच दिला नाही, तर आत्मविश्वासही निर्माण केला, अशा माझ्या शिक्षकांमध्ये तारकुंडे मास्तरांची मला खूप आठवण येते. तारकुंडे मास्तर आम्हाला फिजिक्स- केमिस्ट्री शिकवायचे. पण मैदानात आमच्याबरोबर क्रिकेट खेळत. स्नेहसंमेलनात नाटकं बसवत. मी १५ वर्षांचा होतो, तेव्हा 'बेबंदशाही'ची स्त्रीपात्रविरहित रंगावृत्ती मी तयार केली होती. तारकुंडे मास्तरनी माझं कौतुकच केलं नाही, तर त्यांनी स्वतः ते नाटक आम्हा विद्यार्थ्यांकडून बसवून घेतलं. मी त्या नाटकात संभाजीचं काम केलं होतं.नाटकातलं भाषण म्हणून झाल्यावर कडकडून टाळ्या पडणारा तो पहिला अनुभव मी त्या वेळेला घेतला आहे.
तारकुंडे मास्तरांना मुलांच्यावर कधी रागवावंच लागलं नाही. तसे ते चांगले उंचेपुरे होते. धिप्पाड म्हणावी, अशी देहयष्टी होती. पण बोलण्यात इतका जिव्हाळा होता की, फिजिक्ससारखा विषयही कवितेसारखा वाटायचा. तारकुंडेंच्या सारखेच आमचे फडके मास्तर. ते गणिताचे शिक्षक. पण उत्तम क्रीडापटू. गोरेपान, सडसडीत शरीर, खादीचा पायजमा, शर्ट, कोट अशा वेशातले. डोक्यावर टोपी न घालणारे माझ्या लहानपणी दोघेच शिक्षक होते. फडके आणि व्ही. डी. चितळे. वास्तविक मी गणितात खूप कच्चा. पण फडके मास्तर त्याबाबतीत मला कधीही न रागावता माझ्या पेटीवादनाचं कौतुक करायचे. माझं संगीताचं प्रेम या गणिताच्या फडके मास्तरांनी आणि ड्रॉइंग मास्तरांनी- कोंडकर मास्तरांनी- वाढीला लावलं. गणिताप्रमाणेच मला चित्रकलेतही अजिबात गती नसायची. एकदा या कोंडकर मास्तरांनी मला ड्रॉइंगच्या तासाला फ्री-हँड ड्रॉइंग काढायला सांगितलं. मी हताश होऊन समोरच्या कोऱ्या कागदाकडे बघत बसलो होतो. त्यांना काय वाटलं कुणास ठाऊक? ते माझ्याजवळ आले आणि म्हणाले, 'काय रे? तुझा कागद कोराच?' मी अगदी रडायच्या घाईला आलो होतो. मी रडू आवरत म्हणालो, 'मला चित्र काढायला येत नाही, सर!' 'अरे, तू चित्र काढायला सुरुवातच केली नाहीस, तर येतच नाही हे कसं? रेघा तर ओढायला लाग. आलं तर आलं. नाही आलं तर नाही आलं. परवा पेटी काय छान वाजवलीस. ती काय आपोआप आली? अरे, आपल्या बोटात काय लपलेलं असतं, ते आपल्यालासुद्धा ठाऊक नसतं.' मी लगेच रेघोट्या ओढायला सुरुवात केली. कोंडकर मास्तरांचा नि माझा एक खासगी करार होता. मी इतर विषयांत पहिल्या श्रेणीतले मार्क मिळवले, तर ते मला ड्रॉइंगमध्ये पास करणार होते... आणि गंमत अशी की, मीही त्यांना उगीच पास करायला लागू नये म्हणून प्रयत्नपूर्वक ड्रॉइंगकडे लक्ष द्यायला लागलो. माझी बोटेही साथ द्यायला लागली.

आणखी एका शिक्षकांची मला नेहमी आठवण येते. ती म्हणजे व्ही. डी. चितळे मास्तरांची. पुढे फार मोठे साम्यवादी नेते म्हणून त्यांचं नाव झालं. ऑलिम्पिकच्या हॉकी स्पर्धा दूरदर्शनवरून पाहताना मला त्यांची खूप आठवण झाली. त्यांनी आम्हाला त्या काळात आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकलेल्या ध्यानचंद आणि इतर खेळाडूंचा खेळ दाखवला होता. ते आम्हाला इतिहास शिकवीत. पण स्वतः मात्र उत्तम खेळाडू होते. खूप देखणे होते. लालबुंद चेहरा. उत्तम आरोग्याचा आदर्श नमुना असावा, असे दिसायचे. सदैव हसतमुख. उत्कृष्ट वक्तृत्व. ते बोलायला लागले की, आम्ही मंत्रमुग्ध होऊन त्यांचं बोलणं ऐकत असू. माझी वक्तृत्वाची आवड चितळे मास्तरांनी जोपासली. त्यांनी मला दिलेला एक गुरूमंत्र आठवतो. ते म्हणाले होते, 'समोर गर्दी कितीही असो, त्यातल्या एकाशी बोलतोय, असं समजून बोलत जा. म्हणजे त्या गर्दीतल्या प्रत्येकाला तू त्याच्याशी बोलतोस असं वाटेल. फोटोतली सरस्वती कशी आपल्याकडेच पाहते असं वाटतं ना? तसं!' या शिक्षकांनी केलेल्या चांगल्या संस्कारांनी घडून मी किती चांगला झालो, हे मला सांगता येणार नाही. पण त्यांच्याविषयी मात्र माझ्या मनात खूप मोठी कृतज्ञता आहे. त्यांची आठवण झाली की, मी पुन्हा शाळकरी वयाचा होतो.

पु.ल. देशपांडे
*पुलं गौरवगीताचे बोल*


जय जय पुरुषोत्तमा...


वंदन करिती तुला रसिकजन जय जय पुरुषोत्तमा

कलागुणांचा तू अधिकारी गुणाढ्य सर्वोत्तमा


रसिकांवर किती गारूड केले शब्दा शब्दांमधुनि

विनोद नाटक गंभीर आशय, नीटस समीक्षेतुनि

पूर्वरंगचे प्रवासवर्णन आणि रंगपश्चिमा

जय-जय पुरुषोत्तमा


संगीत भोक्ता उत्तम वक्ता नाटक कर्ता गुणी

विनोदबुद्धी व्यक्ती वल्ली गुण गाईन आवडी

किती अलौकिक अद्भुत सद्गुण एकेठाई जमा

जय-जय पुरुषोत्तमा


तू पुरुषोत्तम... तू पुरुषोत्तम कुबेर साहित्याचा

सुंदर मी होणार दिला हा मंत्र एक जिद्दीचा


अष्टपैलूहून अधिक कलागुण त्याला नाही सीमा

जय जय पुरुषोत्तमा...


गीत : मधुसूदन नानिवडेकर
मला अध्यक्ष म्हणून बोलावल्याचा बहुमान वाटला, असं वाटायचे दिवस गेलेले आहेत. मी होऊ नये इतका अध्यक्ष होत चाललो आहे. त्यामुळे 'हल्ली 'काय करता?' असं जर मला कोणी विचारलं, तर 'अध्यक्षपदाची भाषणं करतो' एवढंच मी सांगतो. - सुरांची सृष्टी निर्माण करणारा 'आमचा गोविंदा' (१९८५) (पाचामुखी (२०१२)) #पुल #पाचामुखी
*पु.ल.देशपांडे : या सम हा!*
प्रा. मिलिंद जोशी

पुलंचं नुसतं नाव जरी उच्चारलं, तरी मराठी माणसांच्या मनात आनंदाचं कारंजं सुरू होतं. वक्तृत्व, साहित्य, नाट्य, संगीत, विनोद अशा सर्व कलांमध्ये रममाण होणार्या पुलंनी स्वत: आनंद घेतला आणि रसिकांनाही तो दिला; म्हणून तर आपण पुलंना आनंदयात्री म्हणतो. श्री. म. माटेमास्तर म्हणत, ‘माणूस गेल्यानंतर जितका काळ त्याची आठवण काढली जाते, तितका काळ तो माणूस जिवंत असतो. ’महाराष्ट्रात असा एकही दिवस जात नाही, की ज्या दिवशी पुलंची आठवण निघत नाही. इतकं त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं गारूड आजही कायम आहे.
नांदेडच्या नाट्यसंमेलनाचे पुलं अध्यक्ष होते. या संमेलनात आचार्य अत्रे आणि पुलं देशपांडे एका व्यासपीठावर आले होते. त्या वेळेस मराठवाड्यातल्या रस्त्यांची अवस्था फारच बिकट होती. रस्त्यावर असणारे खड्डे, प्रचंड धूळ यांमुळे अत्रे त्रासलेले होते. आपल्या भाषणात त्यांनी राजकर्त्यांवर तोंडसुख घेतले. अत्रे म्हणाले, ‘‘काय हे मराठवाड्यातले रस्ते आणि काय ही धूळ! या धुळीनेच मी हैराण झालो आहे!’’ पुलं भाषणासाठी उभे राहिले. अत्र्यांच्या या भाषणाचा संदर्भ घेत म्हणाले, ‘‘ज्यांनी आयुष्यभर सर्वांना धूळ चारली, त्यांना या धुळीची इतकी भीती का वाटावी? ही मराठी भाषेच्या आजोळची धूळ आहे. या धुळीतून संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, समर्थ रामदास, जिजाऊ, छत्रपती शिवाजीमहाराज अशी मोठी माणसं गेली आहेत. ही धूळ अंगावर घेत असताना त्या माणसांचे दर्शन आम्हाला घडते आहे, असे वाटते. ज्याला पैठण आवडत नाही असा पुरुष शोधून सापडणार नाही आणि जिला पैठणी आवडत नाही अशी बाई शोधून सापडणार नाही, अशा मराठवाड्यात अत्रेसाहेब आपण आहात.’’ लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. सभाशास्त्राचा नियम मोडून अत्रे उभे राहिले. त्यांनी पुलंच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, ‘‘मावळत्या विनोदाने उगवत्या विनोदाला दिलेला हा आशीर्वाद आहे. महाराष्ट्राला हसवण्याचे काम आता यापुढे पुलंनी करावे. मी मरायला मोकळा झालो आहे.’’ आचार्य अत्र्यांचा शब्द खरा ठरला. अत्र्यांच्यानंतर महाराष्ट्राला हसवण्याचे काम पुलंनी केले.
जीवनातील विसंगती आणि विकृतींकडे दयाबुद्धीने पाहणार्या पुलंच्या विनोदाचे वैशिष्ट्य म्हणजे त्या विनोदाने कोणालाही जखमा केल्या नाहीत, बोचकारले नाही आणि रक्तही काढले नाही. पुलंच्या विनोदाने मराठी माणसाला खळखळून हसवताना रसरशीत जीवनदृष्टी दिली. एखाद्या घरंदाज सुनेनं चार-चौघांसमोरून जाताना स्वत:चा पदर सावरत ज्या अदबीनं जावं, तितक्या सभ्यपणे पुलंचा विनोद मराठी समाजात वावरला. शाब्दिक, प्रसंगनिष्ठ, कोटीबाज अशा सर्व प्रकारच्या विनोदाची उधळण पुलंनी केली. उत्तम लेखक उत्तम वक्ते असू शकत नाहीत याची अनेक उत्तम उदाहरणं आपल्याकडं आहेत. लेखणी आणि वाणी ही शब्दशक्तीची दोन्ही रूपं पुलंवर प्रसन्न होती.
बोलताना पुलंचा विनोद एखाद्या कारंजातल्या पाण्याच्या धारेप्रमाणे सहज उसळून येत असे. याचा प्रत्यय त्यांच्या लहानपणापासूनच येत होता. पुलं दहा-अकरा वर्षाचे होते, तेव्हाची गोष्ट. पार्ल्याला टिळकमंदिरात साहित्यसम्राट न. चिं. केळकर यांचे ‘गर्व्हमेंट ऑफ इंडिया अॅेक्ट’ या विषयावर व्याख्यान होते व्याख्यानानंतर शंकानिरसनासाठी प्रश्न-उत्तरं सुरू झाली. पुलं म्हणाले, ‘‘फेडरेशन राबविण्याचा मुद्दा पुन्हा एकदा स्पष्ट करून सांगाल का?’’ पुलंकडे पाहात केळकर म्हणाले, ‘‘बाळ, तुझ्या वयाला साजेसा प्रश्न विचार.’’ त्यावर पुलं म्हणाले, ‘‘सध्या पुण्यात अंजिरांचा भाव काय आहे?’’ त्यावर न. चिं. केळकर यांनाही हसू आवरले नाही. पुलंनी वकिलीचे शिक्षण पूर्ण केलेले होते. एका मुलाखतीत त्याचा संदर्भ देत संवादक म्हणाला, ‘‘यांचे मन वकिलीत रमले नाही.’’ त्यावर पुलं म्हणाले, ‘‘माझे मन वकिलीत रमले नाही असे म्हणण्यापेक्षा आशिलाचे मन माझ्यात रमले नाही’’ असे म्हटले, तर जास्त योग्य ठरेल. ज्याप्रमाणे निष्पक्षपाती न्यायाधीश असतात, त्याप्रमाणे मी निष्पक्षकार झालो असतो, मी वकिली केली असती तर...’’
पुलं आणि सुनीताबाईंनी बा. भ. बोरकर, आरती प्रभू यांच्याप्रमाणेच बा. सी. मर्ढेकर या कवींच्या काव्यवाचनाचे जाहीर कार्यक्रम केले. मुंबईला मर्ढेकरांच्या कवितांचे वाचन पुलं आणि सुनीताबाई करणार होते. मध्यंतरात पुलंना थोडंसं काहीतरी खायला लागायचं. तशा सूचना त्यांनी संयोजकांना दिल्या होत्या. संयोजकांनी ढोकळे, सामोसे, बर्फी असे इतके पदार्थ आणले होते, की ते पाहून पुलं म्हणाले, ‘‘लोक ‘मर्ढेकर’ ऐकायला आले आहेत; ‘ढेकर’ नाही.’’विजापूरला शाळेत पुलंचे भाषण होते. टेबलावर पाणी नव्हतं. पुलंना ते हवं होतं. संयोजक कळशी व तांब्या घेऊन आले. पुलं. म्हणाले, ‘‘पाणी प्यायला हवंय, आंघोळीला नकोय.’’ जालन्याला पुलंच्या सभेत शेळी शिरली. पुलं म्हणाले, ‘‘येऊ द्या तिला. महात्माजींच्या नंतर प्रथमच तिला सत्य ऐकायला मिळणार आहे.’’साहित्य आणि समाज यांचा संबंध केवळ लेखक आणि वाचक इतकाच मर्यादित नसतो.
(व्हॉटस् अॉप वरुन)

असे वसंतराव देशपांडे*
लेखक:-पु. ल. देशपांडे

पूर्वग्रहांचे चष्मे लावून पाहणाऱ्यांना जसे दीनानाथराव पटले नाहीत तसाच त्यांना हा एकलव्यही पटणार नाही. एकदा माझ्या घरी वसंता गात होता आणि आमचे नाना जोग एकदम ओरडले -

“अरे वसंता सहन होत नाही! इतके जडजवाहीर असे दण-दण दण-दण काय उधळतोस. जरा एक एक दागिना पाहायला तर आम्हाला उसत देशील!”_

वसंताच्या स्वभावातच ही सबुराई नाही. स्वरांचे इतके बंधन त्याच्यापुढे नाचायला लागतात की ऐकणाऱ्याला धाप लागते. त्याच्या गायकीतली ती मस्ती हा त्याचा गुण असेल किंवा दोष असेल पण हा त्याचा _'मिजाज'_ आहे.

निखारे असोत वा फुले असोत. त्यांची वादळी वृष्टीच होणार! म्हणूनच की काय कोण जाने _‘शतजन्म शोधितांना’, ‘असे जीत पहा’_ यासारख्या किंवा _‘रवी मी भाळी चंद्र असे धारिया’_ ह्या खडिलकरांच्या गाण्यासारख्या तेजस्वी गाण्यात वसंतराव अतिशय रमतात! त्यांचे गाणे गुंगी आणीत नाही. हेलिकॉप्टरसारखे वर उचलून नेते. हा दोषच असेल तर ग्रीक ट्रॅजेडीतल्या नायकाच्या दोषासारखा उदात्त दोष आहे. ह्या दीनानाथांच्या तुफानी स्वरसृष्टीशी बालवयात त्याचा जीव जडला त्या सृष्टीचा हा दोष आहे.

पण कलावंताला म्युनिसिपालिटीच्या आखीव बागेतली रोपटी दाखवतच हिंडा असे कोणी सांगावे? त्याला घनदाड जंगल, खोल दऱ्या, भीषण चढणीची ओढ जडली तर तो दोष त्याचा नाही! सारे काही सांभाळून करण्यात रमणाऱ्या भीरू मनाचा आहे वसंता!

वसंताच्या पिंडातच ही खांसाहेबी आहे. _‘कट्यार काळजात घुसली’_ मध्ये दाढ्यामिश्या लावून ती खांसाहेबी अधिक ढोबळ केली गेली एवढेच! उर्दू उच्चारातली त्याची सफाई काही नाटकांच्या तालमीत घोटलेली नाही. त्याची तबियतच ऊर्दू वळणाची आहे!

पण ऊर्दू इतकेच वसंताचे संस्कृतवर प्रेम. तेही धुंवट नाही. एखाद दिवशी गंधाचे पट्टे ओढून ओला पंचा नेसून वसंतराव वेदशास्त्रासंपन्न ब्राम्हणासारखे मंत्रपठण करण्याचाही षौक करतात. तिथे मग पॅण्ट बुशशर्ट घालून सिद्धीविनायकाच्या रांगेत अर्धवट मॉर्डन आणि अर्धवट सनातनी होणे नाही.

नागर आणि ग्रामीण हिंदीचे ढंग त्याला अवगत आहेत. मराठीचे तर गोमंतकीय कोकणीपासून ते अस्सल वऱ्हाडीपर्यंत सर्व प्रकार तो पेलू शकतो. कुठल्या दिवशी वसंतरावांचा काय अवतार असेल हे सांगणे बिकट!

कुंडल्या तपासताना वसंतराव संपूर्ण होरा भूषण! रागांची नावे ठाऊक नसतील इतकी त्याला देशी आणि विदेशी औषधांची नावे पाठ! जुनी शिल्पकला, अध्यात्म, अंगाला तांबडी माती न लावता कुस्ती- त्याच्या अनुभवांच्या पोतडीत काय काय आहे ह्याचा मला तीस वर्षात मला नीटसा अंदाज आलेला नाही.

आफ्रिकेत हिराबाईंबरोबर गेला तिथे पगडीबिगडी घालून तीन तास किर्तन केले. उद्या तमाशात सोंगाड्या म्हणून उभा राहिला तर त्याच्या ग्रामीण बोलीत नगर उच्चारांचा मागमूस लागणार नाही. आणि ह्या सर्वांच्यावर ताण म्हणजे _'कारकुनी'_ ह्या विषयातली पारंगतता! कॅज्युअल लिव्ह मिळवण्याची बाराशे सुलभ कारणे ह्यासारखा कारकुनाचा मार्गदर्शक ग्रंथ त्याने आवश्यक लिहावा.

पाकशास्त्र हा एक वसंताचा आवडता विषय. कोंबडीपासून ते भेंडीपर्यंत हजार सामिष आणि निरामिष पाकक्रिया त्याला येत असाव्यात. गाण्याप्रमाणे खाण्याचा आणि पिण्याचा कोणाच्या मुर्वतीखातर त्याने विधीनिषेध मानला नाही.

मात्र गाण्याआड ह्यापैकी कशाला त्याने येऊ दिली नाही. कमरेला पंचा लावून वसंतराव जिलब्या तळत राहिले आहेत हे दृष्य मी डोळ्यांनी पाहिले आहे. भूमिकेशी इतका तद्रूप की त्या आचार्य अवतारात ह्याने गांजाची चिलीम चढवली आहे की काय अशी शंका यावी!

पुण्यातला गेल्या तीस वर्षातल्या व्याखानमाला पाठ असाव्यात त्याला! _'जिनमध्ये लाइम कॉर्डियलचे प्रमाण काय',_ इथपासून ते _'अवकहडा चक्र'_ म्हणजे काय इथपर्यंत त्याला सगळ्यात गम्य!

वसंताचे स्नेही ही त्याची फार मोठी कमाई आहे. पहिल्या भेटीत उखडेल वाटणारा वसंता मनाचा मवाळ आहे. चंपूताईच्या घरच्या बैठकीत जाजम घालील. कुमारविषयींच्या उत्कट प्रेमामुळे त्याला तबलजी म्हणून जाईल. नवख्या गायक-गायिकांचे तंबोरे जुळवून देईल. कारकूनांच्या सार्वजनिक सेवेत अनाथाच्या अंत्यविधीत सहाय्य करणे हा एक महत्वाचा भाग असतो. त्यात माणुसकिचा ओलावा आवश्यक असतो. वसंतरावांना रात्री-बेरात्री हाका घालणारा त्यांचा एक जुन्या दोस्तांचा गट आहे.

कारकुनी करुनही कुरकुर न करता जीवनातल्या अनेक गोष्टींचा आनंद घेत वसंता जगत आला आहे. त्याच्या जिवलगांच्या जगात भीमसेनेचे स्थान मोठे आहे. त्यांचे परस्परांविषयींचे प्रेम हा एक मजेदार मामला आहे.

भीमसेन जीवनात साहस आणि गाण्यात अभिजाततला आवश्यक असणारे सारे संयम सांभाळणारा, तर वसंता जीवनात सारे षौक संयमाने करुन गाण्यात अफाट साहसी. पण दोघांची जुगलबंदी पाहण्यासारखी.
Forwarded from Marathisahitya.in
🔥 गणपती बाप्पा आगमन स्टेटस
🔥 गणेश चतुर्थी शुभेच्छा आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना नक्की पाठवा.
👇👇👇
https://www.marathisahitya.in/2023/09/ganesh-chaturthi-quotes-marathisahityain.html?m=1
Forwarded from Marathisahitya.in
🔥 गणपती बाप्पा आगमन स्टेटस
🔥 गणेश चतुर्थी शुभेच्छा आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना नक्की पाठवा.
👇👇👇
https://www.marathisahitya.in/2023/09/ganesh-chaturthi-quotes-marathisahityain.html?m=1