Niranjan's Blog☘️
16.7K subscribers
784 photos
7 videos
64 files
154 links
Personal blog of Niranjan Kadam, Asst. Commissioner of State Tax(GST)


#जगण

https://www.niranjanblog.in

Initiative for Financial Awareness👉 @arthyog2024
Download Telegram
ती दूमडून ठेवलेली नोट अजूनही तशीच आहे... कधीतरी गावाकडून शहरात जाताना आई-आज्जी आपल्या हातावर टेकवायची... आताशा शहराकडे जाताना उलट होतंय एवढंच.. नोकरी अन् पगाराचं हे सर्वात मोठं समाधान वाटतं😌

#जगण
आयुष्यासाठी काही वाटा आपण निवडतो तर कधीतरी काही वाटा आयुष्य आपल्यासाठी निवडतं.. काही का असेना.. आपण फक्त चालत रहायचं.. निरंतर..

#जगण
छोट्या छोट्या गुंत्यांपासून सुटका करून घेण्यासाठीच्या धडपडीत माणूस मोठ्या गुंत्यांमध्ये अडकू लागतो...

#जगण
समाज माध्यमांतल्या चकचकीत आणि रंगीबेरंगी जगासोबत आपण आपल्या कृष्णधवल वास्तवाची तुलना करून स्वतःवर खूप मोठा अन्याय करतो.. समाजमाध्यमांमध्ये दाखवलं जाणारं जग वास्तवातल्या जगातले काही रंगवून सादर केलेले तुकडे असतात.. एरव्ही वास्तव मात्र हे आणि यामागे लपविलेले अनेक तुकडे, त्यांना जोडणारे कितीतरी धागे आणि जागोजागी लावलेली ठिगळं असं काहीसं असतं.. काही जण तथाकथित यशवंत आणि बाकी सगळे अपयशी असं चित्रण फार घातक आहे.. एखाद्या परिक्षेतल्या यशाने किंवा एखाद्या नोकरीने एखाद्याच्यावर जगाने यशस्वीतेचा शिक्का मारला म्हणजे तो आयुष्यात यशस्वी होतो असं नाही.. अमुक एक गोष्ट मिळाली तरच माझ्या आयुष्याला अर्थ आहे असा जो भ्रम आपण बाळगतोय त्याला काडीचाही अर्थ नाही.. जन्माला आलेला प्रत्येक जणच पोटापाण्यासाठी काही ना काही धडपड करतोच.. संधी मिळेल तशी ही धडपड पुढे पुढे जात राहते.. आपला जन्म कुठे व्हावा हे आपल्या हातात नसतं.. काही जणांना बऱ्याच चांगल्या गोष्टी जन्मासोबतच मिळतात.. privileges.. तर काहींना त्यांच्या जन्मासोबतच जबाबदाऱ्या अंगावर पडतात.. अशात पुढे जाण्याच्या, पोटापाण्यासाठीच्या संधी मिळण्यामध्ये फरक हा पडणारच.. काही जण अडचणींवर मात करून संधी मिळविण्यासाठी धडपडत असतात.. मिळेल त्या संधीचं सोनं करतात.. तर काही जण खूप धडपड करूनही नाही जमत त्यांना फारसं काही.. धडपड न करणाऱ्यांचं ठिक आहे पण धडपड करूनही विशेष काही हाती न पडणाऱ्याच्या माथी अपयशाचा शिक्का मारणं फार चुकीचं आहे. जग मात्र ते निष्ठूरपणे करत असतं.. आपल्याला यातून सुटायचं असेल तर जगाच्या या शिक्क्यांना झुगारता आलं पाहिजे.. तथाकथित यश आणि अपयश या दोन्ही शिक्क्यांना आपल्याला झुगारून देता यायला हवं.. आपल्याला जगाकडून मिळणारा तथाकथित मानसन्मान किंवा हेटाळणी ही आपल्या 'उपयोगीता किंवा उपद्रव मुल्यावर' आधारित असते. एकदा ते झुगारून देता आलं की आपण जरा शांतपणे आपल्या कामावर लक्ष देऊ शकतो. जगाने आपल्या भोवती खूप साऱ्या भ्रमांचे सापळे विणून ठेवले आहेत.. तथाकथित यश-अपयश हा तसाच एक सापळा.. आपण त्यामध्ये सातत्याने अडकून पडतो.. कित्येकदा तर कळतच नाही.. कधीतरी कळलं तरीही तेच सोईचं आहे म्हणून आपण त्यातच जगू पाहतो.. पण सोय जपली गेली तरीही शेवटी सापळेच ते..

#जगण
'इच्छा आणि त्यांची पुर्तता' यातलं जे अंतर असतं त्या दरम्यान आपण जसं जगतो ते आपलं खरं जगणं असतं.. कारण आयुष्यात इच्छा कधीच संपत नाहीत आणि सगळ्याच इच्छा पूर्ण होतील असंही नाही. बरं इच्छा पूर्ण व्हायच्या म्हटलं तरीही वाट पाहणं आलं.. वेटिंग पिरियड आला.. आपल्या आयुष्यातला बहुतांश काळ असा वेटिंग पिरियड असतो.. म्हणूनच यामध्ये आपण कसं जगतो ते खूप महत्त्वाचं असतं.. तेच आपलं खरं जगणं असतं..

~निरंजन🌿

#जगण
कधी कधी काही बाबतीतले आपले प्रयत्न हे चालत्या बसमध्ये धावण्यासारखे असतात. आपल्याला हव्या त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी ती बस धावेल त्याच वेगाने आपण पोहोचणार असतो. आपण कितीही धावपळ करून काही अर्थ नसतो. पण दुसऱ्या बाजूला शांत बसणंही जमत नसतं. कुठेच लक्ष लागत नसतं. अशात कुणी 'प्रवास एन्जॉय करता यायला हवा' असा भंपकपणा फेकत असेल तर त्याला तर खाऊ की गिळू असं व्हायला होतं. आपल्याकडे लोकांना गोष्टी आयडियलाईज करून ठेवण्याची फार हौस असते. पण हे सगळं करण्याच्या नादात बऱ्याच जणांना हे मात्र कळत नाही की प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं. त्यातलं वास्तव अनेकांच्या कल्पनाविश्वाच्याही पलीकडचं असतं. चौकटीच्या बाहेरचं जग फार निष्ठूर असतं. ते मल्टिपल चॉईस नसतं आपल्या परिक्षेतल्या सारखं. ते निव्वळ जसं आहे तसं स्वीकारावं लागतं. अशात आयडियलाईज करून ठेवलेल्या गोष्टी तुम्ही फुटपट्टी म्हणून वापरू शकत नाहीत. जगाने ठरविलेल्या फुटपट्ट्यांवर तुम्ही कायमच अपयशी ठरत रहाल. अलीकडेच कुठेतरी ऐकलं होतं यश मिळवणं आणि यशस्वी जीवन जगणं यात फरक असतो. कधी तरी यातली एक गोष्ट जमेल पण दुसरी जमणार नाही तर कधी दोन्हीही जमतील आणि कधीतरी दोन्हीही जमणार नाहीत. पण तरीही काहीच हरकत नाही. यश मिळवणं काय किंवा यशस्वी जीवन जगणं काय शेवटी हे सगळं शक्य होण्यासाठी जसं जमेल तसं आपलं 'जगणं' हीच सर्वात मोठं गोष्ट आहे. ते जगत रहायचं बाकी होत राहील..

~निरंजन🌿

#जगण
क्षितिज...

आयुष्यात काही वेळा आपले निर्णय चुकल्यासारखं वाटतं. आयुष्यात मागे जाऊन ते बदलता येत नाहीत त्यामुळे त्या निर्णयांची जबाबदारी स्वीकारणं खूप गरजेचं होतं. आपल्या निर्णयांची जबाबदारी आपण कितीही प्रयत्न केला तरीही झुगारून देऊ शकत नाही, नाकारू शकत नाही. आपल्याला ती स्वीकारावीच लागते.. तीही कुठल्याही अटी-शर्ती विना.. आणि फक्त जबाबदारीच नाही तर आपल्या निर्णयांचे भले-बुरे परिणामही स्वीकारावे लागतात आपल्याला. हा स्वीकार जेवढा लवकर आणि जेवढ्या खुल्या मनाने आपण करू तेवढं आपल्याला पुढे जाण्यासाठी बरं पडतं. स्वीकार केल्याने आयुष्यातलं ओझं कमी होत नाही पण मनावरचं ओझं मात्र कमी होतं.. प्रवासात वाट चुकलेल्या अन् थकलेल्या माणसाला पुढे जायचं असेल तर ओझं कमी करणं आवश्यकच असतं. अशात एरव्ही आपण कसाही हिशोब मांडला तरीही नुकसानीची बाजूच जास्त दिसू लागते खरी पण न मागता गाठीशी आलेला अनुभव मात्र जमेच्या बाजूला गाठीशी असतो. भांबावून गेलेल्या माणसाला त्याचं महत्त्व फारसं कळणार नाही पण हरकत नाही. तो अनुभव आयुष्यभर कामी येणारा असतो. ठरवलेल्या ठिकाणी पोहोचण्यासाठी निघालेल्या माणसाने भलतच कुठेतरी पोहोचलो म्हणून रडताना हे विसरू नाही की आपण किमान कुठेतरी पोहोचलो तर आहोत शिवाय अनुभवही मिळालाच की तो काही घरी बसून मिळू शकला नसता. आता कुठेतरी पोहोचायचं म्हणजे उंबरठा ओलांडावा लागतोच. चालायचं म्हटलं की ठेचा सहन करायची तयारी ठेवावी लागतेच. इथे आपण तर आपल्या पिढ्यानपिढ्या कधी कुणी चाललं नसलेल्या वाटेवर चालू पाहतोय. इथे ठेचा लागतील, काटे टोचतील, पायच काय सारं शरीर रक्तबंबाळ होईल.. शरीरच काय मनही जखमी होईल.. मनाच्या सांधी-कपारीत साऱ्या भावना दुखावलेल्या सापडतील.. मलूल झालेल्या चेहऱ्याचं एकवेळ ठीक असतं काहीतरी वरून फासता येतं त्यावर... पण मलूल झालेल्या मनाचं काय करायचं? त्याला कसं सावरायचं? भरीस भर कधीतरी वाटाही चुकतील...

पण, असं असलं तरीही थकून अन् हतबल होऊन कसं चालेल.. थकल्या भागल्या शरीराला आणि मनाला पुन्हा पुन्हा तयार करावं लागतं.. पुन्हा चालावं लागतं.. चालताना काही लोक भेटतात ते म्हणतात "तुम्ही मृगजळामागे धावत आहात" त्यांना कुणी सांगावं आम्ही ज्यामागे धावतोय ते क्षितीज आहे. असं काही ऐकून तर ते अधिकच हसतील. त्यांनी वाचलेलं क्षितीज म्हणजे ते आभासी ठिकाण जिथे आभाळ धरतीला स्पर्श करतं, आपण जेवढं चालत जाऊ तेवढं क्षितिज पुढे जाऊ लागतं. मग आपण क्षितिज गाठणार कसं? आपल्यासाठी क्षितिज म्हणजे आपण पाहू शकतो ते शेवटचं ठिकाण.. म्हणजे आपल्या नजरेतलं दिसणारं शेवटचं ठिकाण असतं ते क्षितिज.. तेच ते जिथे आकाश धरतीला स्पर्श करेल वगैरे.. म्हणजे त्याअर्थी क्षितिज म्हणजे आपल्या मर्यादा.. जेव्हा आपण त्याच्या दिशेने चालू लागू ते क्षितिज लांब जाऊ लागेल. पण आपण पुढे जातो आहोत तसतशा आपल्या कक्षा रूंदावत आहेत.. आपल्या नजरेच्या टप्प्यात कालपर्यंत येतच नव्हतं ते आज येत आहे. एका अर्थी आपण क्षितिजापारचे क्षितिज गाठू पाहतो आहोत. चालत राहणं ही आपल्यासाठी इच्छा नाही तर गरज आहे. म्हणून चालत राहूयात नवी क्षितीजं गाठत राहूयात..

~निरंजन🌿

#जगण
रविवारच्या लोकसत्ताच्या लोकरंग पुरवणी मध्ये एका काव्यसंग्रहाबद्दलच्या परिचय लेखातील या ओळी आहेत. तयारीच्या काळात लागलेल्या आणि अजूनही टिकलेल्या चांगल्या सवयींपैकी एक म्हणजे लोकसत्ताचे वाचन. रविवारी वेळ मिळाला नाही म्हणून पुरवणी तशीच पडून होती काल दुपारी जेवण करता करता या ओळींकडे लक्ष गेलं आणि तेवढा फोटो घेऊन ठेवला होता. असं म्हणतात की जे रिलेट होतं तेच जास्त भावतं.. असंच काहीसं असेल हे ही. थोडावेळापुर्वी इकडे शेअर केल्यावर आपल्यातल्या कविता करणाऱ्या आणि कविता जगणाऱ्या मित्रमैत्रिणींनी पाठविलेल्या या अशाच काही ओळी मुद्दाम शेअर केल्यात. वेदनेमध्ये, दुःखामध्ये खूप मोठं सृजन लपलेलं असतं.. ते शोधता आलं तर दुःख व्यक्त होणं सोपं होतं.. हे सगळं वाचून मला मीच कधीतरी लिहिलेली एक ओळ बऱ्यापैकी खोटी असल्याचं एक समाधान मिळालं.. ती ओळ म्हणजे,

सुखाला भाषा असते.. दुःख मात्र मुकं असतं...

~निरंजन🌿

#जगण
दुरून दिसणारं perfect चित्र जवळून पाहिल्यावर तेवढंच perfect दिसत नाही. Perfection चा अट्टाहास हीच खरी समस्या असते. ते ठीकच आहे पण साध्यासुध्या अपेक्षाही पुर्ण होत नसल्या की माणसाला सगळंच निरर्थक वाटू लागतं. शेवटी आवडो न आवडो, पटो न पटो आयुष्यातल्या बऱ्याच गोष्टी जशा आहेत तशाच्या तशा स्वीकारत पुढे जात रहावं लागतं. या सगळ्यात ना कुठलं मोटीवेशन टिकतं ना कुठली कृत्रिम सकारात्मकता. वरवर कितीही छान गोंडस चित्र आपण रंगवून ठेवलं तरीही कधीतरी त्यातले रंग उडून जातातच.. अशात करावं काय तर.. धडपड करत रहावी अन् पुन्हा उठून जमेल तसं रंगवावं तेच जुणं चित्र.. आपल्याला जवळून ते कितीही रंगहीन वाटलं तरीही किमान दुरून पाहणाऱ्याला तरीही छान दिसेल.. तेवढंच काहीतरी आपल्या हातून चांगलं घडेल..

#जगण
आयुष्यात कधीतरी एखादा असा टप्पा येतो जेव्हा आपण आयुष्यात पाळून ठेवलेले बरेच समज हे मुळात गैरसमज होते हे कळतं. कधीतरी रंगीबेरंगी वाटलेलं चित्र तेव्हा बेरंग वाटायला लागतं. सगळंच निरर्थक वाटू लागतं. सगळं काही मिथ्या वाटू लागतं.. निव्वळ भ्रम वगैरे.. पण हे फक्त वाटत असतं.. पटत नसतं.. 'वाटणं' आणि 'पटणं' यात बराच फरक असतो. खरंतर याही पलीकडे एक गोष्ट असते ते म्हणजे 'असणं'. एखादी गोष्ट अमूक अशी आहे किंवा नाही असं वाटणं वेगळं तसं वाटलेलं आपल्याला पटणं वेगळं आणि ती मुळातच तशी असणं वेगळं.. वाटायला आपल्याला काहीही वाटू शकतं पण गरजेचं नाही की सर्व गोष्टी आपल्याला वाटतं तशाच असतील. पण अशा वेळी नाही कळत काहीच. या टप्प्यावर माणूस एक तर सगळं सोडून देऊ पाहतो नाहीतर आहे नाही तेवढं अवसान जमवून पुन्हा एकदा लढू पाहतो. यातला लढू पाहणारा माणूस जिंकतो. रूढार्थाने तो जिंकेल किंवा हरेलही.. पण तो ती परिस्थिती जिंकलेला असतो.. परिस्थितीला जिंकावं लागतं.. बाकी जगाच्या जिंकण्या हरण्याच्या व्याख्या फार तकलादू असतात.. निव्वळ तकलादू.. कधीतरी ज्याला काडीचीही किंमत दिली जात नव्हती अशा माणसाने एखादी परीक्षा पास होऊन एक नोकरी मिळवली तर डोक्यावर घेऊन नाचणारं हे जग आहे.. निव्वळ सोयीस्कर गोष्टी पाहणारं.. याला फार मनावर घेतलं तर पहिला बळी आपल्या 'मनाचा' जातो. एकदा मनाचा बळी गेला की आपण आपण रहात नाही. आपणही या जगाचा एक भाग होऊन जातो. त्याच यश अपयशाच्या त्याच ठोकळेबाज व्याख्यांमध्ये अडकून पडणाऱ्या आणि सर्वांनाच त्या भंपक व्याख्यांमध्ये बांधू पाहणाऱ्या जगाचा एक भाग... तर या व्याख्यांना जरा हातभर दूर ठेवून त्या परिस्थितीला मनापासून धन्यवाद द्यायला हवेत. ती परिस्थिती जग नावाच्या रंगीबेरंगी गोष्टी वरचे खोटे मुखवटे हटवून खरंखुरं विद्रूप रूप जाणून घेण्याची संधी देते.. म्हणून त्या परिस्थितीला धन्यवाद देऊन पुर्ण ताकदीने लढायचं ते फक्त त्या परिस्थितीशी.. आणि हो मनाला सांगून ठेवायचं ठामपणे.. "बाबा रे, तूला हे सगळं करायचं आहे.. करून दाखवायचं वगैरे नाही" कारण करून दाखवलेलं पाहणाऱ्या जगाचं विद्रूप रूप तु आधीच पाहिल आहेस, अनुभवलं आहेस.. त्यामुळे दाखवण्याच्या फंदात पडू नकोस.. तु फक्त स्वतःसाठी कर.. त्या अवघड टप्प्यावर तु जगाकडून मिळालेली निंदा पाहिली आहे, सहन केली आहे ती विसरू नको कधीच.. कारण तेच सत्य आहे बाकी उद्या तु रूढार्थाने जिंकल्यानंतर हे जग तुझ्यावर डोळे दिपवून टाकणाऱ्या स्तुतीचा प्रकाशझोत टाकू पाहिल.. त्याने बिथरून जाऊ नकोस.. अर्थात कारण तुला माहिती आहे.. तुला माहिती आहे ते सगळं तुझ्यासाठी नाहीये.. कधीच नव्हतं आणि कधीच नसणार आहे.. जे दिसेल किंवा वाटेल की दिसतंय ते तुझ्यासाठी नाही तर तुला मिळालेल्या कुठल्याशा ओळखीसाठी असेल.. तथाकथित यशासाठी असेल.. व्याख्यांच्या पूर्ततेसाठी असेल...

#जगण
आयुष्यात फार कमी गोष्टी असतात जिथे आपल्याला निवडीची संधी असते.. बाकी सगळं तर फक्त स्वीकारत जावं लागतं..

#जगण
सोंगट्या...

सूर्याला तरी आवडत असेल का खरंच स्वतःला जाळून घेणं.. तप्त ज्वाळा लेऊन सदानकदा तळपत राहणं..

सूर्याचा विषय निघला की न राहवून मोहवणाऱ्या चंद्राची आठवण होतेच.. कधीतरी प्रश्न पडतो की सूर्याला चंद्राचा हेवा वाटत नसेल का? कारण चंद्राला सर्वांचं प्रेम लाभतं. लहान मुलांपासून प्रियकर प्रेयसी पर्यंत सर्वांना तो हवाहवासा वाटतो.. प्रत्यक्ष शिवशंकरानेही शिरावर चंद्र धारण केला आहे. चंद्राच्या कलांवर भाळून कितीतरी कवी शब्दांचे सिंचन करतात.. चंद्र मग तो प्रतिपदेचा असो की पौर्णिमेचा तो हवाहवासा वाटतो. चतुर्थी असो की रमजान चंद्रच पहायचा असतो सर्वांना.. नाही म्हणायला सणांमध्ये सूर्याच्या वाट्यालाही आले आहेत काही सण पण चंद्र येथेही भाव खाऊन जातो. चंद्राला महिनाभरातून एक हक्काची सुट्टी अमावस्येच्या रूपाने मिळते.

पण ज्या सूर्यापासून चंद्राला प्रकाश प्राप्त होतो त्या सूर्याचं अस्तित्व मात्र प्रचंड खडतर असतं..तो सातत्याने पेटता राहतो.. प्रज्वलित राहतो.. असं नाही की माणसांना सूर्य आवडत नाही. आवडतो ना.. पण तो उगवता किंवा मावळता सूर्य.. लोभस वाटणारा.. पण भर दुपारी डोईवर तळपणारा सूर्य मात्र कुणालाही आवडत नाही.. नको नकोसा होतो.. पण सूर्याला मात्र सर्व वेळी सूर्य बणून जगावंच लागतं.. सूर्य म्हणून तळपावं लागतं.. स्वतः प्रज्वलित राहून जगाला उर्जा आणि प्रकाश पुरवावा लागतो.. एवढंच काय तर जगाला लोभस वाटणाऱ्या चंद्रालाही प्रकाशमान करावं लागतं तेही सूर्यालाच. पण सूर्याला आवडत असेल का हे सगळं.. त्याला खरंच मन आणि भावना असत्या तर.. सुदैवाने तसं नाही हे त्या सूर्यावर उपकारच म्हणायचे..

बहूदा नियतीच्या खेळातल्या सोंगट्यांना आवड अन् नावड नसते.. त्यांना फक्त जे नियतीने वाटून दिलंय ते करत रहावं लागतं.. अगदी विनाअट.. विनातक्रार..

माणसाच्या आयुष्यातही काहीवेळा असेच काही प्रसंग येतात.. कधीतरी तर काही काळ सातत्याने चालणाऱ्या काही अवस्था येतात. जेव्हा माणसाला त्याच्या आवडीनिवडी पाहण्याचीही सवड उरत नाही.. उलट त्याला प्रश्न पडतो की नियतीच्या सारीपाटावरच्या सोंगट्याच आहोत आपण तर मन नावाची गोष्ट तरी का दिली असेल आपल्याला..

कधीतरी नियती आपल्याला सूर्यासारखं जगायला लावत असावी.. नियतीच्या खेळातल्या सोंगट्यांसारखं आपलं आयुष्यं सुरू असतं.. सोंगट्या पडतील तसं आयुष्य जगत रहायचं पुढे जात रहायचं.. उगवायचं अन् अस्तापर्यंत तळपत रहायचं..

~निरंजन🌿

#जगण
माझ्यातला मी...

..माझं हे जे काही चाललंय आणि ज्याला मी लाईफ किंवा जगणं वगैरे म्हणतोय त्यात बरं चाललंय म्हणावं असं फारसं काहीही नाहीये... उलट गंडल्यासारखं वाटतंय सगळंच.. फेक वाटतंय सगळं.. येस.. सगळं फेक वाटतंय.. विचार, बोलणं, आशा, निराशा, अपेक्षा, स्वप्नं, वागणं, जगणं.. सगळंच.. पण या सगळ्यापेक्षा जास्त माझ्यातला 'मी' फेक वाटू लागलाय.. मला सगळं ठाऊक असतं.. सगळं कळतं.. कळूनही मी सोईनुसार कळून न कळल्यासारखं करत असतो.. कळतंय पण वळत नाही असं उगाच स्वतःचं सांत्वन करण्यासाठी म्हणत असतो.. खरंतर मला काही वळवून घ्यायचच नसतं मुळात.. कारण तेच माझ्या सोईचं असतं.. सोय जपली गेली की पुरेसं असतं मला.. सारं काही सोयीस्कर चाललेलं असतं माझं म्हणून माझ्यातला मी मला सर्वाधिक फेक वाटतो.. कबीर साहेब म्हणून गेलेत ना.. "जो दिल खोजा आपना, मुझसे बुरा न कोय ॥" तसंच काहीसं.. कधीतरी काय अगदी कित्येकदा वाटतं यात राम नाही.. सोडून द्यावं हे सगळं.. निघून जावं कुठेतरी..
हे सगळं असूनही.. हे सगळं कळूनही.. मी सगळं निभावून नेत असतो.. पुढे जात असतो.. एक निरर्थकता कळूनही अर्थाशिवाय अर्थ नाही म्हणत दुसऱ्या अर्थाच्या नादात का होईना मी पुढे जात असतो.. कदाचित रडत पडत जात असेल.. कदाचित अडखळत जात असेल.. कदाचित अजून काही असेल.. पण मी पुढे जात असतो.. या पुढे जात राहण्याच्या कौतुकापायी माझ्यातल्या फेक वाटणाऱ्या 'मी' ला आजवर खूप वेळा माफ केलं आहे.. पुढेही करत राहील.. कारण मला माझ्या पुढे जात राहण्याची निकड या सगळ्या विचार कलहापेक्षा मोठी वाटते.. यातही मला कबीर साहेब मदत करतात.. ते म्हणतात ना, "साईं इतना दीजिये, जा मे कुटुम समाय ।
मैं भी भूखा न रहूँ, साधु ना भूखा जाय ॥"


बस्स यासाठीच हे सगळं जगणं बाकी काय...

~निरंजन🌿

#जगण
बऱ्याच गोष्टी तेवढ्याच किचकट असतात जेवढं आपण त्यांना मनावर घेतो.. मनावर घेणं सोडल्याने गोष्टी सुरळीत होतात असं नाही परंतू मनावरचं ओझं आणि आपली त्यातली गुंतागुंत नक्कीच कमी होऊ लागते.

#जगण
आडवळनावरती फुलणाऱ्या कुठल्याशा फुलांच्या सुगंधाला धरून ठेवण्याचा अट्टाहास करायचा नसतो. सुगंध धरून ठेवता येत नाही. कुपीत अत्तर असलं तरीही त्याला खऱ्या फुलांची मजा नसते. सुगंध फक्त तेवढ्या काळापुरता अनुभवता येत असतो. आयुष्यात बऱ्याचदा असं होतं. ना तुम्हाला त्या वळनावरती थांबता येत ना तो सुगंध धरून ठेवता येत. अवघड वाटा धुंडाळताना कधीतरी असं होतंच. ना तुम्ही पहिले ना शेवटचे. त्यामुळे खंत म्हणून नाही तर आनंदी आठवण म्हणून तो सुगंधी ठेवा मनात जपून ठेवायचा असतो. वाटा तुडवत पुढे जात रहायचं असतं.

~निरंजन🌿

#जगण
जसं आहे ते हे असं आहे आणि हे असंच आहे.. आपलं आहे.. आपल्यालाच निस्तरायचं आहे.. आपलं आयुष्य... जसं आहे तसं... जगायचं म्हणा.. एन्जॉय करायचं म्हणा किंवा निस्तरायचं म्हणा.. काय फरक पडतो.. यातलं काहीही म्हटलं तरीही चालेल पण थांबून चालत नाही.. पुढे जात रहायचं.. पुढे जात राहणं हेच आपलं आयुष्य... पुढे जात राहणं हेच आपलं जगणं...

#जगण
आयुष्याची कहाणी मोठी विलक्षण असते. सुखदुःखाबद्दल सांगताना संत तुकोबाराय म्हणतात,
"सुख पाहता जवापाडे, दुःख पर्वताएवढे।"

गदिमा म्हणतात, "एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे ।
जरतारी हे वस्त्र माणसा, तुझिया आयुष्याचे ।।"

तुकड्या तुकड्यांमध्ये आपण सुखी किंवा दुःखी असतो पण आयुष्य हे अशा अनेक तुकड्यांना एकत्र बांधून ठेवतं.. आपण कधीतरी सुखी असतो तर कधीतरी दुःखी असतो पण एकंदरीत आयुष्यात आपण ना आपण सुखी असतो ना दुःखी असतो. आपण फक्त जगत असतो. कुठल्याही विशेषणांविना, कुठल्याही ओझ्याविना, कुठल्याही बंधनाविना, कुठल्याही अपेक्षेविना.. आपण फक्त जगत असतो..

#जगण
मुक्ततेच्या नादात आपण नवनवीन जाळ्यांमध्ये अडकत जातो... काही जाळे आपल्याला जणू काही वारशातच भेटलेले असतात पण त्यापेक्षाही जास्त त्रासदायक जाळे असतात ते आपण स्वतःच निर्माण करत असतो.. कधी कधी कळत नाही ते ही एक वेळ ठीक असतं पण काही मात्र आपण सगळं कळत असूनही तयार केलेले जाळे असतात... आपण स्वतःच अडकत जातो... आधी आपण त्या जाळ्यांना सोडत नाही मग नंतर नंतर ते जाळे आपल्याला सोडत नाहीत...

#जगण
'इच्छा आणि त्यांची पुर्तता' यातलं जे अंतर असतं त्या दरम्यान आपण जसं जगतो ते आपलं खरं जगणं असतं.. कारण आयुष्यात इच्छा कधीच संपत नाहीत आणि सगळ्याच इच्छा पूर्ण होतील असंही नाही. बरं इच्छा पूर्ण व्हायच्या म्हटलं तरीही वाट पाहणं आलं.. वेटिंग पिरियड आला.. आपल्या आयुष्यातला बहुतांश काळ असा वेटिंग पिरियड असतो.. म्हणूनच यामध्ये आपण कसं जगतो ते खूप महत्त्वाचं असतं.. तेच आपलं खरं जगणं असतं..

~निरंजन🌿

#जगण
रेल्वे जेव्हा ट्रॅक बदलते तेव्हा खडखडाट होतोच. आयुष्याच्या प्रवासात कधीतरी अशीच रूळ बदलण्याची वेळ येते. खरंतर पिढ्यानपिढ्या कुणी न केलेलं काहीतरी करू पाहणाऱ्या तरूणाईसाठी तर हे रूळ बदलणं आयुष्याचा खूप मोठा काळ व्यापून टाकतं. हा खडखडाट सहन करावाच लागतो. हा खडखडाट सहन करूनच हा प्रवास पुर्ण होणार आहे. यात महत्त्वाचं आहे ते पुढे जात राहणं.. वाट तुडवताना अनेक चढ-उतार आणि खाचखळगे येत असतात पण चालता चालता सगळंच मागे पडत जातं.. अन् आपण पुढे जात राहतो.. आपल्याला पुढे जात रहायचंय.. आपली आजची गोष्ट कितीही अडचणींची असली तरीही ती उद्या अडचणींवर मात केलेल्या व्यक्तीची गोष्ट म्हणून येईल हे नक्की..

~निरंजन

#जगण