" छञपती श्री शिवाजी महाराज "
3.29K subscribers
4.05K photos
116 videos
458 files
3.24K links
Download Telegram
आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष

📜 ८ ऑगस्ट इ.स.१६४८
(श्रावण अमावास्या, शके १५७०, संवत्सर सर्वधारी, वार मंगळवार)

छत्रपतींचा बुद्धिबळाचा डाव
आदिलशाहपुढे पदर पसरून राजांच्या प्राणांची भीक मागणं! स्वराजाच्या शपथा विसरून जाणं अन् मिळविलेलं स्वराज्य पुन्हा आदिलशाहच्या कब्जात देऊन टाकणं. नाहीतर शहाजी राजांचा मृत्यू. स्वराज्याचा नाश आणि शिवाजीराजांच्याही अशाच चिंधड्या उडालेल्या उघड्या डोळ्यांनी पाहणं हे आऊसाहेबांच्या नशीबी नव्हतं ! शिवाजीराजांनी स्वराज्यावर याचवेळी चालून आलेल्या फत्तेखानाचा प्रचंड पराभव केला होता. सुभानमंगळ , पुरंदर गड , बेलसर आणि सासवड या ठिकाणी राजांनी आपली गनिमी काव्याची कुशल करामत वापरून शाही फौजा पार उधळून लावल्या होत्या. सह्याद्रीच्या आणि शिवाजीराजांच्या मनगटातील बळ उफाळून आलं होतं.

अन् त्यामुळेच आता कैदेतले शहाजीराजे जास्तच धोक्यात अडकले होते. कोणत्याही क्षणी संतापाच्या भरात शहाजीराजांचा शिरच्छेद होऊ शकत होता, नाही का ?

पण शिवाजीराजांनी एका बाजूने येणाऱ्या आदिलशाही फौजेशी झुंज मांडण्याची तयारी चालविली होती , अन् त्याचवेळी शहाजीराजांच्या सुटकेकरताही त्यांनी बुद्धीबळाचा डाव मांडला होता. राजांनी आपला एक वकील दिल्लीच्या रोखाने रवानाही केला. कशाकरता ? मुघल बादशाहशी संगनमत करून मोघली फौज दिल्लीहून विजापुरावर चालून यावी , असा आदिलशाहला शह टाकण्याकरता.

राजांचा डाव अचूक ठरला. दिल्लीच्या शहाजहाननं विजापुरावरती असं प्रचंड दडपण आणलं की , शहाजीराजांना सोडा नाहीतर मुघली फौजा विजापुरावर चाल करून येतील! वास्तविक दिल्लीचे मोगल हे काही शिवाजीराजांचे मित्र नव्हते. पण राजकारणात कधीच कुणी कुणाचा कायमचा मित्रही नसतो आणि शत्रूही नसतो. उद्दिष्ट कायम असतं.

हे शिवाजीराजांचं वयाच्या अठराव्या वर्षीचं कृष्णकारस्थान होतं. अचूक ठरलं. विजापूरच्या आदिलशहाला घामच फुटला असेल! शहाजीराजांना कैद करून शिवाजीराजांना शरण आणण्याचा बादशाहचा डाव अक्षरश: उधळला गेला. नव्हे , त्याच्याच अंगाशी आला. कारण समोर जबडा पसरलेला दिल्लीचा शह त्याला दिसू लागला. त्यातच भर पडली फत्तेखानाच्या पराभवाची. चिमूटभर मावळी फौजेनं आपल्या फौजेची उडविलेली दाणादाण भयंकरच होती.

मुकाट्यानं शहाजीराजांची कैदेतून सुटका करण्याशिवाय आदिलशहापुढे मार्गच नव्हता. डोकं पिंजूनही दुसरा मार्ग बादशहाला सापडेना. त्याने दि. १६ मे १६४९ या दिवशी शहाजीराजांची सन्मानपूर्वक मुक्तता केली. अवघ्या सतरा-अठरा वर्षाच्या शिवाजीराजांची लष्करी प्रतिभा प्रकट झाली. मनगटातलं पोलादी सामर्थ्यही प्रत्ययास आलं. वडीलही सुटले. स्वराज्यही बचावलं. दोन्हीही तीर्थरुपच. किशोरवयाच्या पोरानं विजापूर हतबल केलं. अन् ही सारी करामत पाहून इतिहासही चपापला. इतिहासाला तरुण मराठ्यांच्या महत्त्वाकांक्षा क्षितीजावर विस्मयाने झुकलेल्या दिसल्या.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://www.instagram.com/shivhindvi
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

📜 ८ आगस्ट इ.स.१६४८
(श्रावण अमावास्या, शके १५७०, संवत्सर सर्वधारी, वार मंगळवार/

उत्रावळीच्या केदारजी खोपडे देशमुखाला आदिलशाही फर्मान!
"मुहम्मद आदिलशहा केदारजी खोपडे देसाई तर्फ भोर किल्ले रोहिडा. फतहखान खुदाबंदखान यांस कोंढाणा किल्ल्याच्या तर्फेस मसलत फर्मावली आहे तरी हे फर्मान पोहोचताच, त्याने (केदारजी) स्वार व प्यादे यासह उपर्युक्त खानाच्या जवळ जाऊन, त्याच्या आज्ञेत राहून दिवानची मसलत करावी. म्हणजे उपर्युक्त खानाच्या लिहिल्यानुसार निष्ठा व्यक्त होऊन तीप्रमाणे उत्कर्ष होईल. याबाबतीत विसर करण्याचा परिणाम चांगला होणार नाही. बरी ताकीद जाणून फर्मानाप्रमाणे अंमल करावा.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 ८ ऑगस्ट इ.स.१६७६
छत्रपती शिवरायांच्या सूचनेवरून "किल्ले महीपतगड" वर हवालदार "दसमाजी नरसाळा" यांस तर "किल्ले सज्जनगड" वर हवालदार "जिजोजी काटकर" यांस कारभाराविषयी पत्र. ज्यात महाराज जिजोजीला म्हणतात, "रामदास गोसावी गडावर येतील, त्यांना रहायला चांगली जागा करून द्या, त्यांना काय हवं नको पहा, त्यांची विचारपूस करा, जितके दिवस राहू म्हणतील तितके दिवस राहू द्या आणि जेव्हा जाऊ म्हणतील तेव्हा जाऊद्या. या कामात कसलीही हयगय होऊ देउ नका !! असंच पत्र, याच तारखेचं महिपतगडचा किल्लेदार दसमाजी नरसाळा यालाही दिलंय.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 ८ ऑगस्ट इ.स.१६८३
संभाजीराजांनी ही पोर्तुगीजांवरची मोहिम आखली आणि पोर्तुगीजांच्या चौलला वेढा घातला. चौलच्या वेढ्याला प्रतिउत्तर म्हणून आणि संभाजीराजांचे लक्ष चौलवरून हटवण्यासाठी पोर्तुगीजांनी फोंड्यावर हल्ला केला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ८ आगस्ट इ.स.१७९०
मराठ्यांनी लुनी नदी ओलांडली. आणि त्यांच्या फौजा मेडत्यावर चालून आल्या. मराठी फौजेने राजपुतांना हैराण करावयास सुरूवात केली. द बुआन्यचा तोफखाना मात्र अजूनही नदीच्या अलिकडेच होता. मारवाडी फौजेचे सेनापती गंगाराम भंडारी होते. मराठ्यांना लुनी नदीच्या अलीकडेच अडविण्याचा त्यांचा डाव होता. पण तो काही सफल झाला नाही.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 ८ ऑगस्ट इ.स.१८०३
इंग्रजांनी आपल्याला मराठ्यांशी युद्ध करावे लागणार हे गृहीत धरूनच जोराची तयारी चालविली होती. दक्षिणेत जनरल वेलस्लीच्या हाताखाली ३६ हजार सैन्य होते. जनरल वेलस्लीला दक्षिणेतील फौजांचा सरसेनापती म्हणून जाहीर केले होते. कृष्णा-तुंगभद्रा दुआबात जनरल स्टुअर्ट आपल्या ८,००० सैन्यासह युद्धाच्या तयारीने तळ देऊन होता. आजुबाजूचे पाळेगार, बंडखोर, यांना ताब्यात ठेऊन जनरल वेलस्लीला लागेल त्यावेळी मदत करण्याचे त्यास हुकूम दिले होते. ७ ऑगस्ट १८०३ रोजी जनरल वेलस्ली बरोबर ९ हजार सैन्य घेऊन आणि कर्नल स्टीव्हेन्सन ह्याचे ८ हजार सैनिक ही दोन्ही सैन्ये अहमदनगरच्या किल्याजवळ येऊन थडकली. निजामाचे १५ हजार सैन्य, अप्पा देसाई निपाणकर यांजकडील ८ हजार सैन्य आणि बापू गोखले यांनी जनरल वेलस्लीला मदत करावयाची असे हुकूम गव्हर्नर जनरलने दिले होते. सुरतजवळ कॅप्टन मरे आपल्या ८ हजार सैन्यानिशी दक्षिणेत निघण्याच्या तयारीत होता. जनरल लेकला उत्तरेतील सैन्याचे अधिपत्य देऊन कानपूर व लखनौ येथील सैन्यास शिंद्यांवर हल्ला करण्यासाठी ठेवले होते. शिंदे दक्षिणेत पुण्याच्या दिशेने येत होते, त्यास अडवून धरण्यासाठी त्यांच्या ताब्यातील अहमदनगरचा किल्ला काबिज करण्याचा बनाव वेलस्लीने ८ ऑगस्ट १८०३ घडवून आणला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 ८ ऑगस्ट इ.स.१९४२
भारताला स्वातंत्र्य मिळणे हे केवळ भारतासाठीच नाही तर जगाच्या शांतीसाठी गरजेचे आहे.शके १८६४ आषाढ व.१२ फिरंगी दि.८ ऑगस्ट इ.स.१९४२ या दिवशी रात्री दहा वाजता प्रसिद्ध असा "चले जाव" ठराव पास झाला. 'चले जाव'ची घोषणा केली गेली आणि 'ब्रिटिशांनी तत्काळ हा देश भारतीयांच्या हाती सोपवून चालते व्हावे', असा निर्वाणीचा इशारा देण्यात आला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

🚩⚔️ हर हर महादेव, जय श्रीराम
जय भवानी, जय शिवाजी.⚔️🚩
आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष

📜 १० ऑगस्ट इ.स.१६००
अहमदनगर अकबर बादशहाने जिंकले
अहमदनगर ही निजामशहाची राजधानी होती. इस १५९५ मधे बुर्हाण निजामशहा मरण पावला व निजामशाहीत गादीविषयी तंटे सुरु झाले. मात्र इथे एक गडबड अशी झाली की, वजीराने गुजरातचा अंमलदार शहजादा मुराद याच्याकडे मदत मागितली. हा मुराद अकबराचा मुलगा होता. इस १५५६ मधे मुघल बादशहा बनल्यानंतर अकबराने अनेक पराक्रम करून मुघल साम्राज्यात काश्मीर, काबुल, कंदाहार, सिंध असे अनेक प्रदेश जोडले. मात्र दख्खन मोहिमेमधे १५९५ सुमारास त्याचा पराभव झाला होता. आता यावेळी दख्खनमधे शिरकाव करण्याची हिच संधी आहे हे ओळखुन अकबराने मुरादला अहमदनगरला जायची परवानगी दिली. मीर्झाखान व मुरादच्या फौजेने येऊन अहमदनगरला वेढा घातला. मात्र गेली काही वर्षे स्वपराक्रमाने निजामशाही टिकवुन ठेवणारी चांदबिबी यावेळी कंबर कसुन उभी राहिली. ही चांदबिबी म्हणजे निधन पावलेल्या बुर्हाण निजामशहाची सख्खी बहीण होय. तिचा निकाह विजापुरचा पहिला आदिलशहा याच्याशी होऊन ती काही वर्षे विजापुरलाच होती. मात्र पुढे काही कारणाने ती परत तिच्या माहेरी निजामशाहीत आली होती. याही वेळी तिने मुघलांच्या नाकी नऊ आणले. मात्र दोन्हीकडच्या फौजा जेरीस आल्याने वर्हाड प्रांत चांदबिबीने मुघलांना तह करून दिला. मात्र प्रत्यक्षात त्याचा ताबा मुघलांना मिळाला नाही. त्यातच मीर्झाखान शत्रूला फितुर झाला आहे या संशयावरून अकबराने त्याला परत बोलावुन त्याचा नवरत्नांपैकी एक जिवलग अबुल फजलला नगरकडे धाडले. मात्र लवकरच शहजादा मुराद मोहिमेवर असतानाच अचानक मरण पावला. तेव्हा पुढे नेतृत्व चालु ठेवण्यासाठी व अहमदनगर काबीज होत नाहीये हे पाहुन अबुल फजलने अकबरालाच दख्खनमधे येण्याची विनंती केली. अकबर गेली १४ वर्षे सिंधू नदीच्या परिसरात रहात होता. तिथुन तो आग्र्याला येऊन नंतर प्रथमच नर्मदा नदी ओलांडून दख्खनमधे आला. तोपर्यंत दौलताबादचा (मुळचे देवगिरी) किल्ला मुघल सैन्याने जिंकुन घेतला होता. त्यात परत गडबड अशी झाली की, निजामशाहीतीलच काही शत्रूंनी व फितूरांनी पराक्रमी चांदबिबीचा दगाबाजीने जुलै १६०० मधे खून केला आणि मुघलांच्या मार्गातील मुख्य अडसर दूर झाला आणि १० ऑगस्ट १६०० रोजी शहजादा दानियाल व खान ई खानान यांनी निजामशाही राजधानी अहमदनगर जिंकले. मात्र तरीही संपूर्ण अहमदनगर अकबराला जिंकता आले नाही कारण आता चांदबिबीच्या जागी एक निजामशाहीतील पराक्रमी सरदार मलिक अंबर मुघलांविरूद्ध लढायला उभा राहिला. लवकरच त्याने अहमदनगर व दौलताबाद पुन्हा मुघलांकडुन जिंकुन घेतले व पुढे बरेच वर्षे निजामशाहीत वजिरी केली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://www.instagram.com/shivhindvi
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

📜 १० ऑगस्ट इ.स.१६६०
(श्रावण पोर्णिमा, शके १५८२,संवत्सर शार्वरी, वार शुक्रवार)

सिद्दी जौहरचे परत आक्रमण!
"छत्रपती शिवराय" किल्ले पन्हाळ्याच्या वेढ्यातून निसटल्यावर त्यांच्या पाठलागावर "सिद्दी जौहर" स्वराज्यात शिरला होता. त्याला जशास तसे उत्तर देण्यासाठी महाराजांनी मावळ्यांना काही सूचना देऊन मावळ्यांची एक तुकडी सिद्दी जौहरचा सामना करण्यासाठी पाठवली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 १० ऑगस्ट इ.स.१६६६
(श्रावण वद्य ५, पंचमी, शके १५८८, संवत्सर पराभव, वार शुक्रवार)

महाराजांनी आजारपणाचे सोंग घेतले!
"छत्रपती शिवराय" आग्रा कैदेत असताना त्यांनी आजपासून आजारपणाचे सोंग घेतले. त्यांच्या या व्यूहरचनेची औरंगजेब बादशहाला कसलीही कल्पना नव्हती.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 १० आगस्ट इ.स.१६८०
(श्रावण वद्य ११, एकादशी, शके १६०२, रौद्र संवत्सर, वार मंगळवार)

इंग्रजांच्या वखारीत दंगल!
सिद्दीच्या लोकांची दंडेली सुरूच होती. एका प्रकरणात सिद्दी यांना एका इंग्रज सराफाकडून १८ हजार अशरफ्या घ्यावयाच्या होत्या, त्यासाठी इंग्रजांच्या बरोबरच्या वादात वखारीत दंगल झाली. अखेर इंग्रजांनी तोफा डागल्या तेव्हा सिद्दीचे लोक पळून गेले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 १० ऑगस्ट इ.स. १७५५
इस.१७५३ ते १७५५ श्रीमंत रघुनाथराव उर्फ राघोबादादांची दुसरी स्वारी उत्तरेत झाली.त्यांच्या नेतृत्वाखाली मराठयांनी राजपुतांना, कुंभेरी इथे जबरी खंडण्या वसूल करून चांगलीच दहशत निर्माण केली होती.जून ते डिसेंम्बर १७५४ दरम्यान राघोबादादा दिल्लीची व्यवस्था पाहण्यात दिल्ली मुक्कामी होते.३ मार्च रोजी सर्व व्यवस्था करून राघोबादादा परतीच्या प्रवासाला निघाले.पुष्कर, ग्वाल्हेर असा प्रवास करत राघोबादादासाहेब १० ऑगस्ट इस. १७५५ रोजी पुण्यात दाखल झाले.याच दरम्यान मराठ्यांचा उत्तरेतील आणखी एक बलाढ्य बुरुज कोसळला. जयप्पा शिंदे यांचा नागोर येथे खून झाला. एकंदरीत या स्वारीत मराठयांचे उत्तरेत बरेच वर्चस्व वाढले होते. येथील भौगोलिक, सामाजिक, आणि राजनैतिक, परिस्थिती चा अंदाज त्यांना आला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇

https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

🚩⚔️ हर हर महादेव, जय श्रीराम
जय भवानी, जय शिवाजी.⚔️🚩
आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष

📜 ११ आगस्ट इ.स.१६६६
(श्रावण वद्य ६, षष्ठी, शके १५८८, संवत्सर पराभव, वार शनिवार)

आग्रा येथे नजरकैदेत महाराजांच्या आजारपणाची औरंगजेब बादशहास बातमी!
औरंगजेब बादशहास त्याच्या हेरांकरवी महाराज आजारी असल्याची बातमी समजली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://www.instagram.com/shivhindvi
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

📜 ११ ऑगस्ट इ.स.१६७८
छत्रपती श्री शिवरायांनी
त्यांचे सावत्र बंधु व्यंकोजीराजे यांची पुन्हा एक वर्षा नंतर तंजावर येथे गुप्त भेट घेतली. हें स्वराज्य व्हावे ही तो श्री ची इच्छा हेच विचार मनात ठेवून छ. शिवरायांनी भगवा रोवत जाण्याची वाटचाल सुरूच ठेवली आता लक्ष दक्षिणेकडे,आपले स्वराज्य दक्षिणेतही वाढवले पाहिजे म्हणून छ.शिवरायांनी आपले बंधु व्यंकोजी राजे यांची भेट घेतली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜१० ऑगस्ट इ.स.१७६३
दक्षिण तीरी राक्षसभुवनावर दहा-पंधरा हजार फौज व गारदी व तोफखाना घेऊन विठ्ठल सुंदर राहिला होता. त्यावर पेशव्यांच्या सैन्याने झडप घातली. चार-सहा घटका निकराचे युद्ध होऊन मोगलांचा मोड झाला. बिट्ठल सुंदर, विनायकदास व खंदारचा राजा हे मारले गेले. उदाजी पवार, जोत्याजी घाटगे, मालोजी घोरपडे, बाबूराव जंगी, माधवराव व रघुनाथराव पिंगळे, बाबूराव जाधव, शहाजी सुपेकर, जयाप्पा जाधव, बाजीराव पाटणकर, शिवराव पवार, मुरादखान, अजमखान पठाण आदि सोळा सरदार पाडावात सापडले. शिवाय मोगलांच्या कमीत कमी वीस तोफा, पधरा हती, घोडे, उंट, बैल, डेरे, राहुट्या वगैरे सर्व सामान मराठ्यांचे हाती सापडले. अशा रीतीने मोगलांचा पराभव झाला. या युद्धात मराठ्यास जे यश आले त्याचे श्रेय माधवराव पेशव्यांच्या शौर्य, धोरण व व्यवस्थितपणा याकडे जाते. निजामअल्ली औरंगाबादेस येऊन पोचल्यावर त्याच्या पाठोपाठ त्याचा औरंगाबादचा गव्हर्नर मुरादखान यास मराठ्यांनी आपल्या कैदेतून सोडवून त्यास औरंगाबादेस निजामअल्लीकडे तहाच्या अटी घेऊन रवाना केले. एक कोट मुलूख, दहा लाख रुपये आणि तीन किल्ले सलुखासाठी मराठ्यास द्यावे अशी मराठ्यांची मागणी होती. निजामअल्लीने ही मागणी नाकारल्यावर मराठे औरंगाबादेवर चालून गेले. पण अनेक कारणांमुळे मराठ्यास निजामाचा पूर्ण पराभव करता येईना. पावसाळाभर मराठा सैनिक रणांगणात असल्यामुळे युद्धास कंटाळून घरी जाण्याची वाट पाहू लागले. इतक्यात तिकडे कर्नाटकात हैदरअल्लीने मराठ्यांचा मुलूख पादाक्रांत केल्याच्या बातम्या येऊन ठेपल्या. अशा स्थितीत निजामअल्लीशी तह करणेच पेशव्यास भाग पडले. तहात उदगीरच्या तहातला साठ लाख व नवीन बावीस लक्ष असा एकंदर ब्याऐंशी लक्षावर २५ सप्टेंबरला तह कायम झाला. उभयतानी युद्धप्रसंगी एकमेकांचे सहाय्य करावे असा करार ठरला. राक्षसभुवनाची लढाई १० ऑगस्टला होऊन वरील तह २५ सप्टेंबरला कायम झाला.बाळाजी जनार्दन उर्फ नानासाहेब फडणीस यास फडणिशी दिली. या तहापासून तो तह १७९५ पर्यंत निजाम व पेशवे यांचे वितुष्ट आले नाही. राक्षसभुवनावरील विजयामुळे माधवरावाचा दरारा आणि वचक दक्षिणउत्तरेच्या राज्यकारभारांत बसला. इथून रघुनाथराव मागे पडून माधवरावाकडे मराठी सत्तेची सर्व सूत्रे आली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 ११ ऑगस्ट इ.स.१८०३
शके १७२५ श्रावण व .नवमी फिरंगी दि.११ ऑगस्ट इ.स.१८०३ रोजी इंग्रजी लोकांनी अहमदनगर चा किल्ला लांच देऊन घेतला. ख्रिस्ती शकाच्या एकोणिसाव्या शतकातील पहिल्या दशकापासून मराठी राज्यास उतरती कळा लागून राहिली होती.शिंदे-होळकर आदी मराठे सरदारांचा पराभव करण्याकडे इंग्रज वळले होते.अहमदनगर चा किल्ला शिंदे यांच्या ताब्यात होता.इंग्रजांची राजनीती मोठी धूर्त पणाची होती.श्रावण व.५ रोजी वेढया चे काम सुरू झाल्यावर जनरल वेलस्ली याने जाहीरनामा प्रसिद्ध केला की शिंदे-भोसले यांच्याविरुद्ध आमना सामना होणार आहे,प्रजेविरुद्ध नाही.जणू प्रजा आणि शिंदे-भोसले वेगळेच होते! दुसऱ्या दिवशी वेढ्याचे काम जोरात सुरू झाले.किल्ल्यावर शिंदे यांच्याकडील पायदळांतील काही लोक होते.थोडे घोडेस्वार असून किल्ल्याचे रक्षण करणारे नेहमीचे शिपाई पण होते.या सर्वांनी किल्ला सोडण्यास नकार दिल्यावर इंग्रजांनी किल्ल्याच्या तटास वेढा दिला. तट आणि बुरुज उंच असल्याने त्यांचे काही चालले नाही.परंतु निकाराचा प्रयत्न करून आणि मराठ्यांच्या गोळीबारास तोंड देऊन इंग्रज भिंतीवरून शहरात आत घुसले.तेव्हा इंग्रजांचे नेतृत्व वेलस्ली हा इंग्रज करत होता.किल्ल्याची तट व्यवस्था मजबूत असल्या कारणाने किल्ला मिळवणं त्याला शक्य नव्हतं म्हणून त्याने भिंगार गावा जवळ असलेल्या देशमुखाला इंग्रजांनी वश करून घेतले.आणि त्याला चार हजार रुपये लांचं देऊ केली.त्याबरोबर हल्ला कोठे करावा याचे ज्ञान इंग्रजांना मिळाले श्रावण व.नवमी रोजी सहजा सहजी नगरचा किल्ला शत्रूच्या हातात पडला

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜११ ऑगस्ट इ.स.१९०८
भारतातील सर्वात तरूण वयाचे तसेच सशस्त्र क्रांतीत बाँबचा उपयोग करणारे पहिले क्रांतिकारक शहीद खुदीराम बोस यांना विनम्र अभिवादन...

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇.

YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

🚩⚔️ हर हर महादेव, जय श्रीराम
जय भवानी, जय शिवाजी.⚔️🚩
आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष

📜 १३ ऑगस्ट इ.स.१६६६
आग्र्याला येऊन शिवाजी महाराजाना जवळजवळ 2 महिने झाले होते.कैदेतून सुटकेच्या कामी मदत करण्यासाठी महाराजाना मुघल सरदारांच्यावर बराच खर्च करावा लागे.जवळचे पैसे संपल्यावर महाराजानी रामसिंहाकडून ६६ हजार रुपये कर्ज घेतले. हा पैसा मुगल सरदारांवर खर्च करत महाराजानी पुन्हा त्यांच्यामार्फत औरंगजेबाला पत्र लिहिणे सुरू केले. पण औरंगजेब अत्यंत कपटी आणि धूर्त होता.महाराजांच्या अर्जावर त्याने कोणताही विचार केला नाही.याच दरम्यान आग्र्यातील सामान्य जनतेत शिवाजी महाराजांच्या बद्दल सहानुभूती वाढत होती,या कारणाने औरंगजेब मनातून धास्तावला होता.महाराजांचा एकदाचा काय तो निकाल लावण्याचे ठरवून त्याने अतिशय गुप्तपणे हालचाली करण्यास प्रारंभ केला.त्यानुसार महाराजाना विठ्ठलदासाच्या हवेलीत नेऊन ठार करण्याचे त्याने निश्चित केले. आपला बेत अतिशय गुप्त रहावा या हेतूने औरंगजेबाने महाराजांच्या निवासस्थानभोवतीची गस्त अत्यंत कडक केली.पण महाराजांच्या सुदैवाने ही गुप्त बातमी महाराजांच्यापर्यंत पोहीचलीच.महाराजांच्या छावनीभोवतीची गस्त अतिशय कडक करण्यात आली

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
https://www.instagram.com/shivhindvi
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

📜 १३ आऑगस्ट इ.स.१६८०
(श्रावण वद्य १४, चतुर्दशी, शके १६०२, रौद्र संवत्सर, वार शुक्रवार)

सिद्दी यांची लुट!
मध्यरात्री सिद्दीची ५ गलबते बंदरात शिरली आणि त्यांनी मराठ्यांचे १ भात भरलेले गलबत सिद्दीने पळविल्याचे कळून आले. त्यामुळे सिद्दीच्या लोकांचे चाबकाचे फटके वाचले. त्यांना तसेच हाकलण्यात आले.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

📜 १३ ऑगस्ट इ.स.१७९५
.🚩पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन 🚩

चौंडी ता.जामखेड , जि.अहमदनगर
हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान . याच गावात ३१ मे १७२५ रोजी अहिल्यादेवींचा जन्म झाला .पुढे सुभेदार मल्हारराव होळकर यांचे पुत्र खंडोजीराव यांच्याशी वयाच्या ८व्या वर्षी त्यांचा विवाह झाला.अहिल्यादेवी बालपणापासूनच चाणाक्ष, तल्लख व कुशाग्र बुद्धीच्या होत्या.खंडेराव राज्यकारभारावर अजिबात लक्ष देत नव्हते. पण अहिल्याबाईनी कधीही तक्रार न करता सासरे मल्हारराव यांनी नेमून दिलेल्या कामात लक्ष घातले. कुशाग्र बुद्धीची देणगी लाभलेल्या सुनबाई यांचेवर सासरे मल्हारराव होळकर यांचा मोठा विश्वास होता.आणि खूप महत्त्वाचा पत्रव्यवहार ते अहिल्याबाई वर सोपवत असत.अहिल्याबाईंना वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी वैधव्याला सामोरे जावे लागले. कुंभेरीच्या लढाईत पती खंडेराव मरण पावले .त्यावेळी सासरे मल्हारराव म्हणाले " माझा खंडूजी गेला म्हणून काय झाले तुझ्या रुपाने माझा खंडुजी अजून जिवंत आहे तू सती जाऊ नकोस" अहिल्यादेवीने ते ऐकले.व मल्हाररावांनी अहिल्यादेवींच्या हाती सत्तेची सूत्रे दिली.
महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचा वारसा घेऊन
आदर्श राज्यकारभार करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे व्यक्तिमत्व प्रेरणादायी असेच होते. त्यांच्या प्रत्येक कामात दूरदृष्टी दिसून येत . व्यक्तिगत जीवनात अहिल्याबाईंनी अनेक संकटांना तोंड देत सुमारे २७वर्षे राज्यकारभार केला. पण या सगळ्या कारभारात अहिल्यादेवींनी स्वतःची अशी अर्थनीती व जलनीती ठरवली .महिला असूनही राजसत्तेचे नेतृत्व कसे असावे याचे उत्तम उदाहरण अहिल्याबाईंनी घालून दिले. राज्यातील शेतकरी कष्टकरी उपेक्षित वर्ग हा त्यांच्या विकासाचा केंद्रबिंदू होता .शिवाय कसण्यास दिलेल्या जमिनीत शेतकऱ्यांनी वीस फळझाडे लावावीत त्यातील ११ झाडे सरकारची आणि नऊ झाडे शेतकऱ्यांची असे सूत्र ठरवले होते. अहिल्यादेवींच्या जलनीती मध्येही अर्थनीती प्रमाणेच सर्वसमावेशकता होती. त्याकाळी फड पद्धतीने पाणी वाटपावर अहिल्यादेवींनी भरपूर पैसे खर्च केले. ज्यादा पैसे खर्च करून पाणी दिल्याने उत्पन्न वाढीचा वायदा त्यांनी शेतकऱ्यांशी केला पण शेतकऱ्यांकडून उत्पन्ना एवढाच सारा वसूल केला .शेतीच्या पाण्याचे महत्त्व त्यांनी जाणले होते, पण पिण्याच्या पाण्यासाठीही पुढे अनेक भागात विहिरी बारव ,आड ,घाट यासारख्या योजना त्यांनी त्यांच्या कल्पनेतून उभारल्या त्यापैकी बहुतांश विहिरी आजही सुस्थितीत आहेत.ग्राम व्यवस्थेची घडी त्यानी चांगली बसवली होती.गावोगावी न्याय देणारे पंचाधिकारी नेमले होते.राज्यकारभार करताना जुन्या रूढी-परंपरांना त्यांनी कायमच विरोध केला.पुरूषप्रधान व्यवस्थेत स्वच्छ आणि शिस्तबध्द कारभार करणार्या त्या रणरागिनी होत्या ,प्रचंड आत्मविश्वास, धाडस ,दूरदृष्टी, त्यागी वृत्ती असे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आहेत. अहिल्याबाईंचा नंतर महेश्वर येथे १३ आॅगस्ट १७९५ ला वृद्धापकाळाने निधन झाले.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

🚩⚔️ हर हर महादेव, जय श्रीराम
जय भवानी, जय शिवाजी.⚔️🚩
आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष

📜 १२ ऑगस्ट इ.स.१३४७
बहमनी साम्राज्याची स्थापना. हसन गंगू बहमनशाह पहिला सुलतान झाला. हिंदुस्तानातील पहिली शिया-मुस्लिम राजवट म्हणजे बहमनशाही.

महंमद तुघलकचा सेनापती झाफर खान हा तुघलकांना न जुमानता पुर्वीच स्वतंत्र झाला होता. या जाफर खानाची हकीकत मोठी मजेची आहे. दिल्लीला एक विद्वान पंडीत होता. त्याचे नाव होते गंगाधरशास्त्री वाबळे. नावावरून हा मराठी असावा असे वाटते. हा बराच श्रीमंत होता व त्याने दिल्लीच्या आसपास शेतीवाडी खरेदी करून आपले व्यवस्थीत बस्तान बसवले होते. याच्याकडे एक गरीब पण अत्यंत अफगाणी हुशार मुलगा कामाला होता त्याचे नाव हसन. याच्यावर सगळे ब्राह्मणी संस्कारच झाले होते. एक दिवस या मुलाला शेतात काम करताना काही सोने भरलेले हंडे सापडले ते त्याने प्रामाणिकपणे मालकाला परत केले. त्याची हुशारी व प्रामाणिकपणा बघून बघून वाबळे शास्त्र्यांनी त्याच्या इतर शिक्षणाची सोय केली व तो एक दिवस तुघलकांच्या सेनेचा दक्षिणेत सेनापती झाला.

इ.स. १३४६ च्या अनागोंदीमध्ये दिल्लीच्या सरदारांनी दख्खन प्रांताची लूट आणि नासधूस केली. ह्या घटनेनंतर दख्खनच्या सरदारांनी हसनच्या नेतृत्वाखाली दिल्लीच्या बादशाहाविरुद्ध बंड केले. हा उठाव यशस्वी झाला आणि दख्खनचा प्रांत स्वतंत्र झाला. पुढे १२ ऑगस्ट १३४७ रोजी दक्षिणेला हसनने जे राज्य स्थापन केले त्याला इतर मुसलमान "ब्राह्मणाचे राज्य" म्हणत. त्या "बम्मनशाही"चे नंतर झाले बहमनशाही.....

या राज्याची प्रजा मुख्यतः हिंदु होती.हसन गंगू बहमनशाहा अर्थातच हिंदूंच्या बाबतीत काहिसे मवाळ धोरण स्वीकारत होता जे त्याच्या सरदारांना बिलकुल पसंत नव्हते. पण शेजारच्या प्रबळ अशा विजयनगरच्या हिंदू साम्राज्याचा केसही ते वाकडा करू शकले नाहीत इतके प्रभावशाली साम्राज्य हरीहर आणि बुक्क या दोन बंधूंनी दक्षिण भारतात तुंगभद्रेच्या काठावर स्थापन केले होते.

आर्थिक कुरबुरी, प्रशासकीय कामात ढवळाढवळ इत्यादी कारणांमुळे त्याचा परिणाम त्याच्या विरोधात बंडखोरी होण्यात झाला. ११ फेब्रुवारी १३५८ रोजी बहमनी साम्राज्याचा संस्थापक हसन गंगू बहमनशाहाचा मृत्यु झाला. त्याच्या मृत्यूनंतर १३५८ मध्ये बहमनी सुलतानांपैकी हसन गंगू बहमनशाहचा मुलगा महंमदशाह बहमनी सुल्तान झाला. याने तेलंगणचा राजपुत्र विनायकदेव याची जीभ छाटली होती आणि वेलिंगपट्टणच्या किल्ल्यावरून आगीत फेकून जिवंत जाळले होते. कर्नाटकात त्याने अदोनीजवळ सत्तर हजार माणसांची कत्ल केली.माणसे मारायची याला फार मोठी हौस होती. कर्नाटकाच्या सरहद्दिजवळ एकाच वेळी खूप मोठी कत्तल केली, काही लाख माणसे मारली. ही कत्तल इतकी मोठी होती की हा मुलुखच कित्येक वर्षे निर्मनुष्य आणि ओसाड पडला होता. अत्यंत सुंदर मंदिरे याने फोडून टाकली,आयुष्येच्या आयुष्ये खर्च करुन लिहिलेले अनमोल ग्रंथ जाळले. उध्वस्त केलेल्या मंदिरांवर अरबी भाषेत लिहिलेले शिलालेख झळकू लागले. 'बुत कदे शुद् मस्जिद' आणि 'बना कर्दे मस्जिद तबा कर कुनिश्त' अशा जाहिरनाम्यात.... याचा अर्थ असा की मूर्ती फोडून टाकून येथे ही मशीद बांधली.

पुढे त्याच्यानंतर अल्लाउद्दीन मुजाहिदशाह बहमनी तिसरा सुलतान झाला. हा गादीवर येतांच विजयानगरच्या राजाबरोबर युध्द सुरू झाले. इस १३७८ मध्ये विजयनगर साम्राज्याने बहमनी सुलतानांचा प्रचंड पराभव केला. १६ एप्रिल १३७८ रोजी सुल्तान अल्लाउद्दीन मुजाहिदशाह विजयनगरच्या राज्याने केलेला पराभव घेऊन परतत असताना त्याचा चुलता दाऊदखान याने खून करवला. यातील बहमनी सुलतानांच्या काही निर्णयांमुळे महाराष्ट्रातील काही शहरे भरभराटीस आली. आता हेच पहा, बहमनी साम्राज्यातील ९वा सुलतान महंमदशाह बहमनीने २२ सप्टेंबर १४२२ रोजी गुलबर्ग्याची राजधानी बिदरला हलवली; त्यामुळे आजच्या महाराष्ट्रातील उदगीर या शहराचे महत्व वाढून भरभराट झाली. बहमनी साम्राज्यातील क्रूरकर्मा म्हणून हुमायून बहमनीची इतिहासात ख्याती आहे. त्यामुळे त्याला जालीम असे म्हणत. त्याचा त्याच्या हुज-यांनी ४ सप्टेंबर १४६१ रोजी खून पडला.

लहान लहान हिंदु राज्ये जिंकून बहामनी राज्य वाढले होते. बहमनी साम्राज्य सुमारे दीडशे वर्षे टिकले व नंतर त्याचीच फ़ाळणी झाली आणि विशेष म्हणजे बहमनी साम्राज्यातीलच ५ सरदारांनी बंड करून बहमनी साम्राज्याची विभागणी करून आपापसात वाटून घेतले.

य राज्याचे खालील पाच तुकडे झाले.
यूसुफ आदिलखान - विजापूर(आदिलशाही),
मलिक अहमद निजामशाहा - अहमदनगर (निजामशाही),
कुली कुतुब उल मुल्क - गोवळकोंडा (कुतुबशाही),
फ़तेउल्लाह इमादशाह- एलीचपुर (ईमादशाही) व
कासीम बेरीद - बिदर (बेरीदशाही) या नावाच्या या पाच शाह्या आपल्या ओळखीच्या आहेतच. शिवाजी महाराजांच्या काळात असलेल्या याच त्या आदिलशाही,निजामशाही, कुतुबशाही सुलतानशाह्या बहमनी साम्राज्यातून फ़ुटून निर्माण झाल्या होत्या.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://www.instagram.com/shivhindvi
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

📜 १२ ऑगस्ट इ.स‌.१६६६
(श्रावण वद्य ७, सप्तमी, शके १५८८, संवत्सर पराभव, वार रविवार)

आग्रा येथे नजरकैदेत असताना महाराजांचा आजार बळावला!
महाराजांचा आजार बळावला होता. तशातच महाराजांनी काही दिवसांपूर्वीच आपली माणसेही स्वदेशात पाठविली होती, त्यामुळे औरंगजेब बादशहा महाराजांना मारण्याविषयी निश्चिंत होता. विठ्ठलदासाच्या हवेलीत अगदी ३/४ दिवसांत महाराजांना हलविण्याची तयारी करण्याच्या सूचनाही त्याने फुलादखानाला दिल्या. इकडे महाराजांच्या प्रकृतीत काहीही फरक पडत नव्हता. आजुबाजूची माणसे चिंताक्रांत होती.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 १२ ऑगस्ट इ.स.१६८३
अंजदिव बेटाच्या मालकीवरून पोर्तुगीज आणि मराठे संबंध बिघडत गेले होते.
औरंगजेबानेही अकबर प्रकरणावरून पोर्तुगीजाना संभाजीराजेंच्या विरोधात चिथावणी दिली होती. संभाजीराजेंनी आपण डिचोलीला जाणार असल्याचे सांगून आपले सैन्य चेऊलला वेढा देण्यासाठी पाठवले होते. त्यामुळे पोर्तुगीज मराठे युद्धाला सुरुवात झाली होती. या पार्श्वभूमीवर पोर्तुगीज विजरईलाही संभाजीराजेंना जिवंत पकडण्याची इच्छा झाली. गोव्याजवळील भतग्रामातील नारवे येथे पंचगंगा नदीवर गोकुळाष्टमी ला यात्रा भरत असे. नदीच्या उत्तर किनाऱ्यावरील नारवे संभाजीराजेंच्या ताब्यात तर दक्षिण किनाऱ्यावरील दिवाडी बेट पोर्तुगीजांच्या ताब्यात होते. या यात्रेदरम्यान हजारो लोक नदीत स्नान करण्यासाठी येत असत. संभाजीराजे सुद्धा या नदीत स्नान करण्यासाठी येणार आहेत अशी बातमी विजरईला मिळाली. त्यानुसार अचानक छापा घालून त्यांना पकडण्याचा विचार विजरईचा होता. पण बहुधा संभाजीराजेंनी हा बेत रद्द केला त्यामुळे पोर्तुगीजांचा हा बेत फसला गेला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 १२ ऑगस्ट इ.स.१७६५
प्लासीच्या लढाईनंतर इंग्रजानी मीर जाफरला बंगलचा नवाब बनवले होते, नंतर त्याच्या जागी मीर कासीमची नेमणूक केली गेली. पण इंग्रज आणि कासीमचे संबंध बिघडले गेल्याने त्यांच्यात लढाई झाली, त्यात मीर कासीमने १५० इंग्रजाची कत्तल केली.नंतरच्या काळात बक्सर येथे झालेल्या लढाईत मुघल बादशाह, शुजाउद्दोला आणि मीर कासीम यांच्या फौजांचा पराभव झाला आणि इंग्रजाची बंगाल आणि बिहारवर पकड मजबूत झाली. कोरा येथे झालेल्या लढाईत इंग्रजानी मल्हारराव होळकर यांचाही पराभव केला. याच सुमारास रॉबर्ट क्लाइव्ह यांची कंपनी सरकारच्या गव्हर्नर पदी निवड झाली, त्याने आपले कसब पणाला लावून हतबल झालेल्या मुघल बादशहा आणि शुजाउद्दोला याची बनारस येथे भेट घेतली आणि त्यांच्याकडून बंगाल आणि बिहार प्रांताचे दिवाणी हक्क मिळवले. त्याबदल्यात इंग्रजानी बादशहाला दरवर्षी २६ लाख रुपये तनखा देण्याचे ठरले. बादशहा आणि शुजाउद्दोला यांनी आपण इंग्रजाशी कधीही युद्ध करणार नाही असेही लिहून दिले. बादशहकडून इंग्रजानी बंगालचे दिवाणी हक्क मिळवले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

🚩⚔️ हर हर महादेव, जय श्रीराम
जय भवानी, जय शिवाजी.⚔️🚩
Messages in this channel will be automatically deleted after 1 month
Messages in this channel will no longer be automatically deleted