पुल देशपांडे 😁 Pu La Deshpande
2.23K subscribers
121 photos
4 videos
37 files
24 links
पु. ल. देशपांडे यांची पुस्तके, विचार, विनोद आणि बरंच काही...
Download Telegram
माझ्या लहानपणी ज्यांनी मला साहित्य, संगीत, नाटक पाहून उत्तेजन दिलं, तू चांगला लेखक होशील, नाटकांत चांगलं काम करू शकशील, असा नुसता आशीर्वादच दिला नाही, तर आत्मविश्वासही निर्माण केला, अशा माझ्या शिक्षकांमध्ये तारकुंडे मास्तरांची मला खूप आठवण येते. तारकुंडे मास्तर आम्हाला फिजिक्स- केमिस्ट्री शिकवायचे. पण मैदानात आमच्याबरोबर क्रिकेट खेळत. स्नेहसंमेलनात नाटकं बसवत. मी १५ वर्षांचा होतो, तेव्हा 'बेबंदशाही'ची स्त्रीपात्रविरहित रंगावृत्ती मी तयार केली होती. तारकुंडे मास्तरनी माझं कौतुकच केलं नाही, तर त्यांनी स्वतः ते नाटक आम्हा विद्यार्थ्यांकडून बसवून घेतलं. मी त्या नाटकात संभाजीचं काम केलं होतं.नाटकातलं भाषण म्हणून झाल्यावर कडकडून टाळ्या पडणारा तो पहिला अनुभव मी त्या वेळेला घेतला आहे.
तारकुंडे मास्तरांना मुलांच्यावर कधी रागवावंच लागलं नाही. तसे ते चांगले उंचेपुरे होते. धिप्पाड म्हणावी, अशी देहयष्टी होती. पण बोलण्यात इतका जिव्हाळा होता की, फिजिक्ससारखा विषयही कवितेसारखा वाटायचा. तारकुंडेंच्या सारखेच आमचे फडके मास्तर. ते गणिताचे शिक्षक. पण उत्तम क्रीडापटू. गोरेपान, सडसडीत शरीर, खादीचा पायजमा, शर्ट, कोट अशा वेशातले. डोक्यावर टोपी न घालणारे माझ्या लहानपणी दोघेच शिक्षक होते. फडके आणि व्ही. डी. चितळे. वास्तविक मी गणितात खूप कच्चा. पण फडके मास्तर त्याबाबतीत मला कधीही न रागावता माझ्या पेटीवादनाचं कौतुक करायचे. माझं संगीताचं प्रेम या गणिताच्या फडके मास्तरांनी आणि ड्रॉइंग मास्तरांनी- कोंडकर मास्तरांनी- वाढीला लावलं. गणिताप्रमाणेच मला चित्रकलेतही अजिबात गती नसायची. एकदा या कोंडकर मास्तरांनी मला ड्रॉइंगच्या तासाला फ्री-हँड ड्रॉइंग काढायला सांगितलं. मी हताश होऊन समोरच्या कोऱ्या कागदाकडे बघत बसलो होतो. त्यांना काय वाटलं कुणास ठाऊक? ते माझ्याजवळ आले आणि म्हणाले, 'काय रे? तुझा कागद कोराच?' मी अगदी रडायच्या घाईला आलो होतो. मी रडू आवरत म्हणालो, 'मला चित्र काढायला येत नाही, सर!' 'अरे, तू चित्र काढायला सुरुवातच केली नाहीस, तर येतच नाही हे कसं? रेघा तर ओढायला लाग. आलं तर आलं. नाही आलं तर नाही आलं. परवा पेटी काय छान वाजवलीस. ती काय आपोआप आली? अरे, आपल्या बोटात काय लपलेलं असतं, ते आपल्यालासुद्धा ठाऊक नसतं.' मी लगेच रेघोट्या ओढायला सुरुवात केली. कोंडकर मास्तरांचा नि माझा एक खासगी करार होता. मी इतर विषयांत पहिल्या श्रेणीतले मार्क मिळवले, तर ते मला ड्रॉइंगमध्ये पास करणार होते... आणि गंमत अशी की, मीही त्यांना उगीच पास करायला लागू नये म्हणून प्रयत्नपूर्वक ड्रॉइंगकडे लक्ष द्यायला लागलो. माझी बोटेही साथ द्यायला लागली.

आणखी एका शिक्षकांची मला नेहमी आठवण येते. ती म्हणजे व्ही. डी. चितळे मास्तरांची. पुढे फार मोठे साम्यवादी नेते म्हणून त्यांचं नाव झालं. ऑलिम्पिकच्या हॉकी स्पर्धा दूरदर्शनवरून पाहताना मला त्यांची खूप आठवण झाली. त्यांनी आम्हाला त्या काळात आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकलेल्या ध्यानचंद आणि इतर खेळाडूंचा खेळ दाखवला होता. ते आम्हाला इतिहास शिकवीत. पण स्वतः मात्र उत्तम खेळाडू होते. खूप देखणे होते. लालबुंद चेहरा. उत्तम आरोग्याचा आदर्श नमुना असावा, असे दिसायचे. सदैव हसतमुख. उत्कृष्ट वक्तृत्व. ते बोलायला लागले की, आम्ही मंत्रमुग्ध होऊन त्यांचं बोलणं ऐकत असू. माझी वक्तृत्वाची आवड चितळे मास्तरांनी जोपासली. त्यांनी मला दिलेला एक गुरूमंत्र आठवतो. ते म्हणाले होते, 'समोर गर्दी कितीही असो, त्यातल्या एकाशी बोलतोय, असं समजून बोलत जा. म्हणजे त्या गर्दीतल्या प्रत्येकाला तू त्याच्याशी बोलतोस असं वाटेल. फोटोतली सरस्वती कशी आपल्याकडेच पाहते असं वाटतं ना? तसं!' या शिक्षकांनी केलेल्या चांगल्या संस्कारांनी घडून मी किती चांगला झालो, हे मला सांगता येणार नाही. पण त्यांच्याविषयी मात्र माझ्या मनात खूप मोठी कृतज्ञता आहे. त्यांची आठवण झाली की, मी पुन्हा शाळकरी वयाचा होतो.

पु.ल. देशपांडे
मला सांगायला आनंद वाटतो की, गोविंदा कोणाकडेही शिकला नाही, म्हणूनच तो इतकं चांगलं वाजवतो. कारण शिकलेले लोक पाहिले की ते आणि त्यांचे गुरू ह्या दोघांपैकी कोणाची कीव अधिक करावी असं वाटतं. - सुरांची सृष्टी निर्माण करणारा 'आमचा गोविंदा' (१९८५) (पाचामुखी (२०१२)) #पुल #पाचामुखी
*पुलोपदेश* 
-----------------------------------------------

डॉ. श्रीरंग आडारकर यांचे चिरंजीव अशोक आडारकर यांना त्यांच्या विवाहानिमित्त पु. ल. देशपांडे यांनी पाठविलेले पत्र...

पु. ल. देशपांडे,
१, रुपाली, ७७७, शिवाजी नगर, पुणे - ४.


८ जून १९८० प्रिय अशोक आजचा दिवस तुझ्या आणी कोमलच्या आयुष्यात सर्वात
महत्वाचा. सुमारे चौतीस वर्षांपूर्वी, जून महिन्यातच असाच एक महत्वाचा दिवस माझ्या आणी तुझ्या सुनीतामावशीच्या आयुष्यात आला होता. या चौतीस वर्षांच्या अनुभवाच्या आधारावर 'लग्न' या विषयावर तुला चार उपदेशपर गोष्टी सांगाव्या, असं मला वाटतं. वास्तविक लग्न या विषयावर कुणीही कुणालाही उपदेशपर चार शब्द सांगू नये, असा माझा सगळ्यांनाच उपदेश असतो. तरीही यशस्वी संसारासंबंधी चार युक्तीच्या गोष्टी तुला सांगाव्या, असं मला वाटलं. या संबंधात ऑस्कर वाइल्डचे एक वाक्य ध्यानात ठेव. "A Perfect marriage is based on perfect mutual misunderstanding".लग्न हे नवराबायकोच्या एकमेकाविषयी असणा-या संपूर्ण गैरसमजाच्या आधारावरच यशस्वी होत असते. आता माझेच उदाहरण देतो. मी अत्यंत अव्यवस्थित आहे, असा सुनीताचा लग्न झाल्या क्षणापासून आजतागायत गैरसमज आहे. लग्नाच्या रजिस्टरबुकात सही करायला मी खुर्चीवर बसलो, तो नेमका तिथे ठेवलेल्या रजिस्ट्रारच्या ह्यॅटवर. ही गोष्ट खरी आहे. पण मी त्याचा त्या ह्यॅटीवर बसण्यापूर्वीची तिची अवस्था आणि मी बसल्यानंतरची अवस्था यात मला तरी काहीच फरक दिसला नाही. एकदा कुणाच्या तरी चष्म्यावर बसलो होतो, तेव्हा मात्र बसण्यापूर्वीच्या
माझ्या लेंग्याच्या आणि काचा घूसू नयेत तिथे घुसल्यावर झालेल्या माझ्या अवस्थेच्या आठवणीने आजही नेमका याच ठिकाणी घाम फुटतो. पण ते जाऊ दे. सांगायची गोष्ट मी अव्यवस्थित असल्याचा सुनीताचा गैरसमज मी अजूनही टिकवून ठेवला आहे. यामुळे मी प्रवासातून परतताना माझा पायजमा, टॉवेल आणि साबणाची वडी या प्रवासात विसरून येण्याच्याच लायकीच्या वस्तू न विसरता विसरून येतो. मग सुनीताला वस्तू हरवल्याचा दु:खापेक्षा 'मी अव्यवस्थित आहे', या तिच्या मताला पुष्टी मिळाल्याचा भयंकर आनंद होतो. आता कोमल ही डॉक्टर असल्यामुळे 'तू प्रकृतीची काळजी घेत नाहीस', असा जर तिचा गैरसमज झाला, तर तो टिकवून ठेव. तुला जरी तू भक्कम आहेस असं वाटत असलं, तरी स्री-दृष्टी हा एक खास प्रकार आहे. या नजरेने पुरुषमाणसाला पाहता येत नाही. तेव्हा तू स्वत:च्या प्रकृतीची काळजी घेत नाहीस, रात्रदिंवस हापिसच्या कामाचीच चितां करतोस असा जर कोमलचा समज झाला, तर अधूनमधून खोकला वगैरे काढून तो समज टिकवून ठेव. तिने दिलेली गोळी वगैरे खाऊन टाक. डॉक्टरीण बायकोने केलेल्या गोळीच्या सांबाऱ्यापेक्षा ही गोळी अधिक चवदार असते, असे एका डॉक्टरणीशी लग्न केलेल्या फिजिओथेरापिस्टचे मत आहे. (पुढील सहा महिने मी जसलोकपुढून जाणार नाही!) आता खोकला काढताना या ठिकाणी दुसरी कोणी तरुणी नाही, याची खात्री करून घे. ('तरुणी' हे वय हल्ली ५७-५८ वर्षांपर्यंत नेण्यात आले आहे. कारमायकेल रोडवरून एक चक्कर मारून आल्यावर तुला हे कळेल.)
गाफीलपणाने खोकला काढलास तर 'हा खोकला कुणासाठी काढला होता ते खरं सांगा-?' या प्रश्नाचे उत्तर द्यायची हिंमत बाळगावी लागेल. तेव्हा गैरसमज वाढवत ठेवताना योग्य ती दक्षता घ्यावी.
सुखी संसारात नवऱ्याला स्वत:चे मत नसणे, यासारखे सुख नाही. विशेषत: प्रापचिंक बाबतीत. खोमेनी, सादत, मोशे दायान, अरबी तेलाचा प्रश्न यावर मतभेद चालतील. पण भरलेले पापलेट आणि तळलेले पापलेट यातले अधिक चांगले कुठले? या विषयावर सौ.पक्षाचे मत ऐकून तेच ‚ग्र्याह्य मानावे. बेसावधपणाने कारवारी पद्धतीच्या स्वैपाकावर बोलून जाशील. मुख्य म्हणजे 'राव' या आडनावाचा/ची प्रत्येक व्यक्ती ही असामान्य मानावी. कुठल्या क्षणाची कुठला/ कुठली राव ही वधूपक्षाभ्या नात्यातली निघेल, हे सांगणे अशक्य आहे. मी रवीनद्रनाथाविंषयी नेहमी चांगलेच बोलतो याचे खरे कारण यांचे आडनाव 'ठाकूर' आहे हे तुला म्हणून सांगतो. राव या आडनावाप्रमाणे 'बोरकर' या आडनावाविषयीही सावध असावे. जरा अधिक सावध. बोलताना बारीक सारीक गोष्टींना जपावं लागतं. संसार म्हणजे खायची गोष्ट नाही. (बायकोच्या हातचे जेवण सोडून. ते खावेच लागते.) उदाहरणरार्थ, 'मीसुद्धा मनात आणले असते, तर डॉक्टर झालो असतो,' हे वाक्य चुकूनही उच्चारू नये. उलट, 'बापरे! डॉक्टर होणं आपल्याला जमलं नसतं. याला तुझ्यासारखी निराळीच बुद्धिमत्ता लागते,' हे वाक्य दर महिन्याला पगाराच्या दिवशी वधूपक्षाला ऐकवीत जावे. म्हणजे त्या आनंदात शॉपिंगचा बेत रद्द होण्याची शक्यता आहे. तुला एकूण Medical Professionविषयी जपूनच बोलावं लागेल. वधूपक्षातले तीन विरुद्ध तू एक या सामन्यात तुझ्या कराटेच उपयोग नाही. शिवाय कराटेमुळे विटा फोडता आल्या, तरी मते फोडता येत नाहीत. यामुळे MedicalProfessionसंबंधी उगीचच मतभेद व्यक्त करणे टाळावे.
तुझ्या Technologyबद्दल घरात एक अक्षर न काढणे बरे. फारच कोणी वखुपक्षीयांनी सख्या काय चाललंय वगैरे विचारलं, तर सात-आठ टेक्नीकल शब्द घालून एक वाक्य फेक. (यापूर्वी विचारणारा तुझ्या विषयातला नाही, याची खात्री करून घे!) म्हणजे तू तुझ्या विषयातल्या जगातल्या पाच शास्रज्ञांपैकी एक आहेस, हा समज (गैरसमज म्हणत नाही!) पक्का होईल. आणिDiamond Shamrockमधला तूच काय तो डायमंड आणि इतर सगळे Shamकिंवा निर्बुद्धrockहा समज वाढीला लागून घरात इज्जत वाढेल.

कोमलच्या गृहप्रवेशानंतर तुमच्या घरातली स्री-मतदारांची संख्या एका आकड्याने वाढत आहे, हे विसरू नये. भरतचा मुक्काम कुठल्या तरी अज्ञात कारणाने अमेरिकेत लांबत चालल्यामुळे तू आणि आमचे परममित्र बाबूराव (अख्यक्ष शेणवी सहकारी पेढी) विरुद्ध मालती, पुन्नी, कोमल असे गव्हर्मेंट आहे. तेव्हा काही दिवस तरी 'पंजा'चे राज्य आहे हे विसरू नये. आणि घरात सतत होणा-या 'शॉपिंगला' उगीचच विरोध न करता बाजारातून जे जे काही म्हणून घरात विकत आणले जाईल,याचे ''अरे वा!'', ''छान!'', ' O Wonderful!'' अशा शब्दांनी स्वागत करावे. बाहेर जाताना 'ही साडी नेसू का?' हा पत्नीचा प्रश्न पतीने उत्तर द्यावे म्हणून विचारलेला नसतो. व्याकरणदृष्ट्या हा प्रश्न असला, तरी कौटुबिंक व्याकरणात ते एक 'मी ही साडी नेसणार आहे' असं Firm Statementअसते. या प्रश्नाला खूप निरखून पाहिल्याचा (साडीकडे) अभिनय करून- वा! हूंss! - हो हो -, छान - फार तर Fantastic Idea, असे प्रसंग पाहून आवाज काढावे. अगर 'ही नेसतेस?' - अच्छा वगैरे डायलॉग म्हणावा. कृपा करून 'कुठलीही नेस. कोण बघतंय' यासारखी वाक्यं ओठाशी आली, तरी गिळून टाकावी. या बाबतीत आपल्या राष्ट्रपतींचा आदर्श मानावा. प्रधानमंत्रीजींकडून सूचना आली की लगेच agreedम्हणून सही. राष्ट्रपतींचे हे धोरण सर्वसामान्य पतींनीही स्वीकारावे. उलट पार्टीला वगैरे जाताना 'यातला कुठला बुशशर्ट घालू? तुझा Choiceनेहमीच फसक्लास असतो - वगैरे वाक्यं टाकावी. माझ्या Choiceपेक्षा तुझा Choiceचांगला असतो, या वाक्यातली अंदरकी बात मात्र वधूपक्षाच्या लक्षात येणार नाही, याची खात्री बाळगावी. नाहीतर 'कळतात ही बोलणी ...' हे वेदाइतकं जुनं वाक्य ऐकावं लागेल. मग यानंतरच्या प्रत्येक प्रश्नाला 'मला नाही माहीत' हे उत्तर. शेवटी प्रचंड महत्वाची गोष्ट. सौ.च्या वाढदिवसाची तारीख विसरू नये. एक वेळ ऑफिसात जाताना पॅण्ट घालायला विसरलास तरी चालेल. पण बायकोची जन्मतारीख विसरणाच्या गुन्ह्याला क्षमा नाही. इमानी नवरे हा वाढदिवस निरनिराळ्या रीतीने साजरा करतात. presentsसुद्धा देतात. पण इतर कुठल्याही Presentपेक्षा या दिवशी नवऱ्याने ऑफिसला absentराहण्यासारखे दुसरे Presentनाही.
कांदेनवमीला जसे आपल्याला कांदा आवडला नाही, तरी धार्मिक भावनेने कांदा खातात, तसे बायकोच्या वाढदिवसाला आपल्याला एरवी, ज्यांना निर्मनुष्य बेटावर भेटले तरी टाळावे असे वाटते - तसल्या, बायकोच्या तमाम नातेवाईकांना, काहींना दुपारी आणि काहींना रात्री जेवायला बोलावण्याचा बायकोला आग्रह करावा, असे एका तज्ञ पतीचं मत आहे. म्हणजे आपण सुटी घेऊन घरी राहिलो म्हणून बायको खुश. बरं तिच्याच नातलगांना गिळायला बोलावल्यामुळे ती दिवसभर स्वैपाकघरात. घरात तिचेच नातलग आणि यांची प्रजा. घरातली काचेची भांडी या बालकांच्या सहज हाती लागतील, अशा जागी ठेवावी. भावाच्या किंवा बहिणिच्या मुलांनीच ती फोडल्यामुळे सौ.चा 'आवाज' बंद. आपणही हा मोका साधून - अहो - मुलंच ती - करणारच मस्ती. वगैरे बोलावं. आणि मेहुणे-मेव्हण्या वगैरेंच्या मुलांना सहज फोडता येतील किंवा सांडता येतील अशा वस्तू यांना दिसतील अशा ठिकाणी ठेवाव्यात. फक्त जिथे आपला टेपरेकॉर्डर, डिक्स वगैरे असतात, या खोलीतल्या विजेच्या बटणांना शॉक येतो असे सांगून ती खोली बंद ठेवावी. मी केलेल्या उपदेशातला बाकीचा सर्व उपदेश विसरलास तरी चालेल, पण बायकोचा वाढदिवस विसरू नकोस. वाढदिवस कितवा, याला महत्व नाही.
त्रिलोकरशेट या माझ्या परममित्राला आपल्या बायकोच्या वाढदिवसाचा विसर पडला, ती हकीकत यांनी मला सागिंतली, तशी तुला सांगतो. ऐक. ''सालं काय सांगू तुला, अरे वाईफचा बर्थ डे. टोटली फरगॉट, जी भडकली. सालं विचारू नको. एकदम नो टॉक. बरं, बायको अशी टॉकीच्याबद्दल सायलेंट फिल्म होऊन बसली की, आपण तोंड बंद ठेवतो. - जी भडकली - जी भडकली - मी ब्रेकफासला काय आहे विचारल्यावर टीपॉयवरची दाताची कवळीच तिनी काढून खिडकीतून भायेर फेकून दिली. टू-थर्टिफाइव रुपीज टिकवून तळपदे डेंटिसकडून आणलेली कवळी भाई जीवनजी लेनवर, बत्तीसच्या बत्तीस दात पसरले. आणि साला जोक सांगतो तुला. कवळी फेकली ती माझी समजून तिची स्वत:चीच. माझे दात पाण्यानी भरलेल्या बाऊलमधून तिच्याकडे बघून साले काच फुटेपर्यंत हसत होते. मी सालं पटकन माझी कवळी तोंडात घातली - तिचं विदाऊट टूथ तोंड पाह्यल्यावर एकदम आमच्या डोळ्यातली ट्यूब पेटली - साला वाईफचा फिफ्टिएट्थ बर्थ डे.
कारण बरोबर फिफ्टीसेकंड बर्थडेला मी तिला तळपदे डॉक्टरकडून कवळी बसवली होती. बर्थडेच्या दिवशी कवळी फेकून बसली - मला सालं समजेना, हॅपी बर्थ डे म्हणू का नको म्हणू? तसाच साला चफ्पल घालून निघालो आणि तिला खुश करावं म्हणून तिच्या आवडीचे लाडू घेऊन आलो. तो साला फणसवाडीतला दयाराम मिठायवाला पण अवंग साला. याला धादा वॉर्न करून सागिंतलं - नरम बुंदी. तर या इडियटनी पिशवीत भरून दिले एक डझन कडक बुंदी. साला वाईफच्या तोंडात नाय दात - ती कडक बुंदी काय खाणार कफ्पाळ. साला तिला वाटलं, मी पर्पजली कडक बुंदी आणली. साला तुला सांगतो, तोंडात दात नसताना या वाइफ लोक जेव्हा भडकून बोलतात ना, तो साला साऊंडपण हॉरिबल आणि साईट तर मल्टिफ्लाईड बाय हंड्रेड हॉरिबल. आता मी काय ट्रिक केलीय म्हाईत आहे? साईबाबाच्या फोटोखाली भिंतीवर खिळ्यांनी वाईफची बर्थ डेट कोरून ठेवली आहे. साल्या दाताच्या कवळ्या म्हाग किती झाल्यायेत म्हाइत नाय तुला? - करणार काय? मीच इडियट साला. वाईफचा बर्थ डे विसरलो.
असो. नवीन लग्न झालेल्या वराचा फार वेळ घेऊ नये. असा वेळ घेणारा माणूस पुढल्या जन्मी गुरखा नाही तर दूधवाला भय्या होतो म्हणतात. पण माझा हा उपदेश पाळणा-यास उत्तम संसारसुख प्राप्त होऊन, ताजे मासे, धनधान्य, संतती, संपत्ती, साखर, मुलांना शाळेत प्रवेश, वह्या, बसमख्ये आणि लोकलमध्ये खिडकीजवळची जागा, टेलिफोनवर हवा तोच नंबर मिळणे वगैरे सर्व गोष्टींचा भरपूर लाभ होवोन संसारात सदैव आनंदी, आनंद नांदेल. तथास्तु.

तुझा
पी. एल. काका आणि सुनिता मावशी 
"... पु.ल.चा आणि आमचा संबंध तर कितीतरी वर्षांपूर्वीचा आहे. आमच्या एका कीर्तनाला पु.ल.नी मागे टाळांची साथ देऊन तुकोबांचा एक अभंग रसाळपणे म्हटल्याचे आम्हांला आठवते. तेथपासून आम्ही पु.ल.च्या प्रत्येक गोष्टीचं कौतुक करीत आलो आहोत. ही व्यक्ती एवढी बहुरंगी आहे की, त्यांना काय येत नाही हाच मोठा प्रश्न आहे..."

- आचार्य प्र.के.अत्रे


*अत्रे आणि पुल*
पुढे पु.ल. जे काही सांगतात ते कम्माल आहे!
परंतु कोणाकडे न शिकण्याचं महत्त्व काय? आमच्याकडे सगळ्यांत जास्त शिक्षण कोणाचं झालं असेल, तर ते एकलव्याचं झालं. कारण त्याने मनाने गुरूला वरलं होतं. आमच्याकडे सर्वांत मोठा शिष्य कोण असेल, तर तो एकलव्य! त्याला गुरूचं नावही सांगता येत नव्हतं किंवा त्याची आणि गुरूची भेटही झालेली नव्हती, पण त्याने मनाने गुरूला वरलं होतं. त्याने मनाने वरलेला गुरू कोण, तर धनुष्य-बाण! आणि धनुष्य-बाणाला मनाने वरल्यानंतर त्या धनुष्य-बाणाचं काय कार्य आहे, त्याची ताकद कशात आहे; हे सगळं त्याला उमगायला लागलं. - सुरांची सृष्टी निर्माण करणारा 'आमचा गोविंदा' (१९८५) (पाचामुखी (२०१२)) #पुल #पाचामुखी
*महाराष्ट्राचे लाडके भाई*

*पु.ल.देशपांडे*.
*निधन : १२ जून,२०००*

प्रत्येक मराठी माणसाच्या मर्मबंधातली ठेव म्हणजे पु.ल.देशपांडे. जगभर जिथे जिथे मराठी माणूस पोचला आहे तिथे पु.ल. देखील पोचले आहेतच. अगदी दक्षिण ध्रुवावर असलेल्या दक्षिण गंगोत्री या भारतीय तळावर असलेल्या मराठी माणसांनी सोबत पुलंची पुस्तके नेली आहेत. असे भाग्य अन्य कोणाला लाभले नसावे. त्यांच्या साहित्या व्यतिरिक्त, त्यांचे किस्से ,कोट्या आणि विचार,त्याच बरोबर त्यांनी संगीत दिलेल्या आणि गायलेल्या काही गाण्यांबद्दल माहिती त्यांच्या स्मृतीदिनी आठवणींचा जागर करताना देतो आहे.

*कोट्या*

*मामा नावाची गंमत*

गप्पांच्या ओघात पुल एकदा म्हणाले, ‘ मामा या नावाची गंमतच आहे. त्याला शकुनी म्हणावं, तरी पंचाईत आणि अपशकुनी म्हणावं तरी पंचाईत. ’

*भारती मालवणकर*

पुलंचा हजरजबाबी विनोद हा तर विलक्षण आहे. भारती मालवणकर ही दामुअण्णा मालवणकरांची मुलगी. दिसायला खूपच सुस्वरुप. दामुअण्णांचे दोन्ही तिरळे डोळे मागल्या पिढीतल्या लोकांच्या परिचयाचे आहेत. दामुअण्णांच्या भारतीला पुलंनी प्रथम पाहताच ‘ ही मुलगी बापाचा डोळा चुकवून जन्माला आली आलीय ’ असे उद्गार काढले.

*माणिक वर्मा*

माणिकबाईंचा विवाह फिल्म्स डिव्हिजनमधील अमर वर्मा यांच्याशी झाला. लग्नाची बातमी जेव्हा संगीत जगतात पसरली, तेव्हा काहींनी माणिकताईंचे अभिनंदन केले. काहींनी नाराजी व्यक्त केली. पण या विवाहामुळे जी खळबळ माजली होती, त्यावर पु. लं.नी केलेल्या खुमासदार कोटीमुळे धमाल उडाली .‘अमर वर्मा यांच्याशी माणिक दादरकर यांचा विवाह होत आहे,’असे पु.लं.ना जेव्हा सांगण्यात आले. तेव्हा पु.ल.पटकन म्हणाले, ‘माणिकने वर्मावर घाव घातला की.

*किस्से*

*गुळाचा गणपती*

पु. लं. चा शेवटचा चित्रपट म्हणजे 'गुळाचा गणपती' त्यात सर्व काही पुलंचे होते. कथा,पटकथा,संवाद,गीते, संगीत आणि दिग्दर्शन,एवढेच नव्हे तर नायकाची भूमिकासुद्धा हा चित्रपट सर्वत्र चांगला गाजला. पण पुलंची कमाई काय ? पुण्यात ' गुळाचा गणपती ' प्रकाशित झाला तेव्हा तो चित्रपट पाहण्यासाठी पुलंना साधे आमंत्रण सुद्धा नव्हते. पुलं , सुनीताबाई आणि मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष यांनी तिकिटे काढून चित्रपटाचा पहिला खेळ पाहिला.

*प्रतिशब्द*

मराठी प्रतिशब्दांच्या बाबतीत असंच एकदा बोलणं चाललं असताना पुलंनी विचारलं, ‘एअर होस्टेस ला आपण ‘हवाई सुंदरी’ म्हणतो,तर नर्सला ‘दवाई सुंदरी’ का म्हणू नये ? आणि वाढणा-याला आपण जर ‘वाढपी’ म्हणतो, तर वैमानिकाला ‘उडपी’ का म्हणू नये ?’

*संजय उवाच*

आणीबाणीनंतरच्या निवडणुकांच्या प्रचारधुमाळीत इंदिरा गांधींच्या वीस कलमी कार्यक्रमाची भगवद्गीतेशी तुलना केली होती. परंतु गीतेचे अध्याय अठरा असताना अशी तुलना का केली असावी, असा प्रश्न पडल्याचं सांगून पु.ल. म्हणाले,'मी पुन्हा गीता उघडली. सुरुवातीलाच ‘ संजय उवाच ’ असे शब्द आढळले आणि मग मला सगळा उलगडा झाला’

*माझ्या बंधू आणि भगिनींनो*

पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात पुलंच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात त्यांच्या असंख्य चाहत्यांपैकी काही निवडक जणांची प्रातिनिधिक भाषणं होणार होती. त्यात सुप्रसिद्ध वैज्ञानिक जयंतराव नारळीकरांचं नाव होतं.

भाषणाला सुरुवात करताना गर्दीचा वेध घेत नारळीकर म्हणाले,‘ सभ्य स्त्रीपुरुष हो... मी नेहमीप्रमाणे भगिनींनो म्हणत नाही, कारण समोरच माझी पत्नी बसलेली आहे.

’त्यानंतर पु.लं. जेव्हा बोलायला उभे राहिले, तेव्हा जयंतराव नारळीकरांच्या दाद मिळालेल्या भाषणाचा सूर पकडत भाषणाची सुरुवात करत म्हणाले,‘बंधू आणि भगिनींनो... समोर माझी पत्नी बसलेली आहे, तरीही मी ‘ बंधू आणि भगिनींनो... ’ अशीच सुरुवात करतोय, कारण ती मला ‘ भाई ’ म्हणते ’


*द्राक्ष संस्कृती आणि रुद्राक्ष संस्कृती*

तुमचं कुठलं यमक चांगलं जुळलं ? असं विचारल्यावर ते म्हणाले . मी पॅरिसला गेलो होतो . तिथं शॅम्पेन घेताना त्यांच्या आणि आपल्या संस्कृतीत फरक काय, असं कुणी तरी विचारल्यावर मी चटकन म्हणालो, ‘ तुमची द्राक्ष संस्कृती आणि आमची रुद्राक्ष संस्कृती

*हवाई गंधर्व*

पंडित भीमसेन जोशी यांचे साऱ्या देशभर आणि परदेशात सारखे दौरे सुरु असायचे. त्या मुळे त्यांच्या वारंवार होणाऱ्या विमानप्रवासांमुळे त्यांना पु. ल. देशपांडे यांनी गमतीने ‘हवाई गंधर्व' ही पदवी बहाल केली होती.


*पु.लं चे विचार*

जगा इतके की आयुष्य कमी पडेल. हसा इतके की आनंद कमी पडेल.

भरलेला खिसा माणसाला जग दाखवतो आणि रिकामा खिसा जगातील माणसं दाखवतो.

खरं तर सगळे कागद सारखेच. फक्त त्याला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.

काही माणसे जन्मता असे काही तेज घेऊन येतात, की त्यांच्यापुढे मी मी म्हणणारे देखील हतबल होतात.

मैत्रीची व्याख्या करताना ते म्हणतात

*भेटी आणि गाठी*
एखाद्या माणसाची आणि आपली वेव्हलेंग्थ का जमावी आणि एखाद्याची का जमू नये याला काही उत्तर नाही. पंधरा पंधरा वीस वीस वर्षांच्या परिचयाची माणसं असतात पण शिष्टाचाराची थोडीशी घडी मोडावी या पलिकडे त्यांचा आपला कधी संबंध जात नाही. त्यांच्या घरी आपलं येणं जाणं होतं, बोलणं चालणं होत, पण भेटी झाल्या म्हणून मनाच्या गाठी काही पडत नाहीत. तर काही माणसं क्षणभरात अनेक वर्षांचा दुवा साधून जातात. अगदी आपलीशी होतात. हवी हवीशी वाटतात. तिथे स्थलभेद, लिंगभेद, आवडी निवडी काही काही आडव येत नाही, सूत जमून जातं आणि गाठी पक्क्या बसतात. आयुष्यात काही मनसुबे असे पटकन जुळतात आणि आनंद देतात. ही नाती खासगी असतात, नाजूक असतात. जेवढ्या लवकर ती जुळतात तेवढया लवकर ती नासण्याचाही संभव असतो. मला वाटत अशा नात्यांनाच मैत्री हे नाव दिलं गेलं असावं. तसे परिचयाचे पन्नास असतात हो आयुष्यात, पण मैत्री सार्थ करणारे मित्र कमी सापडतात बहुधा. मैत्री एक सोपी व्याख्या आहे.

'रोज आठवण यावी अस काही नाही, रोज भेट व्हावी अस काही नाही, एवढंच कशाला रोज बोलणं व्हावं असही काहीच नाही. पण मी तुला विसरणार नाही ही झाली खात्री, आणि तुला याची जाणिव असणं ही झाली मैत्री.

अशी सोपी सरळ पण घट्ट मैत्री टिकवणं निर्माण करणं फार कठीण नाही आणि फार सोपही नाही.चांगले मित्र आणि औषधे ही आपल्या आयुष्यातील वेदना दूर करण्याचे काम करतात. फरक इतकाच की औषधांना एक्सपायरी डेट असते,मित्रांना नाही.

*गीतकार पु .ल.*

वायदा केला विसरू नका
संसाराच्या सारीपाटाचा
सांगते ऐका,पैशाला दोन बायका


*संगीतकार पु.ल*
पुलंनी खूप गाण्यांना अतिशय सुंदर संगीत दिलं आहे.त्या मुळे ही गाणी श्रवणीय झाली आहेत.त्यांनी संगीत दिलेली काही गाणी

इंद्रायणी काठी देवाची आळंदी
कबीराचे विणतो शेले
तुझ्या मनात कुणीतरी लपलं ग
माझे जीवन गाणे
नाच रे मोरा आंब्याच्या वनात
शब्दावाचून कळले सारे
हसले मनी चांदणे
ही कुणी छेडिली तार

*गायक पु.ल*
पुलंनी काही गाणी देखील गायली आहेत

जा जा ग सखी जाऊन
पाखरा जा त्यजूनिया प्रेमळ शीतल छाया
बाई या पावसानं
ललना कुसुम कोमला

पु.ल. देशपांडे यांच्या घरी चोरीचा प्रयत्न झाला होता.

पुण्यातल्या भांडारकर रोडवरच्या मालतीमाधव या इमारतीमधील त्यांच्या बंद फ्लॅट मधे चोरीचा प्रयत्न झाल्याची घटना घडली होती. *लक्ष्मीच्या शोधात आलेल्या चोरांना बघेल तिकडे फक्त सरस्वतीचे दर्शन होत होते.त्या मुळे काहीही चोरीला गेलं नाही.रिकाम्या हातानी त्यांना परत जावे लागले.*

पु.लं.च्या अंत्य यात्रेचे थेट प्रक्षेपण सह्याद्री दूरदर्शनने केले होते .एखाद्या साहित्यिकाबाबतीत असे बहुदा प्रथमच घडले असेल.

तुमच्या आमच्या सर्वांच्या लाडक्या पु.ल. (भाई) बद्दल काही लिहायला मिळाले हे तर माझे भाग्यच.

पुलंच्या स्मृतीस विनम्र अभिवादन .

प्रसाद जोग.सांगली.
९४२२०४११५०
गोविंदराव टेंबेंनी हे वाद्य प्रतिष्ठेला नेऊन पोहोचवलं. ह्या वाद्यामध्ये ख्याल वाजवता येतो, नव्हे ख्याल गायल्यासारखा वाटतो, हे त्यांनी दाखवून दिलं. त्यापूर्वी 'बाजूला टाकलेलं एक साथीचं वाद्य' अशा रितीनेच पेटीकडे पाहिलं जायचं. - सुरांची सृष्टी निर्माण करणारा 'आमचा गोविंदा' (१९८५) (पाचामुखी (२०१२)) #पुल #पाचामुखी
*पु.ल*
"परवाच मी एका लहान मुलाला विचारलं की तू कितवीत आहेस म्हणून तर तो, केजी-केजी असं काहीतरी म्हणाला.
म्हणजे हल्ली मुलं शाळेत वजनावर घेतात हे मला ठाऊक नव्हतं.
आमच्या वेळेस जर तसं असतं तर मी माझ्या तेव्हाच्या वजनानुसार एकदम सातवीत जाउन बसलो असतो."
*(बिगरी ते मॅट्रीक)*
गोविंदरावांनी ह्या वाद्याला असं मोठेपण दिलं, जसं मोठेपण बिस्मिल्ला खाँसाहेबांनी सनईला दिलं. नाहीतर सनई देवळातल्या कुठल्या कोपऱ्यात वाजते ते माहितीही नसायचं. - सुरांची सृष्टी निर्माण करणारा 'आमचा गोविंदा' (१९८५) (पाचामुखी (२०१२)) #पुल #पाचामुखी
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
चाफ्याच्या झाडा, चाफ्याच्या झाडा.. सुनिता देशपांडे
सुनीता पुरुषोत्तम देशपांडे
(माहेरचे नाव .सुनीता ठाकूर)

जन्म दिन ३ जुलै,१९२६.

सुनिता देशपांडे ह्यांनी पु. ल. देशपांडेंच्या जीवनपटलावरती धावती नजर फिरवणारे, व त्यांच्या व्यक्तीमत्त्वातील विविध पैलूंवर प्रकाश टाकणारे “आहे मनोहर तरी” या नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे. या आत्मचरित्राला सगळ्या मराठी साहित्यप्रेमींकडून भरपूर दाद मिळाली.

*आठ आण्यात लग्न* म्हणून स्वतः सुनीता देशपांडे यांनी लिहिलेला लेख इंटरनेटवर वाचायला मिळाला. त्या मध्ये आजपर्यंत मला माहीत नसलेली गोष्ट वाचायला मिळाली,ती अशी >>

दादर माटुंगा परिसरात जावळे नावाचे गृहस्थ शाळा चालवायचे ,तिथे पु.ल. आणि सुनीताबाई दोघेही शिक्षक म्हणून काम करत असताना त्यांचे प्रेम जुळले. पुलं यांचे आधी कर्जत च्या दिवाडकरांच्या मुलीशी मोठ्या डामडौलात लग्न झाले होते ,परंतु लग्ननंतर लगेचच त्या मुलीचे मोठा ताप येऊन निधन झाले होते,त्या मुळे सुनीताबाई यांच्या आईचा या बिजवर आणि परजातीय मुलाशी लग्न करून द्यायला विरोध होता पण वडिलांनी पुढाकार घेऊन त्यांचे १२ जुन १९४६ रोजी रजिस्टर लग्न करून दिले.

पुलं सोबत विवाहबध्द होउन त्यांनी संसाराची धुरा आनंदाने व यशस्विरित्या पेलली “सोयरे सकाळ”, “प्रिय जी.ए.”, “समांतर जीवन”, “मण्यांचीमाळ”, याशिवाय “मनातलं अवकाश” हा सुनिता देशपांडे यांचा लेखसंग्रह, २००४ ते २००६ दरम्यान विविध वर्तमान पत्र तसेच दिवाळी अंकांमधुन प्रसिध्द झालेल्या लेखाचं पुस्तकही वाचकांच्या पसंतीस उतरले. यासोबतच अनेक विषयावरील दर्जेदार पुस्तके व कादंबर्‍या लिहून सुनिता देशपांडे यांनी चौकस व प्रतिभावंत लेखिका म्हणुन स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली.

त्यांनी पुलंबरोबर अनेक नाटकांत काम केले. तसेच 'वंदेमातरम्' या राम गबाले दिग्दर्शित चित्रपटातील त्यांची भूमिका अतिशय गाजली होती. 'नवरा बायको' या चित्रपटातही त्यांनी काम केलेले आहे. 'राजमाता जिजाबाई' हा एकपात्री प्रयोगही त्यांनी रंगवला होता. पुलंच्या 'सुंदर मी होणार' मधील दीदीराजे ही मध्यवर्ती भूमिका सुनिताबाईंनी साकारली होती.

या दानशूर दाम्पत्याने मिळवलेला पैसा विविध समाजोपयोगी संस्थांना भरभरून देऊन पैसे कशासाठी मिळवावेत आणि ते कसे खर्च करावेत याचा आदर्शच घालून दिला आहे.

७ नोव्हेंबर २००९ रोजी सुनिता देशपांडे यांचे वृध्दापकाळाने निधन झाले.

सुनीताबाई काव्यवाचन खूप छान करायच्या त्या पैकी दोन कवितांची लिंक सोबत देत आहे.

चाफ्याच्या झाडा (पद्मा गोळे यांची कविता)
https://youtu.be/i5_jgK1ggkM

तव नयनांचे दल हले ग (ब.भ.बोरकर यांची कविता)
https://youtu.be/x8td9mmlA30

सुनीता देशपांडे यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन .

प्रसाद जोग.सांगली.
९४२२०४११५०
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
सुनिता ताइ देशपांडे यांनी सादर केलेली सुंदर मराठी कविता.. *जाईन दूर गावा.. *