पुल देशपांडे 😁 Pu La Deshpande
2.38K subscribers
122 photos
4 videos
37 files
24 links
पु. ल. देशपांडे यांची पुस्तके, विचार, विनोद आणि बरंच काही...
Download Telegram
परवाच या अवलियाचा स्मृतिदिन आपण साजरा केला. त्यांच्याच आठवणी, त्यांच्याच शब्दात जागवत...
मी आत्तापर्यंत ऐकलं होतं की, भीतीने पोटात गोळा येतो; पण बोटात गोळा येतो, हे मला आज कळलं. गोविंदाबरोबर पेटी वाजवायची म्हणजे, बिरजूमहाराजांबरोबर उगीचच चार पावलं नाचण्यासारखं आहे. तसे खूप नाचलो असलो, म्हणून काय बिरजूमहाराजांबरोबर नाचायचं? - सुरांची सृष्टी निर्माण करणारा 'आमचा गोविंदा' (१९८५) (पाचामुखी (२०१२)) #पुल #पाचामुखी
आमचे वसंतराव देशपांडे पेटीवाल्यांचे दोन भाग करत असत. वसंतरावांच्या खास शैलीत सांगायचं म्हणजे, "अरे, अमकाअमका ना? तो पेटाड्या आहे!" म्हणजे वाटाड्यासारखा! हा रस्ता असा जातो, तो रस्ता तसा जातो, एवढंच सांगणारा. आणि दुसरे पेटी वाजवणारे असतात. पेटाड्या असतो, तो नुसता पट्टीला पट्टी दाबत बसलेला असतो. त्यामुळे 'आपण पट्टीचे वाजवणारे आहोत' असाही त्याचा गैरसमज झालेला असतो; - सुरांची सृष्टी निर्माण करणारा 'आमचा गोविंदा' (१९८५) (पाचामुखी (२०१२)) #पुल #पाचामुखी
आपल्या लाडक्या पु लं च्या वाढदिवसानिमित्त BBC News Marathi चे श्री रोहन टिल्लू यांनी लिहिलेला अत्यंत सुंदर लेख share करत आहोत.

प्रिय पुलं,
खरं तर मायना लिहितानाच हात थबकले होते. त्याचं कारण म्हणजे तुमचं या जगात नसणं. तुम्ही प्रचंड वास्तववादी आणि नश्वरवादी होतात. त्यामुळे मेलेल्यांना पत्र वगैरे लिहीणं, ही भानगड काही तुम्हाला आवडली नसती. तरीही तुम्ही आता या जगात नाही, यावर विश्वास ठेवणं काहीसं कठीणच आहे. कारण तुम्ही लिहिलेलं एखादं पुस्तक, एखादा लेख, तुमची रेकॉर्डेड भाषणं, अभिवाचन, बोरकरांच्या कवितांचं वाचन वगैरे ऐकलं, वाचलं की हमखास दाद जाते आणि तुमच्यापर्यंत ती दाद पोहोचवावी असं वाटतं. म्हणूनच हा पत्राचा खटाटोप. तो तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही, हे माहीत असूनही.
खरं तर तुम्हाला भाई किंवा पीएल म्हणावं, असं एकदा वाटलं होतं. पण नसती सलगी दाखवणं मलाही रूचणार नाही आणि तुम्हाला तर त्याहून नाही. तसंही ओळख असूनही शारीरिक जवळीकीतून मैत्रीचं प्रदर्शन करणारा नाथा कामत तुम्हाला खटकत होताच. नाथाची होती, तेवढीही तुमची आमची ओळख नाही. हे अर्धसत्य! मी तुम्हाला ओळखतो, पण तुम्ही मला ओळखण्याची सूतराम शक्यता नाही. (हेदेखील पूर्ण सत्य नाहीच. कारण तुम्ही ज्यांच्याबद्दल लिहीलंत, मीदेखील त्याच सामान्य माणसांच्या पंथातला.)
आज ८ नोव्हेंबर. तुमचा वाढदिवस! जयंती-बियंतीच्या फासात तुम्हाला अडकवणं तुम्हालाच पसंत पडलं नसतं. उगाचच दत्ताच्या तसबिरीला घालायचा हार तुमच्या गळ्यात अडकवण्यासारखं वाटतं ते. तुम्ही असता, तर आज ९९ वर्षांचे झाले असता आणि कदाचित तुमच्याच आवडत्या पी. जी. वुडहाऊससारखे लिहिते असता. आणि आम्ही तुमचं लेखन वाचून हसत हसत अंतर्मुख झालो असतो.
वास्तविक त्यात तसा काही फरक पडलेला नाही. कारण तुम्ही एवढं लिहून ठेवलंय की, दर वेळी वाचताना काहीतरी नवीन गवसतं आणि मग मीच माझ्याशी खुदकन हसतो. हे आपल्याला आधी कसं दिसलं नाही, असा विचार सुरू होतो.
वयाची तिशी ओलांडल्यामुळे आमची पिढी वगैरे म्हणायचं धाडस करवतं. पण आमची पिढी भाग्यवान. आम्हाला पुलं बघायला मिळाले. मी कळत्या वयात आलो, तेव्हाच्या काही अमूल्य आठवणी आहेत. तुमची ओळख झाली ती माझ्या वडिलांमुळे. (तशी ती प्रत्येक घरात वडिलांमुळेच झालेली असते.) माझे बाबा तुमच्याच 'असा मी असामी'चे प्रयोग करायचे. म्हणजे अजूनही करतात. त्याची पाठांतरं चालायची. मी लहान असताना गल्लीतल्या गणपतीसाठी बाबांनी तुमचंच 'पुरुषांचं हळदीकुंकू' बसवलं होतं. त्याशिवाय 'व्यक्ती आणि वल्ली' तर बाबांच्या तोंडूनच अनेकदा ऐकलं होतं.
साधारण शनिवार किंवा रविवार दुपारची वेळ. जेवणं वगैरे झाली की, आमच्या जुन्या घराच्या मधल्या खोलीत आई, बाबा आणि मी वामकुक्षी घ्यायला पडायचो. मधल्या खोलीतला तो हवाहवासा सुखावणारा अंधार, खिडकीतून गादीवर पडणारा कवडसा, डोक्यावरून फिरणारा आईचा हात आणि प्रत्येक व्यक्ती आणि वल्ली जिवंत करणारा बाबांचा आवाज... आजही तुमचं लेखन वाचावं ते बाबांच्या किंवा तुमच्याच आवाजात, असंच वाटत आलंय.
तेव्हा तुम्ही पहिल्यांदा भेटलात. 'यमीपेक्षा सहापट गोरी', 'परांजप्या, आहेस जागा की झाला तुझा अजगर', 'यू सी, यू सी वुई हॅव बीन हेल्ड अप हियर फॉर हाफ्पा सिक्स अवर्स, यू सी' वगैरे ऐकताना हसलो होतो, नंदा प्रधान ऐकताना न कळत्या वयातही रडलो होतो, मग थोडा मोठा झालो आणि बाबांच्या तोंडून ऐकलेली सगळी पुस्तकं वाचायचा चंग बांधला. तिथे आपली गट्टी जमली.
माझ्या बरोबरीच्या लोकांमध्येही मी तसा भोटम् पंथातला. ओल्ड स्कूल म्हटलं तरी चालेल. तुम्ही विचारांनी प्रचंड पुढे असलात, तरी तुमचं एक मन कुठेतरी सुधागडजवळ अडकलेलं. आईच्या किंवा आज्जीच्या हातच्या पदार्थांच्या चवीसाठी आसूसलेलं, काळाच्या ओघात होणारे बदल पचवतानाही जुन्याच्या आठवणीने आवंढा गिळणारं... त्यामुळे तुमचं आमचं चांगलंच जमलं. जात्यावर दळण दळणारी आज्जी सुदैवाने (की दुर्दैवाने) मला लाभली, आलवणातली पणजीही बघितली, उखळ, मुसळ, पाण्याचा बंब, सगळ्या गोष्टी लहानपणी अनुभवल्या होत्या. व्यक्ति आणि वल्लीतीलच नाही, तर इतरही पुस्तकांमधली कॅरेक्टर्स आणि आपल्या आसपास वावरणारी माणसं, यात काहीतरी साम्य आहे खास, हेसुद्धा जाणवत होतंच. आधी तुम्ही हसवण्यापुरते उलगडत गेलात.
हळूहळू वय वाढलं आणि थोडीशी समज आली. (हादेखील माझा समज. अनेकांच्या मते ती आलीच नाही. पण समज ही भरतकाम किंवा विणकामाच्या नमुन्यांसारखी दाखवायची नसून बाळगायची असते, असा एक माझा समज आहे.) पुन्हा तुमची पुस्तकं वाचायला घेतली आणि पु. ल. देशपांडे हा विनोदी लेखक आहे, असा तुमच्याबद्दल चालवलेला प्रचार किती फोल आहे, हे जाणवत गेलं.
फक्त मीच नाही, घरातले सगळेच पुलं मय झाले होते. मला आठवतं पुलकित होणे, या वाक्प्रचाराचा अर्थ परीक्षेत विचारला होता आणि मी 'पुलंचं पुस्तक वाचणे' असं लिहीलं होतं. कारण ते वाचताना पुलकित होतच होतो की आम्ही! घरात बाबा, दादा, काका वगैरे गप्पा मारायला बसलो की, तुमच्या लेखनाचा विषय निघाला नाही, असं झालंच नाही.
खिल्ली लिहीताना तुमच्याकडलं विनोदाचं अस्त्र किती काळजीपूर्वक परजलं होतंत तुम्ही. एक शून्य मी वाचूनही ज्यांना तुमच्यातला विचारी माणूस दिसला नाही, त्यांच्याबद्दल मी काय बोलावं. घरमालकास मानपत्र लिहिलंत, पण आमच्यासारख्या तुमच्यापेक्षा कितीतरी लहान असलेल्यांनाही ते मानपत्र मायबाप भारत सरकारलाच लिहिलंय असंच वाटतं. आणि अजूनही वाटतं. हे तुमच्या लिखाणाचं यश म्हणावं की, व्यवस्थेचा पराभव?
तुमचं लेखन... मी त्याबद्दल काय लिहावं. तुमचं एक एक वाक्य असं डौलदार असतं की, काय बोलावं. तुमच्या वाक्यातला एखादा शब्द इकडचा तिकडे केला किंवा तुम्ही लिहिलेल्या शब्दाच्या जागी त्याच अर्थाचा दुसरा शब्द वापरला, तरी त्या वाक्याचा डौल बिघडलाच म्हणून समजा. तुम्ही लिहिलेली 'तुझे आहे तुजपाशी', 'ती फुलराणी', 'सुंदर मी होणार' ही नाटकं गद्य असली, तरी त्यातली गेयता काही वेगळीच आहे. ही नाटकं नुसती ऐकतानाही त्यांचा ताल खिळवून ठेवतो.
तुम्हाला माहीत नाही, पण सध्या इथे 'आम्ही बुवा वाचतो' असं सांगणाऱ्यांची एक टोळी तयार झाली आहे. भरीव दिसणारी, तरी प्रचंड हलकी (वजनाने म्हणतोय मी) पुस्तकं घेऊन ती वाचून 'अमक्याच्या लव्हस्टोरीत काय लफडं झालं होतं, तमक्याने गर्लफ्रेंडला कसं पटवलं' यावर चर्चाही झडतात. ते साहित्य असेल कदाचित. पण तुमच्यासारख्यांच्या साहित्यावर पोसलेल्या आमच्या पिंडाला ते कसं काय मानवावं?
'असा मी असामी'मध्ये तुम्ही मध्यमवर्ग कसा कसा बदलत गेला, हे किती समर्पकपणे मांडलं होतंत. बरं ते मांडतोय, असा कोणताही आव आणू न देता. खरं तर माझ्या पिढीने झंझावातासारखे बदल पाहिले. अजूनही पाहतोय. आम्ही चूल पाहिली, गॅस पाहिले, स्टो वर होणारा स्वयंपाक बघितला, सोलार शेगडी बघितली, पाइपलाइन गॅस बघितला आणि आता तर वीजेवर चालणारी शेगडीही बघतोय. घरात फोन नसणं इथपासून ते फोन आल्यानंतर त्याची साग्रसंगीत पूजा करून पहिला फोन लावणं, प्रेमात पडण्याच्या वयात ब्लँक कॉल्स देणं, हक्काचा पीसीओवाला गाठून एक-एक रुपयाची नाणी सरकवत समोरचा 'त्या वेळी' गोड वाटणारा आवाज कानात साठवणं, आपल्या हितगुजांची स्मारकं असलेले ते पीसीओ बुथ बंद होताना बघणं, त्याची जागा मोबाइलने घेणं, त्यातही कॉल लावायला १६ रुपयांपासून ते आता १ पैसा प्रतिमिनिटापर्यंत किती तो बदल...
आम्ही मोठे होत असतानाच नेमकं ते जागतिकीकरण-उदारीकरण आणि खासगीकरण झालं आणि झपाट्याने आसपासचं जग आणि आम्हीही बदललो. आतापर्यंत कधीच न ऐकलेले ब्रँड्स हलक्या पावलांनी भारतात शिरले होते. उच्च मध्यमवर्ग नावाची एक जमात निर्माण होत होती. आधी लोअर मिडलक्लासमध्ये असलेली आमच्यासारखी कुटुंब मिडलक्लासची पायरी चढत होती. नाक्यावरचा वाणी टापटीप झाला होता. इराणी तर केव्हाच बंद पडले होते, पण आता ठिकठिकाणच्या उडप्यांनीही मान टाकायला सुरुवात केली आणि मॅक्डोनाल्ड्ससारखी चेन उभी राहत होती. खरेदी करणं हा सुखद अनुभव बनत चालला होता. मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री बंद पडून त्या जागी सर्व्हिस इंडस्ट्री फोफावत चालली होती. पूर्वी अगदी मोजक्या घरांपुढे दिसणारी चारचाकी इतकी स्वस्त झाली की, घरटी दोन, तीन गाड्या येऊ लागल्या.
तुम्ही असतात, तर हा बदल कसा टिपला असतात? असा मी असामीची पुढली आवृत्ती आली असती का? बटाट्याची चाळ संपवताना तुम्ही 'एक चिंतन' लिहीलं होतंत. इथे तर एक समाजव्यवस्था मोडकळीला येत होती आणि दुसरी तयार होत होती. आमची वयं कमी होती, पण आमच्या पालकांची अवस्था नक्कीच सोकरजी त्रिलोकेकर, अण्णा पावशे, एच. मंगेशराव, जनोबा रेगे यांच्यासारखीच झाली असणार. पण भाई, त्यांची दु:खं नेमकी पकडणारा, त्यांच्या रोजच्या जगण्यातल्या विवंचना मांडणारा तुमच्यासारखा कोणीच आसपास नव्हता. तो असता, तर परिस्थिती बदलली असती, असं बिलकुलच नाही. पण रोजचा गाडा मुकाटपणे ओढणाऱ्या आपलीही दखल कोणीतरी घेतंय, हे बघून जरासं बरं वाटलं असतं.
माझ्या पिढीतल्याच नाही, तर माझ्या नंतरच्या पिढीतल्या अनेकांसाठीही तुम्ही आउटडेटेड झाला नाहीत. तुम्ही तेवढेच रेलेव्हंट राहिलात. तुमच्या लेखनाचा प्रभाव आमच्यापैकी अनेकांवर आहे. आमच्या लिखाणातून कधीकधी अचानक तुम्ही डोकावता. मग आमचं आम्हालाच कौतूक वगैरे वाटतं. आणि लगेचच दुसऱ्याच क्षणी स्वत:च्या खुजेपणाची जाणीवही होते. आम्ही लिहीलेलं वाईट असतं, असं नाही. पण ते तुमच्या आसपासही पोहोचत नाही.
आता झालंय असं की, जगण्यातली विसंगती आम्हाला दिसतच नाही. दिसली, तरी आम्ही ती टिपत नाही. टिपली, तरी ती मांडण्याची खाज आम्हाला सुटत नाही. सुटली, तरी मग त्यातून कोणाच्या तरी भावना दुखावतात. मग कधीकधी आम्ही अॅट्रॉसिटी केली असते, तर कधी देशद्रोह. पुलं, तुम्ही लिहीत होतात तेव्हा तुम्हालाही निषेधाची प्रेमपत्रं येत होती. पण आता प्रेमपत्रांवर भागत नाही. आता घरांवर मोर्चे येतात, लिहिणाऱ्याला सगळेच आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करून परस्पर खटला चालवतात. त्याला दोषी ठरवून यथेच्छ समाचार घेतात. नकोसं होऊन जातं. आपण 'वझ्याचे बैल' बनून जगावं, तेच बरं, असं होतं.
पण मग पुन्हा तुम्हीच आठवता. तुम्हाला ज्या ज्या वेळी जी भूमिका योग्य वाटली, ती तुम्ही ठामपणे मांडलीत. त्याचे परिणाम काय होतील, याचा जराही विचार केला नाहीत. प्रसंगी परिणाम भोगायलाही तयार होतात आणि तसे भोगलेतही. तुमच्या भूमिकांवर टीकाही झाली. तुम्ही नेहमीच बोटचेपी भूमिका घेतलीत, असंही काहींचं म्हणणं आहे. पण उगाच पेटून वगैरे उठणं आणि कोणाच्या तरी कानशीलात भडकावणं, हा तुमचा स्वभावच नव्हता. त्या अर्थी तुम्ही मध्यमवर्गीयच राहिलात. आमच्यासारखे. पण तरीही भूमिका मांडणं तुम्ही सोडलं नाहीत. कधीकधी आयुष्यात खूप नैराश्य येतं. सगळं जग आपलं दुष्मन झालंय, असं वाटतं. मग मी शांतपणे तुमचं एखादं पुस्तक काढतो. पाचव्या मिनिटाला भोवतालाचा विसर पडतो. मी दंग होऊन जातो. पुस्तक खाली ठेवून उठतो, तेव्हा मी बदललेला असतो. जगण्याची, झुंजण्याची नवी ऊर्मी घेऊन तयार असतो.
आज तुमचा वाढदिवस... आम्ही मराठी माणसं खरंच थोर की, आमच्या मातीत तुमच्यासारखा माणूस घडला ज्याने आम्हाला एवढं भरभरून दिलं. हजार हातांनी दिलंत. आमच्या झोळ्या फाटक्या... जेवढं घेऊ शकलो, तेवढं घेतलं. पण घेता घेता देणाऱ्याचे हात मात्र घेता आले नाहीत, हेच शल्य आहे.
- तुमचा,
रोहन टिल्लू.
Rohan Tillu

पूर्वप्रकाशित दि. ०९/११/२०१७
मराठी सुविचार संग्रह
Total Pages - 71
Price -
R̶s̶.̶9̶9̶.̶0̶0̶ 𝐑𝐬.𝟐𝟓.𝟎𝟎 (74% off)
सुविचार आपल्याला प्रेरणा देतात आयुष्याला नवीन दिशा देतात. त्यासाठी आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत नवनवीन सुविचारांचा संग्रह. (ebook)
👇👇
https://rpy.club/lm/MykYEEHfN1
वाद्य जर बोललं, तर ते वाद्य आपलं वाद्यपण सिद्ध करतं. - सुरांची सृष्टी निर्माण करणारा 'आमचा गोविंदा' (१९८५) (पाचामुखी (२०१२)) # पुल # पाचामुखी
किंबहुना भारतीय संगीताची सुरुवातच वाद्यापासून झालेली आहे. 'आद्य महादेव बीन बजाये' असं म्हटलेलं आहे. वीणेपासून आमच्या संगीताची सुरुवात झालेली आहे आणि आपल्या जुन्या शास्त्रकारांनी आपल्या देहाला 'शरीरवीणा' असं म्हटलेलं आहे. गवई ज्या वेळेला गातो, त्या वेळेला शरीरवीणा वाजली, तरच ते गाणं गाण्यासारखं वाटतं. आपण ‘गाणं चांगलं झालं' असं म्हणताना म्हणतो ना की, वीणा चालू आहे असं वाटत होतं, सतार चालू आहे असं वाटत होतं. - सुरांची सृष्टी निर्माण करणारा 'आमचा गोविंदा' (१९८५) (पाचामुखी (२०१२)) # पुल # पाचामुखी
*लेखक - पु.ल. देशपांडे*

"ह्या जगामध्ये असुरांच्या सृष्टीत सुरांचे वातावरण निर्माण व्हावे म्हणून ज्यांनी प्रयत्न केले त्यांत गुरुजींचे स्थान आधुनिक काळात तरी अनन्यसाधारण आहे. अजोड आहे.
ब्राह्मणही नाही, हिंदुही नाही,
न मी एक पंथाचा!
तेच पतित की, आखडिती
जे प्रदेश साकल्याचा!'
केशवसुतांचा
नवा शिपाई'
मला साने गुरूजींमध्ये दिसला.
साकल्याच्या प्रदेशातला हा फार थोर प्रवासी. जीवनाच्या किती निरनिराळ्या अंगांत ते रमले होते. साने गुरुजींच्या डोळ्यांत अश्रू येत असत. हो येत असत. मी तर म्हणतो की तसले अश्रू येण्याचे भाग्य एकदा जरी तुमच्या आयुष्यात लाभले तरी क्षण खर्‍या अर्थाने आपण जगलो असे म्हणा. साने गुरुजी नुसते रडले नाहीत. प्रचंड चिडले. ते रडणे आणि ते चिडणे सुंदर होते. त्या चिडण्यामागे भव्यता होती. गुरुजी केवळ साहित्यासाठी साहित्य किंवा कलेसाठी कला असे मानणार्‍यातले नव्हते. जे जे काही आहे ते जीवन अधिक सुंदर करण्यासाठी आहे, अशी त्यांची श्रद्धा होती आणि त्या श्रद्धेपोटी लागणारी किंमत गुरुजी देत होते. तुकारामांच्या शब्दांत बोलायचे म्हणजे-

तुका म्हणे व्हावी प्राणासवे आटी
नाही तरी गोष्टी बोलू नये

अशी गुरुजींची जीवननिष्ठा. त्यांनी स्वत:ला साहित्यिक म्हणवून घेण्याचा आग्रह धरला नाही हे खरं , पण ते खरोखरीच चांगले साहित्यिक होते. गुरुजींना साहित्यिक म्हणून मोठे मनाचे स्थान दिले पाहिजे. गुरुजींना निसर्गाने किती सुंदर दर्शन घडते. झाडू, टोपली घेऊन कचरा नाहीसा करणारे गुरुजी निसर्गात खूप रमत असत. सार्‍या कलांविषयी गुरुजींना ओढ होती. सेवा दलाच्या कला पथकाचे सारे श्रेय साने गुरुजींना. आमच्यासारखी मुले नाहीतर गाण्या-बजावण्याऎवजी त्यांच्या क्रांतिकार्यात कशी आली असती? गाण्यानं सारा देश पेटविता येतो. हे सारे ते एका महान धर्माचे पालन म्हणून करत होते. साने गुरुजींचा धर्म कोठला? मानवधर्म वगैरे आपण म्हणतो. साने गुरुजींचा धर्म म्हणजे मातृधर्म. मातृधर्माला त्याग्याचे मोल द्यावे लागते.
गुरुजींनी आत्महत्या केली नाही. देश इतका नासला की, गुरुजींसारख्यांना जगणे आम्ही अशक्य करून ठेवले.
आपल्या घरात गलिच्छ प्रकार सुरू झाले तर चांगली आई तिथे राहिल तरी का? जुन्या काळचे असेल तर ती बिचारी काशी यात्रेला जाईल. गुरुजी अशा एका महायात्रेला निघून गेले की, तिथून परत येणे नाही. त्यांच्या त्या अंताचा आपण असा अर्थ करून घायला हवा. गुरुजी गेले. गुरुजींना जावेसे वाटले. ते गेले त्यामुळे अनेक लोकांनी सुटकेचा निश्वासही सोडला असेल. कारण गुरुजींसारखी माणसं आपल्याला पेलत नाहीत. तो प्रेमाचा धाक त्रासदायक असतो. तो धर्म आचरायला म्हणजे त्रास असतो..."

पु.लंचा कंठ दाटुन आला होता. डोळ्यांत गुरुजींचेच अश्रू दाटुन आले होते. पु.लंनी स्वत:ला सावरलं.
"शेतकरी, कष्टकरी यांच्यासाठी `ऊठवू सारे रान आता पेटवू सारे रान' म्हणणारा,
स्त्रियांची गाणी, लोकगीतं दारोदार,
खेडोपाडी फिरून माताबहिणींमधली कविता सुखदु:ख वेचून घेणारा,
त्यांच्या दु:खांना सामोरं जाणारा,
दलितांसाठी मंदिरं आणि माणसांच्या अंत:करणातली बंद कवाड
ं खुली करायला सांगणारा
हा महामानव या पवित्रभूमीत
राहिला आणि काळ्याकुट्ट काळोखात बोलबोलता नाहिसा झाला."
ज्या वेळेला गोविंदा पेटी वाजवतो, त्या वेळी आपण म्हणतो, “अरे, शब्दन्शब्द ऐकू येत होता!” महाराष्ट्राला साथीमध्ये अशी शब्दन्शब्द ऐकायची सुंदर सवय नाटकांनी इतकी लावलेली आहे की, तशी पेटी न वाजवणारे लोक हे बाजा वाजवतात; आणि म्हणून ज्यांनी ती पेटी ऐकली नाही असे मूर्ख लोक रेडिओवर पेटी बंद करतात! कारण त्यांनी चांगली पेटी कधी ऐकलीच नाही त्यांनी बाजेच ऐकले त्याला ते तरी काय करणार? - सुरांची सृष्टी निर्माण करणारा 'आमचा गोविंदा' (१९८५) (पाचामुखी (२०१२)) #पुल #पाचामुखी
माझ्या लहानपणी ज्यांनी मला साहित्य, संगीत, नाटक पाहून उत्तेजन दिलं, तू चांगला लेखक होशील, नाटकांत चांगलं काम करू शकशील, असा नुसता आशीर्वादच दिला नाही, तर आत्मविश्वासही निर्माण केला, अशा माझ्या शिक्षकांमध्ये तारकुंडे मास्तरांची मला खूप आठवण येते. तारकुंडे मास्तर आम्हाला फिजिक्स- केमिस्ट्री शिकवायचे. पण मैदानात आमच्याबरोबर क्रिकेट खेळत. स्नेहसंमेलनात नाटकं बसवत. मी १५ वर्षांचा होतो, तेव्हा 'बेबंदशाही'ची स्त्रीपात्रविरहित रंगावृत्ती मी तयार केली होती. तारकुंडे मास्तरनी माझं कौतुकच केलं नाही, तर त्यांनी स्वतः ते नाटक आम्हा विद्यार्थ्यांकडून बसवून घेतलं. मी त्या नाटकात संभाजीचं काम केलं होतं.नाटकातलं भाषण म्हणून झाल्यावर कडकडून टाळ्या पडणारा तो पहिला अनुभव मी त्या वेळेला घेतला आहे.
तारकुंडे मास्तरांना मुलांच्यावर कधी रागवावंच लागलं नाही. तसे ते चांगले उंचेपुरे होते. धिप्पाड म्हणावी, अशी देहयष्टी होती. पण बोलण्यात इतका जिव्हाळा होता की, फिजिक्ससारखा विषयही कवितेसारखा वाटायचा. तारकुंडेंच्या सारखेच आमचे फडके मास्तर. ते गणिताचे शिक्षक. पण उत्तम क्रीडापटू. गोरेपान, सडसडीत शरीर, खादीचा पायजमा, शर्ट, कोट अशा वेशातले. डोक्यावर टोपी न घालणारे माझ्या लहानपणी दोघेच शिक्षक होते. फडके आणि व्ही. डी. चितळे. वास्तविक मी गणितात खूप कच्चा. पण फडके मास्तर त्याबाबतीत मला कधीही न रागावता माझ्या पेटीवादनाचं कौतुक करायचे. माझं संगीताचं प्रेम या गणिताच्या फडके मास्तरांनी आणि ड्रॉइंग मास्तरांनी- कोंडकर मास्तरांनी- वाढीला लावलं. गणिताप्रमाणेच मला चित्रकलेतही अजिबात गती नसायची. एकदा या कोंडकर मास्तरांनी मला ड्रॉइंगच्या तासाला फ्री-हँड ड्रॉइंग काढायला सांगितलं. मी हताश होऊन समोरच्या कोऱ्या कागदाकडे बघत बसलो होतो. त्यांना काय वाटलं कुणास ठाऊक? ते माझ्याजवळ आले आणि म्हणाले, 'काय रे? तुझा कागद कोराच?' मी अगदी रडायच्या घाईला आलो होतो. मी रडू आवरत म्हणालो, 'मला चित्र काढायला येत नाही, सर!' 'अरे, तू चित्र काढायला सुरुवातच केली नाहीस, तर येतच नाही हे कसं? रेघा तर ओढायला लाग. आलं तर आलं. नाही आलं तर नाही आलं. परवा पेटी काय छान वाजवलीस. ती काय आपोआप आली? अरे, आपल्या बोटात काय लपलेलं असतं, ते आपल्यालासुद्धा ठाऊक नसतं.' मी लगेच रेघोट्या ओढायला सुरुवात केली. कोंडकर मास्तरांचा नि माझा एक खासगी करार होता. मी इतर विषयांत पहिल्या श्रेणीतले मार्क मिळवले, तर ते मला ड्रॉइंगमध्ये पास करणार होते... आणि गंमत अशी की, मीही त्यांना उगीच पास करायला लागू नये म्हणून प्रयत्नपूर्वक ड्रॉइंगकडे लक्ष द्यायला लागलो. माझी बोटेही साथ द्यायला लागली.

आणखी एका शिक्षकांची मला नेहमी आठवण येते. ती म्हणजे व्ही. डी. चितळे मास्तरांची. पुढे फार मोठे साम्यवादी नेते म्हणून त्यांचं नाव झालं. ऑलिम्पिकच्या हॉकी स्पर्धा दूरदर्शनवरून पाहताना मला त्यांची खूप आठवण झाली. त्यांनी आम्हाला त्या काळात आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकलेल्या ध्यानचंद आणि इतर खेळाडूंचा खेळ दाखवला होता. ते आम्हाला इतिहास शिकवीत. पण स्वतः मात्र उत्तम खेळाडू होते. खूप देखणे होते. लालबुंद चेहरा. उत्तम आरोग्याचा आदर्श नमुना असावा, असे दिसायचे. सदैव हसतमुख. उत्कृष्ट वक्तृत्व. ते बोलायला लागले की, आम्ही मंत्रमुग्ध होऊन त्यांचं बोलणं ऐकत असू. माझी वक्तृत्वाची आवड चितळे मास्तरांनी जोपासली. त्यांनी मला दिलेला एक गुरूमंत्र आठवतो. ते म्हणाले होते, 'समोर गर्दी कितीही असो, त्यातल्या एकाशी बोलतोय, असं समजून बोलत जा. म्हणजे त्या गर्दीतल्या प्रत्येकाला तू त्याच्याशी बोलतोस असं वाटेल. फोटोतली सरस्वती कशी आपल्याकडेच पाहते असं वाटतं ना? तसं!' या शिक्षकांनी केलेल्या चांगल्या संस्कारांनी घडून मी किती चांगला झालो, हे मला सांगता येणार नाही. पण त्यांच्याविषयी मात्र माझ्या मनात खूप मोठी कृतज्ञता आहे. त्यांची आठवण झाली की, मी पुन्हा शाळकरी वयाचा होतो.

पु.ल. देशपांडे
मला सांगायला आनंद वाटतो की, गोविंदा कोणाकडेही शिकला नाही, म्हणूनच तो इतकं चांगलं वाजवतो. कारण शिकलेले लोक पाहिले की ते आणि त्यांचे गुरू ह्या दोघांपैकी कोणाची कीव अधिक करावी असं वाटतं. - सुरांची सृष्टी निर्माण करणारा 'आमचा गोविंदा' (१९८५) (पाचामुखी (२०१२)) #पुल #पाचामुखी
*पुलोपदेश* 
-----------------------------------------------

डॉ. श्रीरंग आडारकर यांचे चिरंजीव अशोक आडारकर यांना त्यांच्या विवाहानिमित्त पु. ल. देशपांडे यांनी पाठविलेले पत्र...

पु. ल. देशपांडे,
१, रुपाली, ७७७, शिवाजी नगर, पुणे - ४.


८ जून १९८० प्रिय अशोक आजचा दिवस तुझ्या आणी कोमलच्या आयुष्यात सर्वात
महत्वाचा. सुमारे चौतीस वर्षांपूर्वी, जून महिन्यातच असाच एक महत्वाचा दिवस माझ्या आणी तुझ्या सुनीतामावशीच्या आयुष्यात आला होता. या चौतीस वर्षांच्या अनुभवाच्या आधारावर 'लग्न' या विषयावर तुला चार उपदेशपर गोष्टी सांगाव्या, असं मला वाटतं. वास्तविक लग्न या विषयावर कुणीही कुणालाही उपदेशपर चार शब्द सांगू नये, असा माझा सगळ्यांनाच उपदेश असतो. तरीही यशस्वी संसारासंबंधी चार युक्तीच्या गोष्टी तुला सांगाव्या, असं मला वाटलं. या संबंधात ऑस्कर वाइल्डचे एक वाक्य ध्यानात ठेव. "A Perfect marriage is based on perfect mutual misunderstanding".लग्न हे नवराबायकोच्या एकमेकाविषयी असणा-या संपूर्ण गैरसमजाच्या आधारावरच यशस्वी होत असते. आता माझेच उदाहरण देतो. मी अत्यंत अव्यवस्थित आहे, असा सुनीताचा लग्न झाल्या क्षणापासून आजतागायत गैरसमज आहे. लग्नाच्या रजिस्टरबुकात सही करायला मी खुर्चीवर बसलो, तो नेमका तिथे ठेवलेल्या रजिस्ट्रारच्या ह्यॅटवर. ही गोष्ट खरी आहे. पण मी त्याचा त्या ह्यॅटीवर बसण्यापूर्वीची तिची अवस्था आणि मी बसल्यानंतरची अवस्था यात मला तरी काहीच फरक दिसला नाही. एकदा कुणाच्या तरी चष्म्यावर बसलो होतो, तेव्हा मात्र बसण्यापूर्वीच्या
माझ्या लेंग्याच्या आणि काचा घूसू नयेत तिथे घुसल्यावर झालेल्या माझ्या अवस्थेच्या आठवणीने आजही नेमका याच ठिकाणी घाम फुटतो. पण ते जाऊ दे. सांगायची गोष्ट मी अव्यवस्थित असल्याचा सुनीताचा गैरसमज मी अजूनही टिकवून ठेवला आहे. यामुळे मी प्रवासातून परतताना माझा पायजमा, टॉवेल आणि साबणाची वडी या प्रवासात विसरून येण्याच्याच लायकीच्या वस्तू न विसरता विसरून येतो. मग सुनीताला वस्तू हरवल्याचा दु:खापेक्षा 'मी अव्यवस्थित आहे', या तिच्या मताला पुष्टी मिळाल्याचा भयंकर आनंद होतो. आता कोमल ही डॉक्टर असल्यामुळे 'तू प्रकृतीची काळजी घेत नाहीस', असा जर तिचा गैरसमज झाला, तर तो टिकवून ठेव. तुला जरी तू भक्कम आहेस असं वाटत असलं, तरी स्री-दृष्टी हा एक खास प्रकार आहे. या नजरेने पुरुषमाणसाला पाहता येत नाही. तेव्हा तू स्वत:च्या प्रकृतीची काळजी घेत नाहीस, रात्रदिंवस हापिसच्या कामाचीच चितां करतोस असा जर कोमलचा समज झाला, तर अधूनमधून खोकला वगैरे काढून तो समज टिकवून ठेव. तिने दिलेली गोळी वगैरे खाऊन टाक. डॉक्टरीण बायकोने केलेल्या गोळीच्या सांबाऱ्यापेक्षा ही गोळी अधिक चवदार असते, असे एका डॉक्टरणीशी लग्न केलेल्या फिजिओथेरापिस्टचे मत आहे. (पुढील सहा महिने मी जसलोकपुढून जाणार नाही!) आता खोकला काढताना या ठिकाणी दुसरी कोणी तरुणी नाही, याची खात्री करून घे. ('तरुणी' हे वय हल्ली ५७-५८ वर्षांपर्यंत नेण्यात आले आहे. कारमायकेल रोडवरून एक चक्कर मारून आल्यावर तुला हे कळेल.)
गाफीलपणाने खोकला काढलास तर 'हा खोकला कुणासाठी काढला होता ते खरं सांगा-?' या प्रश्नाचे उत्तर द्यायची हिंमत बाळगावी लागेल. तेव्हा गैरसमज वाढवत ठेवताना योग्य ती दक्षता घ्यावी.
सुखी संसारात नवऱ्याला स्वत:चे मत नसणे, यासारखे सुख नाही. विशेषत: प्रापचिंक बाबतीत. खोमेनी, सादत, मोशे दायान, अरबी तेलाचा प्रश्न यावर मतभेद चालतील. पण भरलेले पापलेट आणि तळलेले पापलेट यातले अधिक चांगले कुठले? या विषयावर सौ.पक्षाचे मत ऐकून तेच ‚ग्र्याह्य मानावे. बेसावधपणाने कारवारी पद्धतीच्या स्वैपाकावर बोलून जाशील. मुख्य म्हणजे 'राव' या आडनावाचा/ची प्रत्येक व्यक्ती ही असामान्य मानावी. कुठल्या क्षणाची कुठला/ कुठली राव ही वधूपक्षाभ्या नात्यातली निघेल, हे सांगणे अशक्य आहे. मी रवीनद्रनाथाविंषयी नेहमी चांगलेच बोलतो याचे खरे कारण यांचे आडनाव 'ठाकूर' आहे हे तुला म्हणून सांगतो. राव या आडनावाप्रमाणे 'बोरकर' या आडनावाविषयीही सावध असावे. जरा अधिक सावध. बोलताना बारीक सारीक गोष्टींना जपावं लागतं. संसार म्हणजे खायची गोष्ट नाही. (बायकोच्या हातचे जेवण सोडून. ते खावेच लागते.) उदाहरणरार्थ, 'मीसुद्धा मनात आणले असते, तर डॉक्टर झालो असतो,' हे वाक्य चुकूनही उच्चारू नये. उलट, 'बापरे! डॉक्टर होणं आपल्याला जमलं नसतं. याला तुझ्यासारखी निराळीच बुद्धिमत्ता लागते,' हे वाक्य दर महिन्याला पगाराच्या दिवशी वधूपक्षाला ऐकवीत जावे. म्हणजे त्या आनंदात शॉपिंगचा बेत रद्द होण्याची शक्यता आहे. तुला एकूण Medical Professionविषयी जपूनच बोलावं लागेल. वधूपक्षातले तीन विरुद्ध तू एक या सामन्यात तुझ्या कराटेच उपयोग नाही. शिवाय कराटेमुळे विटा फोडता आल्या, तरी मते फोडता येत नाहीत. यामुळे MedicalProfessionसंबंधी उगीचच मतभेद व्यक्त करणे टाळावे.
तुझ्या Technologyबद्दल घरात एक अक्षर न काढणे बरे. फारच कोणी वखुपक्षीयांनी सख्या काय चाललंय वगैरे विचारलं, तर सात-आठ टेक्नीकल शब्द घालून एक वाक्य फेक. (यापूर्वी विचारणारा तुझ्या विषयातला नाही, याची खात्री करून घे!) म्हणजे तू तुझ्या विषयातल्या जगातल्या पाच शास्रज्ञांपैकी एक आहेस, हा समज (गैरसमज म्हणत नाही!) पक्का होईल. आणिDiamond Shamrockमधला तूच काय तो डायमंड आणि इतर सगळे Shamकिंवा निर्बुद्धrockहा समज वाढीला लागून घरात इज्जत वाढेल.

कोमलच्या गृहप्रवेशानंतर तुमच्या घरातली स्री-मतदारांची संख्या एका आकड्याने वाढत आहे, हे विसरू नये. भरतचा मुक्काम कुठल्या तरी अज्ञात कारणाने अमेरिकेत लांबत चालल्यामुळे तू आणि आमचे परममित्र बाबूराव (अख्यक्ष शेणवी सहकारी पेढी) विरुद्ध मालती, पुन्नी, कोमल असे गव्हर्मेंट आहे. तेव्हा काही दिवस तरी 'पंजा'चे राज्य आहे हे विसरू नये. आणि घरात सतत होणा-या 'शॉपिंगला' उगीचच विरोध न करता बाजारातून जे जे काही म्हणून घरात विकत आणले जाईल,याचे ''अरे वा!'', ''छान!'', ' O Wonderful!'' अशा शब्दांनी स्वागत करावे. बाहेर जाताना 'ही साडी नेसू का?' हा पत्नीचा प्रश्न पतीने उत्तर द्यावे म्हणून विचारलेला नसतो. व्याकरणदृष्ट्या हा प्रश्न असला, तरी कौटुबिंक व्याकरणात ते एक 'मी ही साडी नेसणार आहे' असं Firm Statementअसते. या प्रश्नाला खूप निरखून पाहिल्याचा (साडीकडे) अभिनय करून- वा! हूंss! - हो हो -, छान - फार तर Fantastic Idea, असे प्रसंग पाहून आवाज काढावे. अगर 'ही नेसतेस?' - अच्छा वगैरे डायलॉग म्हणावा. कृपा करून 'कुठलीही नेस. कोण बघतंय' यासारखी वाक्यं ओठाशी आली, तरी गिळून टाकावी. या बाबतीत आपल्या राष्ट्रपतींचा आदर्श मानावा. प्रधानमंत्रीजींकडून सूचना आली की लगेच agreedम्हणून सही. राष्ट्रपतींचे हे धोरण सर्वसामान्य पतींनीही स्वीकारावे. उलट पार्टीला वगैरे जाताना 'यातला कुठला बुशशर्ट घालू? तुझा Choiceनेहमीच फसक्लास असतो - वगैरे वाक्यं टाकावी. माझ्या Choiceपेक्षा तुझा Choiceचांगला असतो, या वाक्यातली अंदरकी बात मात्र वधूपक्षाच्या लक्षात येणार नाही, याची खात्री बाळगावी. नाहीतर 'कळतात ही बोलणी ...' हे वेदाइतकं जुनं वाक्य ऐकावं लागेल. मग यानंतरच्या प्रत्येक प्रश्नाला 'मला नाही माहीत' हे उत्तर. शेवटी प्रचंड महत्वाची गोष्ट. सौ.च्या वाढदिवसाची तारीख विसरू नये. एक वेळ ऑफिसात जाताना पॅण्ट घालायला विसरलास तरी चालेल. पण बायकोची जन्मतारीख विसरणाच्या गुन्ह्याला क्षमा नाही. इमानी नवरे हा वाढदिवस निरनिराळ्या रीतीने साजरा करतात. presentsसुद्धा देतात. पण इतर कुठल्याही Presentपेक्षा या दिवशी नवऱ्याने ऑफिसला absentराहण्यासारखे दुसरे Presentनाही.
कांदेनवमीला जसे आपल्याला कांदा आवडला नाही, तरी धार्मिक भावनेने कांदा खातात, तसे बायकोच्या वाढदिवसाला आपल्याला एरवी, ज्यांना निर्मनुष्य बेटावर भेटले तरी टाळावे असे वाटते - तसल्या, बायकोच्या तमाम नातेवाईकांना, काहींना दुपारी आणि काहींना रात्री जेवायला बोलावण्याचा बायकोला आग्रह करावा, असे एका तज्ञ पतीचं मत आहे. म्हणजे आपण सुटी घेऊन घरी राहिलो म्हणून बायको खुश. बरं तिच्याच नातलगांना गिळायला बोलावल्यामुळे ती दिवसभर स्वैपाकघरात. घरात तिचेच नातलग आणि यांची प्रजा. घरातली काचेची भांडी या बालकांच्या सहज हाती लागतील, अशा जागी ठेवावी. भावाच्या किंवा बहिणिच्या मुलांनीच ती फोडल्यामुळे सौ.चा 'आवाज' बंद. आपणही हा मोका साधून - अहो - मुलंच ती - करणारच मस्ती. वगैरे बोलावं. आणि मेहुणे-मेव्हण्या वगैरेंच्या मुलांना सहज फोडता येतील किंवा सांडता येतील अशा वस्तू यांना दिसतील अशा ठिकाणी ठेवाव्यात. फक्त जिथे आपला टेपरेकॉर्डर, डिक्स वगैरे असतात, या खोलीतल्या विजेच्या बटणांना शॉक येतो असे सांगून ती खोली बंद ठेवावी. मी केलेल्या उपदेशातला बाकीचा सर्व उपदेश विसरलास तरी चालेल, पण बायकोचा वाढदिवस विसरू नकोस. वाढदिवस कितवा, याला महत्व नाही.
त्रिलोकरशेट या माझ्या परममित्राला आपल्या बायकोच्या वाढदिवसाचा विसर पडला, ती हकीकत यांनी मला सागिंतली, तशी तुला सांगतो. ऐक. ''सालं काय सांगू तुला, अरे वाईफचा बर्थ डे. टोटली फरगॉट, जी भडकली. सालं विचारू नको. एकदम नो टॉक. बरं, बायको अशी टॉकीच्याबद्दल सायलेंट फिल्म होऊन बसली की, आपण तोंड बंद ठेवतो. - जी भडकली - जी भडकली - मी ब्रेकफासला काय आहे विचारल्यावर टीपॉयवरची दाताची कवळीच तिनी काढून खिडकीतून भायेर फेकून दिली. टू-थर्टिफाइव रुपीज टिकवून तळपदे डेंटिसकडून आणलेली कवळी भाई जीवनजी लेनवर, बत्तीसच्या बत्तीस दात पसरले. आणि साला जोक सांगतो तुला. कवळी फेकली ती माझी समजून तिची स्वत:चीच. माझे दात पाण्यानी भरलेल्या बाऊलमधून तिच्याकडे बघून साले काच फुटेपर्यंत हसत होते. मी सालं पटकन माझी कवळी तोंडात घातली - तिचं विदाऊट टूथ तोंड पाह्यल्यावर एकदम आमच्या डोळ्यातली ट्यूब पेटली - साला वाईफचा फिफ्टिएट्थ बर्थ डे.
कारण बरोबर फिफ्टीसेकंड बर्थडेला मी तिला तळपदे डॉक्टरकडून कवळी बसवली होती. बर्थडेच्या दिवशी कवळी फेकून बसली - मला सालं समजेना, हॅपी बर्थ डे म्हणू का नको म्हणू? तसाच साला चफ्पल घालून निघालो आणि तिला खुश करावं म्हणून तिच्या आवडीचे लाडू घेऊन आलो. तो साला फणसवाडीतला दयाराम मिठायवाला पण अवंग साला. याला धादा वॉर्न करून सागिंतलं - नरम बुंदी. तर या इडियटनी पिशवीत भरून दिले एक डझन कडक बुंदी. साला वाईफच्या तोंडात नाय दात - ती कडक बुंदी काय खाणार कफ्पाळ. साला तिला वाटलं, मी पर्पजली कडक बुंदी आणली. साला तुला सांगतो, तोंडात दात नसताना या वाइफ लोक जेव्हा भडकून बोलतात ना, तो साला साऊंडपण हॉरिबल आणि साईट तर मल्टिफ्लाईड बाय हंड्रेड हॉरिबल. आता मी काय ट्रिक केलीय म्हाईत आहे? साईबाबाच्या फोटोखाली भिंतीवर खिळ्यांनी वाईफची बर्थ डेट कोरून ठेवली आहे. साल्या दाताच्या कवळ्या म्हाग किती झाल्यायेत म्हाइत नाय तुला? - करणार काय? मीच इडियट साला. वाईफचा बर्थ डे विसरलो.
असो. नवीन लग्न झालेल्या वराचा फार वेळ घेऊ नये. असा वेळ घेणारा माणूस पुढल्या जन्मी गुरखा नाही तर दूधवाला भय्या होतो म्हणतात. पण माझा हा उपदेश पाळणा-यास उत्तम संसारसुख प्राप्त होऊन, ताजे मासे, धनधान्य, संतती, संपत्ती, साखर, मुलांना शाळेत प्रवेश, वह्या, बसमख्ये आणि लोकलमध्ये खिडकीजवळची जागा, टेलिफोनवर हवा तोच नंबर मिळणे वगैरे सर्व गोष्टींचा भरपूर लाभ होवोन संसारात सदैव आनंदी, आनंद नांदेल. तथास्तु.

तुझा
पी. एल. काका आणि सुनिता मावशी 
"... पु.ल.चा आणि आमचा संबंध तर कितीतरी वर्षांपूर्वीचा आहे. आमच्या एका कीर्तनाला पु.ल.नी मागे टाळांची साथ देऊन तुकोबांचा एक अभंग रसाळपणे म्हटल्याचे आम्हांला आठवते. तेथपासून आम्ही पु.ल.च्या प्रत्येक गोष्टीचं कौतुक करीत आलो आहोत. ही व्यक्ती एवढी बहुरंगी आहे की, त्यांना काय येत नाही हाच मोठा प्रश्न आहे..."

- आचार्य प्र.के.अत्रे


*अत्रे आणि पुल*
पुढे पु.ल. जे काही सांगतात ते कम्माल आहे!
परंतु कोणाकडे न शिकण्याचं महत्त्व काय? आमच्याकडे सगळ्यांत जास्त शिक्षण कोणाचं झालं असेल, तर ते एकलव्याचं झालं. कारण त्याने मनाने गुरूला वरलं होतं. आमच्याकडे सर्वांत मोठा शिष्य कोण असेल, तर तो एकलव्य! त्याला गुरूचं नावही सांगता येत नव्हतं किंवा त्याची आणि गुरूची भेटही झालेली नव्हती, पण त्याने मनाने गुरूला वरलं होतं. त्याने मनाने वरलेला गुरू कोण, तर धनुष्य-बाण! आणि धनुष्य-बाणाला मनाने वरल्यानंतर त्या धनुष्य-बाणाचं काय कार्य आहे, त्याची ताकद कशात आहे; हे सगळं त्याला उमगायला लागलं. - सुरांची सृष्टी निर्माण करणारा 'आमचा गोविंदा' (१९८५) (पाचामुखी (२०१२)) #पुल #पाचामुखी